कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचे हे उपनिषद आहे. या उपनिषदाचे तीन भाग आहेत. त्यांना ‘वल्ली’ असे नाव आहे. त्यांपैकी पहिल्या शिक्षावल्लीत बारा अनुवाक (पोटभाग), दुसर्या ब्रह्मानंदवल्लीत नऊ, तर तिसर्या भृगुवल्लीत दहा अनुवाक आहेत. वल्लीनुसार या उपनिषदातील महत्त्वाचे विषय पुढीलप्रमाणे : (१) शिक्षावल्लीत निरनिराळ्या शिक्षा (वर्णोच्चारांचे प्रकार) वर्णिल्या आहेत. थोडक्यात, शिक्षा म्हणजे वर्णोच्चारशास्त्र. शिक्षावल्लीतील दुसरा अनुवाक नावाप्रमाणेच वर्णोच्चारशास्त्रविषयक आहे. तिसर्या अनुवाकात वेदांच्या अर्थाचे विवेचन, अधिलोक (अधिभौतिक), अधिज्योतिष (ज्योतिषविषयक), अधिविद्य (अध्ययन-अध्यापनविषयक), अधिप्रज (जीवविज्ञानविषयक), अध्यात्म (आत्मविषयक) या पाच दृष्टिकोनांतून केले असून या पाच अधिकरणांना मिळून ‘महासंहिता’ असे म्हटले आहे. चौथ्या अनुवाकात, कीर्ती, यश:प्राप्ती, आत्मज्ञानप्राप्ती यांसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची प्रार्थना केली आहे. पाचव्या अनुवाकात, भु:, भुव:, स्व: आणि मह: या चार व्याहृतींची लोकात्मक, देवात्मक, वेदात्मक, प्राणात्मक व्याख्या केली आहे. यांपैकी ‘मह:’ ही व्याहृती म्हणजे ब्रह्म असे विवेचन केले आहे. सहाव्या अनुवाकात, शरीरातील अमृतशक्तीचे स्थान सांगितले आहे. सातव्या अनुवाकात, पंचसंख्यात्मक विश्वाचे विवरण केले आहे. आठव्या अनुवाकात ब्रह्मविद्येतील ओंकाराचे माहात्म्य वर्णन केले आहे. ‘ओमिति ब्रह्म। ओमिति इदं सर्वम्।’ (ओम् हेच ब्रह्म आहे. ओम् हेच सर्व काही आहे) अशी ओंकाराची स्तुती केली आहे.
गुरुकुलातील अध्ययनसमाप्तीनंतर आचार्यांनी आपल्या शिष्याला केलेला उपदेश अकराव्या अनुवाकात दिला आहे. हा उपदेश प्रसिद्ध असून अत्यंत मननीय आहे. या उपदेशातील काही वचने पुढीलप्रमाणे : ‘सत्यं वद। धर्मं चर। ……..मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्यदेवो भव।….इत्यादी.
(२) ब्रह्मानंदवल्लीत, नावाप्रमाणेच ब्रह्मज्ञान व त्यापासून होणारा आनंद यांचे वर्णन यात आहे. यात प्रारंभी ब्रह्माचे वर्णन केले आहे. ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म।’ हे ब्रह्माचे स्वरूपलक्षण सांगणारे प्रसिद्ध वाक्य या वल्लीत आहे. ब्रह्मापासून सृष्टी निर्माण होते. ब्रह्मापासून आकाश, आकाशापासून वायु, वायुपासून अग्नि व त्यानंतर आप, पृथिवी, ओषधि, अन्न, पुरुष या क्रमाने विश्वनिर्मिती होते. ब्रह्म हेच विश्वाचे मूलकारण आहे. पुढील पाच अनुवाकात अनुक्रमे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशांचे विवेचन आहे. ब्रह्माचे रस हेही रूप आहे ‘रसो वै स:’ (रस हे ब्रह्म आहे) अशा रसस्वरूप ब्रह्माला जाणून मनुष्य निर्भय आणि आनंदी होतो. ब्रह्माचे हे अमूर्त रूप जो जाणत नाही तो मूर्त स्वरूपास प्राप्त होतो. तेव्हा मात्र भय निर्माण होते.
