मध्ययुगीन थाट पद्धती सांगणारा आद्य ग्रंथ. दाक्षिणात्य संगीतज्ञ पंडित रामामात्य यांनी १५५० मध्ये हा ग्रंथ लिहिला. पं. रामामात्य हे विजयनगरच्या रामराजाचे आप्त व समकालीन असून रामराजांच्या सांगण्यावरून त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. तत्कालीन रागांचे वर्गीकरण करण्यासाठी सांगितलेले ‘मेल’ हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. यापूर्वीच्या काळातील ग्रंथांमध्ये प्राचीन जातिसंगीताच्या प्रभावातून ग्रह, अंश, न्यासादी रागलक्षणांना महत्त्व देऊन केलेले राग-रागिणी वर्गीकरण आढळते. रागामध्ये येणाऱ्या स्वरांच्या आधारे रागांचे वर्गीकरण करावे, ही कल्पना संगीतरत्नाकर या ग्रंथानंतरच्या कालामध्ये विकसित झाली. ती प्रथम ग्रंथबद्ध करण्याचे कार्य स्वरमेलकलानिधी या ग्रंथाने केले. समान स्वर येणारे राग एका मेलाचे समजावेत या तत्त्वाच्या आधारे रागवर्गीकरण करण्याची पद्धत यानंतर मान्यता पावू लागली व पुढे व्यंकटमखींनी गणितानुसार बहात्तर मेल सांगितले असले, तरीही व्यवहारोपयोगी जे वीस मेल सांगितले, ते स्वरमेलकलानिधी याच्याशी बहुतांशी जुळणारेच आहेत. वीणेच्या संदर्भातील संशोधनाचे संकलन हेदेखील या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय.स्वरमेलकलानिधी या ग्रंथामध्ये पाच प्रकरणे आहेत :
१. उपोद्घात प्रकरण : या प्रकरणात ग्रंथाचा परिचय व त्याच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केलेली आहे. संगीतरत्नाकर या ग्रंथामध्ये एका सप्तकात सात शुद्ध व बारा विकृत असे एकूण एकोणीस स्वर सांगितले आहेत. त्यांपैकी केवळ चौदा स्वरांचा समावेश रामामात्य यांनी आपल्या सप्तकात केला.
२. स्वर प्रकरण : या प्रकरणामध्ये नाद, श्रुती, स्वर व मन्द्रादी तीन स्थाने इत्यादी व्याख्या दिल्या आहेत. प्रथम गांधर्व व गान यांच्यावरील चर्चेमध्ये अनादि संप्रदाय असणारे व नियमांचे पालन करणारे संगीत म्हणजे ‘गांधर्व’ तर वाग्गेयकारांनी रचलेले जनरंजक संगीत म्हणजे ‘गान’ अशी व्याख्या दिली आहे. पुढे एका सप्तकात षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद या सात शुद्ध स्वरांसोबत च्युतषड्ज-निषाद, च्युतमध्यम-गांधार, च्युतपंचम-मध्यम, साधारणगांधार, कैशिकनिषाद, काकलीनिषाद व अंतरगांधार हे सात विकृत असे एकूण १४ स्वर सांगितले आहेत.
३. वीणा प्रकरण : तत्कालीन वीणांचे विविध प्रकार, वीणेची प्रशंसा, वीणा मेलन-प्रक्रिया, शुद्ध-विकृत स्वरांचे पडदे योग्य ठिकाणी लावणे यांचे विस्तृत विवेचन या प्रकरणात प्राप्त होते. वीणामेलन प्रक्रिया म्हणजे वीणेवर शुद्ध व विकृत स्वर सिद्ध करण्याची रीत स्पष्ट केली आहे. वीणेच्या मुख्य चार तारा जुळवण्याच्या पद्धतीनुसार तीन प्रकारच्या वीणा सांगितल्या आहेत. १. शुद्ध मेल वीणा – सा प सा म; २. मध्यम मेल वीणा – प सा प सा; ३. अच्युतराय वीणा – सा प सा प.
वीणेवर केवळ निमित्तमात्र स्पर्शाने षड्ज, मध्यम व पंचम हे स्वर आपोआपच वाजतात ह्याचा आधार घेऊन वीणेतून निघणाऱ्या या ‘स्वयंभू स्वरां’ची चर्चा रामामात्य यांनी या प्रकरणामध्ये केलेली आहे.
४. मेल प्रकरण : या प्रकरणात वीस मेल, त्यांची स्वरलक्षणे व त्यात समाविष्ट असलेल्या रागांची नामावली दिली आहे व सुमारे चौसष्ट रागांचे वरील वीस मेलांमधील वर्गीकरणही दिलेले आहे. ते वीस मेल पुढीलप्रमाणे –
१) मुखारी, २) मालवगौळ, ३) श्री, ४) सारंगनट, ५) हिंदोल, ६) शुद्ध रामक्रिया, ७) देशाक्षी, ८) कन्नडगौळ, ९) शुद्ध नाट, १०) आहरी, ११) नादरामक्रिया, १२) शुद्धवराळी, १३) रीतिगौळ, १४) वसंतभैरवी, १५) केदारगौळ, १६) हेज्जुजी, १७) सामवराळी, १८) रेवगुप्ती, १९) सामंत, २०) कांभोजी.
५. राग प्रकरण : वरील वीस मेलांमधील चौसष्ट रागांची विस्तृत माहिती या प्रकरणात दिली आहे. यामध्ये रागांची जाती, वर्ज स्वर, ग्रह, अंश, न्यास, समय इत्यादी माहिती प्राप्त होते. या वीस मेलातून उत्पन्न होणाऱ्या रागांचे उत्तम, मध्यम व अधम असे विभागही केले आहेत. मात्र या विभाजनाचे निकष स्पष्ट केलेले नाहीत. यामधील बौली, कुरंजी, फलमंजरी,
आंधाली (आंदोली), घण्टारव इत्यादी अनेक राग आज लोप पावलेले दिसतात. श्री, हिंदोल, ललित, भैरवी, छायानट, बसंत, भिन्न षड्ज अशी काही रागनामे वर्तमान संगीतातील रागनामांशी जुळतात; तथापि प्रस्तुत स्वरमेलकलानिधी या ग्रंथातील शुद्ध व विकृत स्वर परिभाषा व त्यांच्या वर्तमान उत्तर भारतीय संगीतातील परिभाषा यांमध्ये कालौघामध्ये अंतर पडले आहे. पण एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
संदर्भ :
- देसाई, चैतन्य, संगीतविषयक संस्कृत ग्रंथ, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, १९७९, पुणे.
- भट्ट, विश्वंभरनाथ, रामामात्यकृत स्वरमेलकलानिधि हिंदी टीकासहित अनु., संगीत कार्यालय हाथरस, उत्तर प्रदेश, १९६३.
- मालवीय, श्रद्धा, भारतीय संगीतज्ञ एवं संगीतग्रंथ, कनिष्क पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्यूटर्स, नई दिल्ली, २०१०.
- वर्मा, सिम्मी, प्राचीन एवं मध्यकाल के शास्त्रकारोंका संगीतमें योगदान, कनिष्क पब्लिशर्स अँड डिस्ट्रीब्यूटर्स, नई दिल्ली, २०१२.
- Sreenivasrao’s blog http://sreenivasraos.com/tag/ramamtya.
समीक्षक – मनीषा पोळ