काणे, दत्तात्रेय विष्णु : ( २३ फेब्रुवारी १९१९ – १२ ऑक्टोबर १९९७). हिंदुस्थानी संगीतातील एक ख्यातकीर्त गायक. त्यांचा जन्म इचलकरंजी (भूतपूर्व इचलकरंजी संस्थान, कोल्हापूर ) येथे एका सांगीतिक परंपरा असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील विष्णुपंत हे संवादिनी, तबला आणि सतार ही वाद्ये वाजवीत असत आणि प्रसंगोपात्त कलाकारांना हार्मोनियमची साथही करत असत. इचलकरंजी संस्थानच्या दरबारात ते संवादिनीवादक म्हणून काम करत होते. त्यामुळे दत्तात्रेयांचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडेच झाले. सातव्या-आठव्या वर्षांपासूनच दत्तात्रेय कीर्तनांना संवादिनीची साथ करू लागले. त्यांची संगीतातील प्रगती पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा जंगम, पं. दत्तोपंत काळे यांच्याकडे संगीतशिक्षणासाठी पाठविले. इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी १९३० मध्ये त्यांना पुढील शास्त्रशुद्ध संगीत शिक्षणाकरिता पुण्याला विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे पाठविले. पुण्यात असताना गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद, संगीतरत्न आणि अलंकार या परीक्षांमध्ये काणेबुवा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना यशवंतबुवा मिराशी यांचीही तालीम पाच वर्षे मिळाली. १९५५ साली आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक विलायत हुसेनखाँसाहेब यांच्याकडे त्यांनी रीतसर गंडा बांधून एक गंडाबंद शार्गीद म्हणून गाण्याचे शिक्षण सुरू केले.

अत्यंत सुरेल, उत्तम स्वरलगाव असलेला लवचिक आवाज काणेबुवांना लाभला. ग्वाल्हेर व आग्रा घराण्याच्या गायकीबरोबरच जयपूर व किराणा घराण्याच्या गायकीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यातून त्यांनी स्वत:ची अशी स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. शास्त्राला धरून रागगायन, दोन्ही घराण्याचा (आग्रा-ग्वाल्हेर) मेळ दाखविणारे सादरीकरण, उत्तम लयकारी आणि सुरेल ताना ही त्यांच्या गायनाची काही वैशिष्ट्ये. आकाशवाणीबरोबरच इतर अनेक मानाच्या व्यासपीठांवर त्यांच्या मैफिली झाल्या. शास्त्रीय संगीतासोबतच नाट्यसंगीत आणि भजन यांवरदेखील त्यांचे प्रभुत्व होते. १९६७ साली त्यांनी इचलकरंजीमध्ये पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ स्थापन केले. तेथे दरवर्षी पं. बाळकृष्णबुवांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व इतरही अनेक मैफिली होत असत. १९९७ साली इचलकरंजी येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

काणेबुवांना त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीत अनेक मानसन्मान लाभले. १९९३ साली औंध संगीत महोत्सवात त्यांचा सन्मान करण्यात आला. काणे कुलप्रतिष्ठानने भारतरत्न म. म. पां. वा. काणे पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल १९९५ साली  गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळाने ‘संगीताचार्य’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

काणेबुवांचे शिष्य नरेंद्र कणेकर, बाळासाहेब टिकेकर, शरद जांभेकर, शिवानंद पाटील, ह्रषीकेश बोडस, मंगला जोशी, त्यांच्या स्नुषा सुखदा काणे, मंजुषा कुलकर्णी-पाटील, मंगला आपटे, वर्षा भावे, गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचा संगीत वारसा जपला आहे. काणेबुवांच्या निधनानंतर संगीताचार्य काणेबुवा प्रतिष्ठान तसेच बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांकडून सांगली व इचलकरंजी  येथे शास्त्रीय संगीत मैफली आयोजित केल्या जातात. २००७ मध्ये काणेबुवांच्या स्मरणार्थ गुरुकुल संगीत विद्यालयाची स्थापना सांगलीत करण्यात आलेली आहे.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा