सरनाईक, निवृत्तीबुवा : (४ जुलै १९१२ – १६ फेब्रुवारी १९९४). हिंदुस्थानी रागसंगीताच्या क्षेत्रातील जयपूर-अत्रौली गायकीशी संबंधित एक अग्रगण्य गायक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे संगीतप्रिय कुटुंबात झाला. त्यांचे वडील तुकारामबुवा सरनाईक (मूळ उपनाम जाधव) हे एक नावाजलेले भजनी गायक होते.
निवृत्तीबुवांना दोन मोठे भाऊ व एक बहीण. निवृत्तीबुवा चार वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री निवर्तल्या. काही कालावधीनंतर त्यांच्या वडलांनी दुसरा विवाह केला. कौटुंबिक कारणामुळे वडलांनी आपल्या तीन अपत्यांस प्रथमपत्नीच्या माहेरी पाठवले. निवृत्तीबुवांना मात्र त्यांची बालवयातच दिसून आलेली गायनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे सर्वांत कनिष्ठ बंधू शंकरराव सरनाईक यांच्या हवाली केले. ‘महाराष्ट्र कोकीळ’ शंकरराव सरनाईक हे प्रसिद्ध गायक-नट होते. मराठी नाटक व चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या उत्तम अभिनयाने प्रख्यात झालेले गायक-अभिनेते अरुण सरनाईक यांचे ते वडील होत. तेव्हा शंकरराव हे गोविंदराव टेंबे यांच्या ‘शिवराज संगीत नाटक मंडळी’मध्ये काम करीत असत. त्यांच्यासह निवृत्तीबुवांचे गायन-शिक्षण आणि नाटक मंडळीबरोबरची भ्रमंती चालू झाली. शंकरराव १९१९ च्या सुमारास कोल्हापुरास परतले. इंदूर संस्थानचे राजे तुकोजीराव होळकर यांच्या पाठिंब्याने शंकररावांनी सुरू केलेल्या यशवंत संगीत नाटक मंडळीत कृष्णराव गोरे, सवाई गंधर्व, नत्थूखाँ असे अनेक मोठे गवई होते. आपल्या काकांसह या सर्वांच्याच गायनाचे संस्कार निवृत्तीबुवांवर झाले. पण त्यांच्या औपचारिक गायनशिक्षणाची सुरुवात मात्र गोविंदबुवा भावे यांच्यापासून झाली. तबलावादक बळवंत रुकडीकर व बाबालाल इस्लामपूरकर यांच्याकडून तबलावादनचे शिक्षणही त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या गायनातही लयतालाचे सूक्ष्म अंग दिसू लागले.
निवृत्तीबुवांनी आठ वर्षांचे असताना चलती दुनिया या हिंदी संगीत-नाटकात तोता-मैना या पात्रांपैकी ‘तोता’ हे पात्र साकारले. पुढे १४ वर्षांचे झाल्यावर नायिकेच्या भूमिकाही त्यांनी केल्या. काही काळ संगीत नाटकांत स्त्री-भूमिका करून त्यांनी नाव मिळवले. त्यांची सत्याग्रही या नाटकातील नारदाची भूमिका खूप गाजली. या काळात त्यांना सवाई गंधर्व यांच्याकडून किराणा घराण्याच्या स्वरमाधुर्यप्रधान गायकीची तालीम मिळाली. काका शंकरराव यांना ख्यालगायकी शिकण्याचा खूपच नाद होता; मात्र नाटक मंडळीच्या व्यापातून तालीम घ्यायला त्यांना वेळ होत नसे. अशा वेळी उस्तादांनी आपला पुतण्या निवृत्तीस शिकवावे, असे ते सांगत. त्यामुळे निवृत्तीबुवांना उस्ताद रजब अलीखाँ आणि उस्ताद अल्लादियाखाँ या दोघांचीही तालीम मिळाली. त्यांच्या गायनात किराणा व जयपूर-अत्रौली या दोन्ही गायकींचा सुरेख मिलाप झालेला दिसतो. १९३४ साली नाटक मंडळी बंद पडल्याने निवृत्तीबुवा कोल्हापुरास परतले आणि गवई म्हणून मैफली पेश करू लागले. देवल क्लबमध्ये त्यांचा पहिला जलसा झाला. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता इत्यादी ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असत.
