प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा कालखंड :

प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाचा (Post-Processual Archaeology) उगम १९८० नंतर प्रक्रियावादी पुरातत्त्वाला विरोध म्हणून झाला. एक प्रकारे ही नवपुरातत्त्वाच्या प्रसाराची प्रतिक्रिया आहे. तथापि प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व ही एकच नवी विचारधारा नसून स्त्रीवादी, मार्क्सवादी, प्रतीकवादी, संरचनावादी आणि रचनाविघटनवादी (Deconstructionist) अशा अनेक विचारसरणींचा समावेश प्रक्रियावादानंतरच्या पुरातत्त्वीय संकल्पनेत करता येतो.

पुरातत्त्वातील वैज्ञानिक पद्धतींना कडाडून विरोध करणे आणि पुरातत्त्वीय संशोधनाला पुन्हा एकदा मानवविद्या बनवणे ही दोन प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ इयान हॉडर, एम. शॅन्कस्, ख्रिस्तोफर टिली आणि जेम्स बेल इत्यादींनी आघाडी उघडली. प्रक्रियावादी पुरातत्त्वज्ञांनी त्यांच्या पद्धती प्रमाणित करण्यासाठी मुख्यतः कार्ल जी. हेम्पेल (१९०५–९७) या विज्ञानाच्या तत्त्वचिंतकांनी पुढे आणलेले प्रारूप वापरले होते, तर प्रक्रियावादाच्या विरोधकांनी ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ ⇨ रॉबिन जॉर्ज कॉलिंगवुड (१८८९–१९४३) यांच्या लेखनाचा आधार घेतला; कारण कॉलिंगवुड यांचा ऐतिहासिक संशोधनात अनुभववादाचा (Empiricism) वापर करण्यास स्पष्ट विरोध होता. इतिहासाला अभ्यासकाच्या व्यक्तिनिष्ठतेचे आणि अंतःप्रज्ञेचे महत्त्वाचे परिमाण असते, या इटालियन इतिहासकार बी. क्रोस यांच्या मतामध्ये भर घालून कॉलिंगवुडनी पुरातत्त्वाचे स्थान ‘इतिहासात’ आहे, असे नमूद केले होते. मानवी कल्पना, इच्छा आणि विचार यांच्यातून उगम पावणाऱ्या सर्व घटनांचा अभ्यास, ही कॉलिंगवुडप्रणीत वैज्ञानिक पद्धतीला अजिबात स्थान नसलेली इतिहासाची कल्पना प्रक्रियावादाच्या विरोधकांनी उचलून धरली. अर्थात कॉलिंगवुडच्या पद्धतीमधील सर्वच गोष्टींचा स्वीकार नवपुरातत्त्वाला विरोध करणाऱ्यांनी केला नव्हता.

पुरातत्त्वाशिवाय इतिहास, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्ञान संपादण्याच्या पद्धतींवर तत्वज्ञानातील संरचनावादी विचारांचाही प्रभाव पडलेला आहे. सर्व प्रकारच्या समाजांची अथवा संस्कृतींची रचना समान असते, याला संरचनावाद असे म्हणतात. गेल्या दोन दशकांमध्ये संदर्भप्रणीत पुरातत्त्व ही वेगळी विचारसरणी पुढे आली आहे. पुरातत्त्वीय वस्तूंचा योग्य अर्थ लावण्यासाठी मानवी संस्कृतीमधील घडामोडींचा पर्यावरण आणि वर्तनाशी निगडित संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे, हा या विचारांचा मुख्य भाग आहे. याशिवाय इयान हॉडर यांनी ‘प्रतीकमय पुरातत्त्व’ हा आणखी एक विचार पुढे आणला आहे. पुरातत्त्वीय वस्तू या मानवी कृतीची सांकेतिक प्रतीके असतात; त्यामुळे त्यांचा अर्थ ‘मजकूर वाचण्याच्या पद्धतीने’ लावावा लागेल आणि असे करताना सर्व पर्यायी स्पष्टीकरणे एकाच पातळीवर मान्य आहेत, असा या विचारांचा सारांश आहे. याचबरोबर संरचनावाद व मार्क्सवादी विचारसरणी यांच्या मिश्रणातून मार्क्सवादी पुरातत्त्व ही वेगळी विचारधाराही १९६०पासून अस्तित्वात आली आहे. पुरातत्त्वीय वस्तूंच्या उत्खननातील मांडणीवरून तत्कालीन वर्गसंघर्षाची काही चिन्हे दिसतात का, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे, असे ही विचारधारा मानते. आजवरच्या पुरातत्त्वीय स्पष्टीकरणांत पुरुषप्रधान वृत्तीचे आणि पूर्वग्रहांचे वर्चस्व आहे. याचप्रमाणे विज्ञानामध्येही पूर्वग्रह आहेत. विज्ञानाचा वापर पुरुषप्रधान संस्कृतीने करून स्त्रियांचे मानवी प्रगतीच्या इतिहासातील स्थान नाकारले आहे, आणि म्हणून स्त्रीवादी विचारधारेचा पुरातत्त्वीय विज्ञानाला कसून विरोध आहे. त्यांच्या विचारसरणीला ‘स्त्रीवादी पुरातत्त्वʼ असे नाव आहे.

प्रक्रियावादी पुरातत्त्वाचे समर्थक आणि विरोधक यांच्यातला वैचारिक वाद अद्याप संपलेला नाही.  पुरातत्त्वीय संशोधनात ज्या वेगाने वैज्ञानिक पद्धती रुजत गेली आणि जात आहे, त्याच वेगाने प्रक्रियावादाचे विरोधक नवनवीन संकल्पनांच्या आधारे पुरातत्त्वाला त्याचा तथाकथित ‘मानवी चेहरा’ पुन्हा परत मिळवून देण्यासाठी झगडत आहेत. इयान हॉडर यांनी ‘अर्थबोधवादी पुरातत्त्व’ या नावाने आणखी वेगळा विचार मांडलेला आहे. कोणत्याही गोष्टीचे अनेक अर्थ लावता येतात आणि हे सगळे अर्थ आपापल्या परीने योग्य मानले पाहिजेत, असे समजल्याने अर्थबोधवादी पुरातत्त्व ही संज्ञा बहुवचनी मानली जाते.

प्रक्रियावादाला आणि वैज्ञानिक पद्धतीला विरोध असणारे काहीजण आधुनिकोत्तर विचारवंत पॉल फेयराबेन्ड (१९२४–९४) यांच्या ‘सैद्धांतिक अराजकवादा’चा आधार घेऊन असे म्हणतात की, कोणतेही ज्ञान मिळवताना एखादी विशिष्ट पद्धत वापरा, हे म्हणणे मागासलेपणाचे आहे. प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार हवे ते म्हणण्याचा हक्क आहे. पुरातत्त्वज्ञांनी आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी एखादे विधान केल्यास त्याला पुरावा असला पाहिजे हा आग्रह धरता कामा नये, असे हे लोक मानतात. प्रक्रियावादाच्या विरोधातील चर्चा ही विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील वेगवेगळ्या प्रवाहांत प्रसिद्ध होणारे विचार वापरून, प्रत्यक्षार्थवाद आणि तार्किक अनुभववादातील त्रुटी दाखवणे एवढ्यावरच मर्यादित राहिली. सर्व विचारधारा आणि त्यांच्यातील पाठभेद हे असलेच पाहिजेत; म्हणजे मग कोणत्याही ज्ञानशाखेचा खरा विकास होतो, असे प्रक्रियावादाच्या विरोधकांना वाटते. ज्ञानसंपादनाच्या अनेक पर्यायी मार्गांपैकी कोणताही मार्ग निवडण्यास संशोधक स्वतंत्र असला पाहिजे, असे हे विचारवंत मानतात. प्रत्यक्ष क्षेत्रीय पुरातत्त्वीय संशोधनात या नवीन विचारप्रवाहांना स्थान मिळालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्रस्थापित संशोधनाला विरोध करणाऱ्यांनी अद्याप कोणत्या पर्यायी पद्धतीने व कसे काम करावे, याची कसलीही रूपरेषा सुचवलेली नाही. एवढेच नाही तर प्रक्रियावादाच्या विरोधकांना नेमके काय करायचे आहे, तेच कळत नाही असे म्हणावे लागेल. इयान हॉडर यांनी प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्व म्हणजे उत्तर शोधणे नाही, तर निव्वळ प्रश्न विचारणे आहे, असे म्हटले आहे.

संदर्भ :

  • Collingwood, R. G. The Idea of History, Oxford, 1946.
  • Feyerabend, P. K. Against Method : Outline of an Anarchist Theory of Knowledge, New York, 1975.
  • Hempel, C. G. Philosophy of Natural Science, New Jersey, 1966.
  • Hodder, I. Symbols in Action: Ethnoarchaeological Studies of Material Culture, Cambridge, 1982.
  • Hodder, I. Reading the Past, Cambridge, 1991.
  • Shanks, M. & Tilley, C. Reconstructing Archaeology, Cambridge, 1987.
  • Shanks, M. & Tilley, C. Social Theory and Archaeology, Cambridge, 1991.
  • जोगळेकर, प्रमोद  ‘पुरातत्त्वशास्त्रातील नवीन प्रवाहʼ, संशोधक, २००४.

समीक्षक : शरद राजगुरू