लक्ष्मीनारायण मंदिर नवी दिल्ली येथील चंद्रगुप्त मौर्याचा पुतळा

चंद्रगुप्त मौर्य : (इ.स.पू. ३२१—२९७). चंद्रगुप्ताचा जन्म नंद घराण्यातला. धननंद या राज्यकर्त्याच्या झोटिंगशाहीला त्रासून चंद्रगुप्ताला बराच काळ भूमिगत राहावे लागले. त्याकाळी चाणक्य (कौटिल्य) नावाचा एक अत्यंत प्रतिभावंत आणि बुद्धिमान ब्राम्हण पाटलिपुत्र शहरात राहत असे. चाणक्य अद्वितीय कर्तृत्वाचा आणि प्रगल्भ प्रज्ञेचा विचारवंत होता. त्याची तुलना विश्वातील आजतागायत उत्तमोत्तम सामरिक तज्ज्ञांशी करता येईल. चाणक्यनीती हा बुद्धिप्रामाण्यवादाचा आजच्या काळातही एक वस्तुपाठ समजला जातो. त्याची चंद्रगुप्ताशी गाठ पडल्यावर चंद्रगुप्ताची धडाडी पाहून तो अतिशय प्रभावित झाला आणि त्याला मार्गदर्शन करून त्याचे नेतृत्व विकसित करण्याचा विडा त्याने उचलला. त्यावेळी मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर हा भारतावरील स्वारी आटोपून नुकताच परत गेला होता आणि परतीच्या वाटेवरच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या प्रस्थानानंतर सत्तेसाठी त्याच्या राज्यात स्पर्धा सुरू झाली. अलेक्झांडरने भारतातील जिंकलेला प्रदेश सत्तारहित होता आणि नियंत्रणाअभावी खिळखिळा झाला होता. त्या संधीचा फायदा चंद्रगुप्ताने घेतला. सैन्याची जमवाजमव करून प्रथम त्याने पंजाब प्रांत जिंकला. या कामात त्याला चाणक्याने अमूल्य मार्गदर्शन केले. त्यानंतर मगध राज्यावर हल्ला करून त्याने धननंद राजाला ठार मारले आणि मगधराज्य चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली आले.

अलेक्झांडरनंतर सेल्युकस निकेटर राज्यावर आला होता आणि अफगाणिस्तान आणि सिंध प्रांत त्याच्या ताब्यात होता. चंद्रगुप्ताने सेल्युकसचा पराभव करून हा सगळा प्रदेश पादाक्रांत केला आणि मगध साम्राज्याचा विस्तार केला. उत्तर भारतातील इतर छोटी राज्येपण त्याने जिंकून मगध साम्राज्यात समाविष्ट केली. उत्तर भारतात राज्याची घडी बसवल्यानंतर चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य दक्खनच्या पठारापर्यंत वाढविले. कौटिल्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या राज्याची घडी आणि फौजेची संघटना भक्कम आधारावर उभी केली. सेल्युकसचा राजदूत मीगॅस्थिनीझ हा चंद्रगुप्ताच्या दरबारात वकील म्हणून इ.स.पू. ३१७ ते ३१२ पर्यंत होता. त्याच्या निवेदनानुसार चंद्रगुप्ताच्या सैन्याची संख्या साठ हजारांच्या घरात होती आणि त्यात तीस हजारांचे घोडदळ व नऊ हजार हत्ती होते. त्याने एक सक्षम हेरखाते निर्माण केले होते. त्याच्या सैन्याची पुरवठाव्यवस्था रचनाबद्ध होती. तसेच राज्याची अर्थव्यवस्था आणि करव्यवस्था सुनियोजित होती. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात चंद्रगुप्ताने जैन धर्माला आश्रय दिला. चंद्रगुप्त मौर्य याला इतिहासकार प्राचीन भारतातील पहिल्या चक्रवर्ती सम्राटाचा सन्मान देतात.

संदर्भ : 

समीक्षक – मनिषा पोळ

प्रतिक्रिया व्यक्त करा