वेल्डन, वॉल्टर फ्रँक रफायल : (१५ मार्च १८६० – १३ एप्रिल १९०६).

ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ व जीवसांख्यिकी (Biometry) या  विषयाचे जनक. त्यांना रफायल वेल्डन या नावानेही ओळखले जाते. ते फ्रान्सिस गॉल्टन आणि कार्ल पीअर्सन यांच्यासह बायोमेट्रिका (Biometrica) या नियतकालिकेचे संस्थापक संपादक होते.

वेल्डन यांचा जन्म लंडन येथील हायगेट येथे झाला. त्यांचे वडिल रसायनशास्त्रज्ञ आणि पत्रकार होते, त्यांच्या कामाकरिता त्यांना वारंवार स्थलांतर करावे लागत असे, त्यामुळे वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत वेल्डन यांचे शालेय शिक्षण झाले नाही. अनेक वर्ष खासगी शिक्षण घेऊन ते मि. वॉटसन बोर्डिंग स्कूल, कॅव्हर्शम येथे दाखल झाले (१८७३). त्यानंतर तीन वर्षांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला (१८७६). तेथे त्यांना विविध विषयांची ओळख झाली, त्यांनी मात्र वैद्यक विषयाचा अभ्यास करण्याचे ठरविले. तेथेच त्यांना प्राध्यापक ओलाउस हेन्रिक (Olaus Henrici) यांनी गणित विषय शिकविले, त्यामुळेच त्यांना गणित विषयाची गोडी ‍निर्माण झाली. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (१८७६-७७), किंग्ज कॉलेज लंडन (१८७७) आणि सेंट जॉन कॉलेज केंब्रिज (१८७८) येथे वैद्यकशास्त्र शिकण्याचा प्रयत्न केला. १८७८ नंतर त्यांनी हा अभ्यास सोडून प्राणिशास्त्राचा अभ्यास करण्यास आरंभ केला. १८८१ मध्ये नॅचरल सायन्स ट्रायपॉसमध्ये त्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली. त्यानंतर लगेच ते इटली येथील नेपल्स येथे झूऑलॉजिकल स्टेशनमध्ये समुद्री जीवशास्त्राचा अभ्यास करण्यास रवाना झाले. केंब्रिजला परतल्यावर त्यांची अपृष्ठवंशी प्राणी यांच्या स्वरूपाचे शास्त्र (Invertebrate Morphology) शिकवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली (१८८४).

वेल्डन हे प्लाइमाऊथ येथे मरीन बायॉलॉजिकल स्टेशनचे सभासद होते (१८८४–८७). समुद्री जीवशास्त्रीय घटना आणि त्यातील जीवांचे निवडक मृत्युदर तपासणे हा त्यांच्या कामाचा मुख्य भाग होता. समुद्री जीवशास्त्रीय घटना खासकरून खेकडा आणि कोळंबी यांच्या विविध अवयवांमधील संबंधांचे निरीक्षण  त्यांनी केले. त्यांच्या कामात कोळंबीच्या विभाजनाची प्राथमिक अवस्था आणि थरांची बांधणी यांचा समावेश होता. त्यांच्या प्राणिशास्त्राच्या अभ्यासात हळूहळू संख्याशास्त्रीय विश्लेषण येऊ लागले. गॉल्टन यांच्या नॅचरल इन्हेरिटंस (Natural Inheritance ) या पुस्तकाने त्यांना ही दिशा दाखवली. आपल्या या पुस्तकात गॉल्टन यांनी सिद्ध केले की, मानवप्राणी, वनस्पती आणि पतंग यांच्या काही विशिष्ट अवयवांच्या सरासरी आकारमानाचे वारंवारता वितरण (Frequency Distribution) हे सामान्यपणे वितरीत असते. क्विटेलेट यांनीही सुसंस्कृत मानवासाठी अशाच प्रकारचे निष्कर्ष मांडले होते. गॉल्टन आणि क्विटेलेट यांनी मानवप्राण्यासाठी वापरलेले संख्याशास्त्रीय विश्लेषण वेल्डन यांनी प्राणिशास्त्रातील इतर प्रजातींसाठी वापरले. आपले गणिती कौशल्य कमी पडते हे लक्षात येऊन त्यांनी फ्रेंच गणितज्ज्ञांचे संभाव्यता कलन (Probability calculus) शिकायला आरंभ केला. प्राण्यांच्या अवयवांच्या मोजमापातील संबंधासाठी परस्परसंबंध गुणांकाचा अभ्यास करणे हाच त्यांच्या कामाचा मुख्य भाग होता आणि ते जीवसांख्यिकीसाठी  (biometry) महत्त्वाचे ठरले. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी कोळंबीच्या भिन्न अवयवांची मोजमापे घेऊन ती अभ्यासली. लवकरच त्यांच्या लक्षात आले की, या मोजमापांचे वितरण सर्वसामान्य आहे. या विषयावर त्यांनी दोन शोधनिबंध प्रसिद्ध केले. तज्ज्ञांच्या मते या लेखांनी जीवसांख्यिकीचा पाया रचला.

