ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेलगझाली हे दक्षिण व पूर्व आफ्रिकेच्या बाहेर मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या पहिल्या प्रजातीचे नाव आहे. या प्रजातीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

उत्तर मध्य आफ्रिकेतील चॅड (Chad) या देशात बाहर-एल-गझल नदीच्या सुकलेल्या पात्रात फ्रेंच जीवाश्मविज्ञ मिशेल ब्रुनेट यांच्या संशोधक चमूला या प्रजातीचा पहिला जीवाश्म मिळाला (१९९५). खालचा जबडा असलेल्या या जीवाश्माला (केटी  १२/एच१) ब्रुनेट यांनी आपले सहकारी व फ्रेंच भूवैज्ञानिक ॲबेल ब्रिलान्सेऊ (Abel Brillanceau) यांच्या स्मरणार्थ ‘ॲबेलʼ असे नाव दिले. बेरिलियमवर आधारित कॉस्मोजेनिक रेडिओन्युक्लिआइड या कालमापन पद्धतीने या जीवाश्माचे वय ३५.८ (अधिकउणे २७) लक्ष वर्षपूर्व असे आढळले आहे.

केटी १२ / एच १ या मुख्य नमुन्याशिवाय ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेलगझाली प्रजातीचे वरचा दात (केटी १२/एच २), वरचा जबडा (केटी १३-९६-एच १) आणि खालचा जबडा (केटी ४०) हे तीन जीवाश्म मिळाले आहेत. या प्रजातीच्या दातांचे लुकन (इनॅमल) कमी जाडीचे असून एकूणच त्यांचे ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिसशी साम्य आहे. म्हणूनच काही पुरामानवशास्त्रज्ञ बहरेलगझाली ही ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिसची  एक उपप्रजाती मानतात.

संदर्भ :

  • Gibbons, Ann, The First Human, New York, 2007.
  • Lewin, Roger, Human Evolution : An Illustrated Introduction, 2009.
  • Roberts, Alice,  Evolution, The Human Story, London, 2011.

समीक्षक – शौनक कुलकर्णी