निसर्गातील शक्तीही ब्रह्माच्या भयाने कार्य करतात. याच्याच भयाने वारा वाहतो. सूर्य उगवतो. अग्नी जाळतो. इंद्र पाणी देतो आणि मृत्यू आपले कार्य करतो.
या वल्लीत ब्रह्मानंदाची (आत्मानंदाची) मीमांसा केली आहे. मानवी आनंदाच्या तुलनेत ब्रह्मानंद अगणित पटीने अधिक असून सर्वव्यापी ब्रह्मानंदाच्या अनुभूतीने मनुष्य सर्व कोशांच्या पलिकडे असणार्या आत्म्याशी एकरूप होतो. हा आत्मानंद वर्णनातीत, इंद्रियातीत आहे, असे वर्णन करणारे या उपनिषदातील वचन पुढीलप्रमाणे :
यतो वाचो निवर्तन्ते। अप्राप्य मनसा सह।
आनन्दं ब्रह्मणो विद्वान्। न बिभेति कुतश्चनेति।
अर्थ : मन आणि वाणी जेथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते अप्राप्य आहे म्हणून परत येतात, अशा त्या आत्मानंदाचा ज्याला साक्षात्कार होतो, त्याला कसलेही भय उरत नाही.
(३) भृगूवल्लीत वरुणपूत्र भृगूची आत्मज्ञानप्राप्तीची कथा सांगितली आहे म्हणून या वल्लीचे नाव भृगूवल्ली असे सार्थ आहे. ही कथा अशी – भृगू ब्रह्म जाणून घेण्यासाठी आपल्या पित्याकडॆ, वरुणाकडे गेला. पित्याने भृगूला अनुक्रमे अन्न, प्राण, मन, विज्ञान हे ब्रह्म आहे असे सांगून तप करायला सांगितले. या प्रत्येकाचे क्रमाक्रमाने तप करूनही भृगूचे समाधान झाले नाही आणि त्याची शंकाही दूर झाली नाही. त्यानंतर आनंद हेच ब्रह्म आहे असे तप करून भृगूचे समाधान झाले. या आनंदमीमांसेलाच ‘भार्गवी विद्या’ किंवा ‘वारुणी विद्या’ असे संबोधले जाते. या विद्येच्या उपदेशात ब्रह्माचे तटस्थ लक्षण सांगणारे प्रसिद्ध वाक्य आहे.
‘यतो वा एमानि भूतानि जायन्ते। येन जातानि जीवन्ति।
यत्प्रयन्ति अभिसंविशन्ति। तद्विजिज्ञासस्व। तद्ब्रह्मेति।’
अर्थ : ज्याच्यापासून हे प्राणिमात्र निर्माण होतात, ज्याच्यामुळे जन्माला आलेले प्राणिमात्र जिवंत राहतात, ज्याच्याप्रत जातात आणि विलीन होतात, ते जाण. तेच ब्रह्म होय.
यानंतर अन्नाची प्रशंसा केली आहे; कारण अन्न ही जीवाची प्राथमिक गरज आहे. अन्नाची निंदा करू नये, अन्न नाकारू नये, अन्नसमृद्धी करावी हे व्रत आहे, असे या उपनिषदात म्हटले आहे.
संदर्भ :
- Ranade, R. D. A Constructive Survey of Upanishadic Philosophy : An Introduction to the thought of the Upanishads, Mumbai, 1968.
- दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापुर, २०१५.
- सिद्धेश्वरशास्त्री, चित्राव, उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.
- http://vedicheritage.gov.in/upanishads/taittiriyopanishad/
समीक्षक – भाग्यलता पाटस्कर
खूपच छान माहिती उपलब्ध करून दिली आहे,धन्यवाद।