सहस्रबुद्धे, वीणा हरी : ( १४ सप्टेंबर १९४८ – २९ जून २०१६ ). हिंदुस्थानी संगीतातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका, अध्यापिका, कुशल बंदिशकार व संगीतकार. त्यांचा जन्म पं. शंकरराव बोडस व शांता या दांपत्यापोटी कानपूर येथे झाला. बालवयातच त्यांना संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांच्या मातोश्री शांताबाई कानपूरात संगीत शिकवत असत. वीणाताईंचे संगीताचे सुरुवातीचे शिक्षण वडिलांकडे व मोठे बंधू काशिनाथांकडे झाले. याशिवाय पं.भगवंतराय भट्ट, पं.वसंत ठकार व पं.गजाननराव जोशी यांचेही संगीतातील मार्गदर्शक त्यांना लाभले. त्यांनी कथ्थक नृत्याचेही काही दिवस प्रशिक्षण घेतले. त्या सतारही वाजवीत असत.

वीणाताईंचे बहुताशी शिक्षण कानपूरमध्येच झाले. त्यांनी कानपूर विद्यापीठातून संगीत, संस्कृत साहित्य व इंग्लिश साहित्य ह्या विषयांत पदवी घेतली (१९६८); तेथूनच त्यांनी संगीतालंकार ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली (१९६९); पुढे त्यांनी कानपूर विद्यापीठातून संस्कृत साहित्याचीही पदव्युत्तर पदवी घेतली (१९७९).

वीणाताईंचे वडील शंकरराव हे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य. शंकररावांनी आणि पं. लालमणी मिश्र यांनी कानपूरमध्ये गांधी संगीत विद्यालयाची स्थापना केली होती (१९४८). हे शांकर संगीत विद्यालय वीणाताईंनी समर्थपणे चालविले (१९६८ – ८४). कानपूरमध्ये सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना त्यांनी संगीताची तालीम दिली. या काळात आकाशवाणीवरही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले. १९७४-७६ या कालावधीत त्या परदेशात वास्तव्यास होत्या. त्यावेळीही त्यांनी संगीताचा रियाज प्रयत्नपूर्वक चालू ठेवला. मायदेशी परतल्यानंतर पुन्हा चिकाटीने त्यांनी आपली गायकी संवर्धित केली.

वीणाताईंचे कुटुंब १९८४ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. तेथे एस.एन.डी.टी. महाविद्यालयात त्यांनी संगीत-अध्यापक व शेवटची दोन वर्षे संगीत शाखेच्या विभागप्रमुख म्हणून कार्य केले (१९८५ ते ९०). या काळात त्यांनी संगीतातील तराण्यावर विशेष संशोधन करून ‘संगीत प्रवीण’ ही सन्मान्य डॉक्टरेट पदवी संपादन केली (१९८८). औपचारिक व अनौपचारिक अभ्यासक्रमासाठी आय.आय.टी. मुंबई येथे अभ्यागत साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी संगीताचे अध्यापन केले (२००२-०४). याशिवाय कानपूर आय.आय.टी. मध्येही त्या संगीत अध्यापक व निवासी कलाकार म्हणून कार्यरत होत्या (२००९).

वीणाताईंच्या गायकीचे मूळ घराणे ग्वाल्हेर असले तरी किराणा व जयपूर घराण्याच्या गायकीतून त्यांनी काही वेचक गोष्टी घेतल्या होत्या व त्याचे सादरीकरणही त्या मैफलींत करीत असत. सुरेल घुमारेदार आवाज, आवाजावरील दीर्घकालीन पकड, भरपूर दमसास, संगीतातील अलंकारांचे प्रभावी व सहजतेने सादरीकरण करण्याची क्षमता, गमकपूर्ण आलापी व गायकीतील बहलावे, जोशपूर्ण मांडणी, लयकारीतून दृग्गोचर होणारे तालावरील प्रभुत्व व मर्यादित हरकती-मुरक्या ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होत. अनेक उत्तम तराण्यांची निर्मिती त्यांनी केली. शिवाय अनेक अप्रचलित बंदिशींचा अभ्यास करून त्यांचे सादरीकरण त्या मैफिलीत करत. त्यामुळे त्यांच्या मैफिली नावीन्यपूर्ण होत असत. दरबारी कानडा, श्री, मल्हार असे पुरुषी आवाजांना जास्त संयुक्तिक ठरणारे रागही त्या दमदारपणे सादर करत.

वीणाताईंनी संगीतशास्त्रावर लेखनही केले आहे. नादनिनाद  हे त्यांच्या व त्यांच्या परिवारातील संगीत जाणकारांच्या बंदिशींचा समावेश असलेले पुस्तक. त्यांनी, त्यांच्या वडिलांनी आणि त्यांचे मोठे बंधू पं. काशिनाथ बोडस यांनी केलेल्या दर्जेदार संगीतविषयक लेखाचे संकलन उत्तराधिकार सांगीतिक परंपरा : कुछ विचार  या पुस्तकात आहे. त्यांच्या गायनाच्या सुमारे ५० सी. डी. विविध नामवंत निर्मिती संस्थांनी प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांत ख्याल, तराणा, ऋतुसंगीत, भजन इत्यादी संगीतप्रकार समाविष्ट आहेत. The Language of raga Music ही त्यांची संगीताचा परिचय करून देणारी सी.डी. होय. त्यांनी देशविदेशांतील विविध प्रतिष्ठित महोत्सवांतून आपल्या गायनाचे सादरीकरण केले आहे. स्टॉकहोम (स्वीडन) येथील कंठसंगीताच्या समारोहातील चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला. कोपनहेगन (डेन्मार्क) येथील ‘व्हॉइसेस ऑफ दी वर्ल्ड’ या संगीत समारोहात त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची प्रतिनिधी म्हणून सादरीकरण केले. देश-विदेशातील विद्यार्थ्यांकरिता त्यांनी संगीताच्या कार्यशाळा व चर्चासत्रे घेतली.

वीणाताईंचा विवाह हरी सहस्रबुद्धे यांच्याशी झाला (१९६८). ते संगणक क्षेत्रात नामवंत आहेत. या दांपत्यास लक्ष्मण व दुर्गा ही दोन अपत्ये. वीणाताईंच्या स्नुषा जयंती या वीणाताईंच्या शिष्या होत. जयंती यांनी आणि वीणाताईंचा शिष्यवर्ग सावनी शेंडे, रंजनी रामचंद्रन, उल्हास जोशी, अपर्णा गुरू यांनी त्यांचा वारसा पुढे चालविला आहे. वीणाताईंना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांमध्ये उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९९३), राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (२०१३) यांचा समावेश आहे.

वीणाताईंची डिसेंबर २०१२ मध्ये सार्वजनिक मैफल झाली. त्यानंतर त्यांना दुर्मीळ मज्जातंतू ऱ्हासाचा विकार जडल्याचे निदान झाले. या आजारामुळे त्यांची प्रकृती हळूहळू क्षीण झाली आणि पुण्यात त्यांचे निधन झाले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना ‘महामहोपाध्याय’ या सर्वोच्च पदवीने गौरविले आहे (२०१९).

समीक्षण : सु. र. देशपांडे