वन्य परिस्थिती ही नैसर्गिक निवड आणि इतर विध्वंसक प्रभाव यांवर परिणाम करते आणि अशा परिस्थितीत राहणाऱ्या प्रजातींच्या शरीर-अवयव रचनेतील परिस्थितीनुसार घडणारे फरक शोधण्यात वेल्डन यांना रस होता. १८८९ मध्ये आनुवंशिकतेवर लिहित असतांना गॉल्टन यांनी अनुमान केले होते की, प्राणिमात्र नैसर्गिक निवडीच्या प्रभावाखाली असोत वा नसोत, त्यांचे आवृती वितरण सर्वसामान्यच असेल. साधारण त्याच सुमारास वेल्डन यांनी सामान्य कोळंबीच्या (Crangon vulgaris) चार अवयवांच्या तफावतीवर काम सुरू केले होते. प्लाइमाऊथ पासून पुरेसे दूर असलेल्या पाण्यातील पाच नमुने त्यांनी त्यासाठी गोळा केले. १८९० मध्ये त्याचे संख्याशास्त्रीय विश्लेषण प्रकाशित झाले. त्यात त्यांनी गॉल्टन यांनी केलेले अनुमान खरे असल्याचे सिद्ध केले. १,००० प्रौढ मादी खेकड्यांच्या २३ भिन्न प्रकारच्या मोजमापातील २२ मोजमापांचे वितरण सामान्य होते. एक मात्र द्विमदल वक्र होते (bimodal curve). १८९२ पर्यंत कार्ल पीअर्सन (Karl Pearson) यांनी वेल्डन यांच्या आधारसामग्रीसाठी वक्रास समर्पक अशी संभाव्यता प्रणाली तयार केली. या आधारसामग्रीवरील संख्याशास्त्रीय विश्लेषणामुळेच दोन भिन्न प्रजाती निर्माण झाल्याचा त्यांना निष्कर्ष काढता आला. वेल्डन यांनी पीअर्सन यांना ऋण परस्परसंबंधाची (negative correlation) कल्पना सुचवली.

वेल्डन यांनी संख्याशास्त्राचे रितसर प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र समुद्री जीवांमधील डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचा प्रायोगिक पुरावा प्रतिपादन करण्यासाठी संख्याशास्त्रीय साधने शोधण्यात त्यांना रस होता.

वेल्डन यांची १८९० मध्ये रॉयल सोसायटीत फेलो म्हणून निवड झाली आणि लवकरच ते युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे इ. आर. लँकेशर  (E. R. Lankester) यांच्या जागी जीवशास्त्राचे प्राध्यापक झाले. तेथूनच त्यांची पीअर्सन यांच्याशी दाट मैत्री झाली. कार्ल पीअर्सन यांना जीवशास्त्रीय आणि संख्याशास्त्रीय प्रश्न विचारून नवी साधने तयार करण्यास त्यांनी उद्युक्त केले. त्यामुळे कार्ल पीअर्सनच्या आधुनिक संख्याशास्त्र सिद्धांताच्या विकासाला चालना मिळाली. जीवसांख्यिकीसाठी (biometry) एक नियतकालिक असावे अशी सूचना वेल्डन यांनी पीअर्सन यांना केल्यावर काही आठवड्यातच बायोमेट्रिका असे त्या नियतकालिकेचे नामकरण करण्यात आले. १९०१ मध्ये बायोमेट्रिका चा प्रथम अंक प्रसिद्ध झाला.

मेंडेल यांनी केलेल्या कामाला आलेले महत्त्व आणि बायोमेट्रिका चे प्रकाशन यामुळे इंग्लंडमध्ये आनुवंशिकताशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये दोन गट निर्माण झाले. मेंडेलियन गट परिस्थितीनुसार घडणारा शरीररचनेतील खंडित तफावत (discontinuous variation) मानणारा होता. दुसरा गट पीअर्सन आणि वेल्डन यांचा. तो परिस्थितीनुसार घडणारा शरीररचनेतील अखंडित तफावत (continuous variation) मानणारा होता. त्यांनी या तफावतींचा संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास सुरू ठेवला.

वेल्डन १९०६ मध्ये न्यूमोनियाच्या आजाराने ग्रस्त झाले. त्यातच त्यांचे अकाली निधन झाले. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डने त्यांच्या सन्मानार्थ वेल्डन मेमोरियल पारितोषिक ठेवले आहे आणि त्यांचा अर्धपुतळा आपल्या वस्तुसंग्रहालयात ठेवला आहे.

वेल्डन यांचे ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे निधन झाले.

संदर्भ:

समीक्षक – विवेक पाटकर

#जीवसांख्यिकी #नैसर्गिकआनुवंशिकता #अपृष्ठवंशीप्राणी  #बायोमेट्रिका #biostatistic #hereditary #invertebratesanimals #karlpearson #galton #

प्रतिक्रिया व्यक्त करा