माधुर्यपूर्ण स्वरोच्चार, सुरेल, लोचदार आलापकारी, लयक्रीडा करणारे बोलबनाव व बोलताना, स्वर व लयबंधांच्या गुंतागुंतीमुळे स्तिमित करणारी तयारीची तानक्रिया ही त्यांच्या ख्यालगायकीची वैशिष्ट्ये होती. ज्या काळात विशिष्ट घराण्याच्या गवयाचा गंडा बांधून तालीम घेऊन त्याच घराण्याची गायकी पेश करण्याबद्दलचे निर्बंध कडक होते, त्या काळात विविध घराण्यांतील गायनतत्त्वांचा मिलाप करून स्वत:ची गानप्रतिमा निर्माण करणे ही बंडखोरी मानली जाई. जयपूर-अत्रौली घराण्याच्या कक्षा रुंद करणारी, स्वत:ची अशी ढंगदार गायकी निवृत्तीबुवा गात असत. त्यामुळे त्यांच्या पिढीतील एक बंडखोर गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे सांगीतिक विचारही तेव्हाच्या चाकोरीबाहेरचे, खुले असे होते. यमन, तोडी, शुद्धकल्याण अशा आम रागांसह विराट भैरव, बडहंस सारंग, लक्ष्मी तोडी, बहादुरी तोडी, फुलश्री, विहंग, वराटी, रूपमती मल्हार, पटमंजरीचे प्रकार, गौडबहार, ललतबहार इ. अनवट रागांचीही प्रभावी पेशकश ते करीत. मैफलीचा समारोप ते बऱ्याचदा ‘मालवी’ या रागातील ‘आयो फागुन मास’ या बंदिशीने करीत. निवृत्तीबुवांकडे अनेक आम व अनवट रागांतील विविध ढंगांच्या बंदिशींचा खजिना होता. त्यांनी पतियाळाचे ‘तान कप्तान’ फतेह अली यांचे चिरंजीव आशिक अली यांच्याकडूनही अनवट रागांतील सुंदर बंदिशी प्राप्त केल्या होत्या. त्यांनी पारंपरिक बंदिशींच्या संग्रहाबरोबरच स्वत:ही काही चीजा बांधल्या. उदा. कित ढूंडन जाऊं (संपूर्ण मालकंस), ध्रुवमंडल प्रसार हुआ (ललितागौरी) इत्यादी. तसेच काही जुन्या चीजांना थोडे वेगळे आकर्षक रूपही दिले. उदा. नींद ना आवत (शुद्ध कल्याण), डार डार पात पात (काफी कानडा) इत्यादी.
१९६६ साली निवृत्तीबुवा कोल्हापूरहून मुंबईस स्थायिक झाले. १९६९ ते १९७९ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात गायनगुरू म्हणून त्यांनी काम केले. १९७९ पासून पुढे काही काळ कोलकाता येथील आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमीमध्ये ते गायनगुरू होते. गुरुशिष्य परंपरेनुसार तेथेही त्यांनी विद्यादान केले.
सरदारबाई कारदगेकर, आझमबाई, प्रभुदेव सरदार, विजया जाधव-गटलेवार, मुरलीधर पेठकर, लाडकूजान, पुरुषोत्तम सोळांकूरकर, पंचाक्षरी मत्तीकही, दिनकर पणशीकर, रमेश गणपुले, ज्योत्स्ना मोहिले, प्रसाद सावकार, नीलाक्षी जुवेकर, सुधाकर डिग्रजकर, विनोद डिग्रजकर, लता गोडसे, प्रसाद गुळवणी, प्रभा अत्रे हे त्यांचे काही शिष्यगण. तसेच किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, जयश्री पाटणेकर, पद्मा तळवलकर इत्यादी कलाकारांनाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. अरुण कशाळकर व उल्हास कशाळकर या गायकांवर निवृत्तीबुवांच्या तानक्रियेचा ठळक प्रभाव दिसून येतो.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७९), मध्यप्रदेश शासनाकडून तानसेन सन्मान (१९८६), बनारस विश्व हिंदू परिषदेचा पुरस्कार (१९८८), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०) इत्यादी पुरस्कारांनी निवृत्तीबुवांना गौरवण्यात आले.
निवृत्तीबुवा कोलकात्यास वास्तव्यास असताना कंपवाताच्या विकाराने ग्रासल्याने ते मुंबईस परतले (१९९१). त्यानंतर काही कालावधीत मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शिष्यवर्ग व आप्तेष्टांनी स्थापिलेल्या ‘पं. निवृत्तीबुवा सरनाईक प्रतिष्ठान’द्वारे बुवांच्या स्मृतिनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जातात.
समीक्षक – मनीषा पोळ
#जयपूर-अत्रौली घराणे #किराणा घराणे
Excellent. Thanks for sharing very valuable information about Pandit Nivrutti buva Sarnaik.