व्योगोट्स्की, लेव्ह सेमेनोव्हिच (Vygotsky, Lev Semyonovich) : (५ किंवा १७ नोव्हेंबर १८९६ – ११ जून १९३४). प्रख्यात रशियन शिक्षणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ व तत्कालीन रशियामधील नव्या मानसशास्त्रीय विचारधारेचे प्रणेते. त्यांचा जन्म ओर्शा (रशिया) येथे सुशिक्षित कुटुंबात झाला. लेव्ह यांच्या जन्मानंतर वडिलांच्या बदलीमुळे त्यांचे कुटुंब गोमेल येथे गेले. लेव्ह यांचे वडील युनायटेड बँक ऑफ गोमेल येथे विभागप्रमुख होते.

लेव्ह यांचे प्राथमिक शिक्षण घरीच आई व एक खाजगी शिक्षक यांच्याकडून झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी तेथील सार्वजनिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. लहान असतानाच त्यांनी तोराह हा ग्रंथ वाचला. वाचनाची गती आणि उत्तम स्मरणशक्ती यांमुळे हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची शाळेत ख्याती होती. माध्यमिक शाळेत असताना त्यांना वयाच्या सतराव्या वर्षी सुवर्णपदक मिळाले होते. पदवी शिक्षणासाठी त्यांनी मॉस्को विद्यापीठात प्रवेश घेतला. सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले; परंतु नंतर ते बदलून वकिलीचे शिक्षण घेतले. शिक्षण घेतानाच त्यांनी स्वत: तत्त्वज्ञान विषयाचाही अभ्यास केला. त्याच वेळी ते लेखनही करत असत. त्यांना मुख्यत: भाषाशास्त्रात रस होता. त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे लेखन वाङ्मयीन समीक्षेच्या क्षेत्रातील होते. त्यांच्या लेखनाची सुरुवात १९१५ मध्ये लिहिलेल्या हॅम्लेट या नाटकावरील लेखाने झाली. त्यानंतर त्यांनी १९१५ ते १९२३ या काळात मुख्यत: भाषाशिक्षण व भाषेची आलोचना यांबद्दल लेखन केले होते. १९१७ मध्ये त्यांनी कायदा विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर ते साहित्य व तत्त्वज्ञान हे विषय शिकविण्यासाठी गोमेले येथे परतले. तत्पूर्वी, रशियात ‘अँटी सेमिटिक’ कायद्यामुळे लेव्ह यांच्या जमातीला शिक्षण क्षेत्रात काम करण्यास बंदी होती; मात्र १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीनंतर ही बंदी उठविली गेल्याने लेव्ह यांना ‘शिक्षक’ म्हणून काम करता येऊ लागले. अध्यापनाबरोबरच त्यांनी लेखन व मानसशास्त्राचा अभ्यास केला.

राज्यक्रांतीनंतरच्या काळात रशियन मानसशास्त्रावर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक व्हिल्हेल्म व्हुंट आणि प्रसिद्ध अमेरिकन फलप्रामाण्यवादी मानसशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ विल्यम जेम्स यांचा प्रभाव होता. लेव्ह त्यांचे विद्यार्थी बनले. या वेळी एकीकडे इव्हान प्यिट्रॉव्ह्यिच पाव्हलॉव्ह, व्हॉल्दिमीर बेख्तेरेव्ह आणि जॉन ब्रॉड्स वॉटसन हे वर्तनवादाचे खंदे पुरस्कर्ते आपले ‘उद्दीपक-अनुक्रिया’ (Stimulus-Response) यावर आधारित सैद्धांतिक विवेचन जगापुढे मांडत होते; तर दुसरीकडे, व्यूह मानसशास्त्राचे (Gestalt Psychology) प्रणेते माक्स व्हेर्थायमर, कोल्फगांग कलर, कुर्ट काफ्का आणि कुर्ट ल्यूईन हे आपली वेगळी विचारधारा प्रस्तुत करीत होते. या वातावरणात लेव्ह यांनी मानसशास्त्राच्या प्रांगणात प्रवेश केला. त्यांनी १९२४ मध्ये या क्षेत्रातील आपल्या पहिल्या शोधनिबंधाचे ऑल – रशियन सायकोन्यूरॉलॉजिकल काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनात वाचन केले. १९२५ मध्ये ‘दी सायकॉलॉजी ऑफ आर्ट’ हा त्यांचा प्रबंध प्रसिद्ध झाला. त्यांनी मॉस्को येथील सायकॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या शैक्षणिक संशोधनास सुरुवात केली आणि मानसशास्त्र व शिक्षणशास्त्र या विषयांची सांगड घालून आपल्या संशोधनाला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी आपल्या संशोधनांतून बालविकास, विकासात्मक मानसशास्त्र यांबद्दल नवे विचार मांडून मोलाचे योगदान दिले आहे.

लेव्ह यांनी प्रामुख्याने माणसाच्या शिकण्याविषयीचा ‘सामाजिक-सांस्कृतिक सिद्धांत’ मांडला. प्रत्येक व्यक्ती ही व्यापक समाजाचाच एक भाग असते व समाजसंस्कारातूनच ती घडत असते, अशी त्यांची मूलभूत धारणा आहे. मुलांच्या शिकण्यावर व विकासावर सामाजिक वातावरणाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. यात शिकविणाऱ्या शिक्षकाला आणि समाजातून मिळणाऱ्या शिक्षण संधींना फार महत्त्व असते, असे लेव्ह यांचे प्रतिपादन आहे.

शिक्षणविषयक तत्त्वे : लेव्ह यांनी आपल्या मानसशास्त्रीय विचारांतून व विवेचनातून बालके स्वत:ची ज्ञानरचना स्वत:च करतात; बालकांचा बौद्धिक विकास हा त्यांच्या सामाजिक संदर्भापासून वेगळा करता येत नाही; बालकांचे शिकणे हे त्यांच्या बौद्धिक विकासाला गती देते आणि बालकांच्या बौद्धिक विकासात भाषेचे स्थान हे मध्यवर्ती असते, ही चार शिक्षणविषयक तत्त्वे मांडली आहे.

अध्ययन-अध्यापनविषयक तत्त्वे : शालेय शिक्षणाच्या अध्ययनासंदर्भात लेव्ह यांनी ‘सामाजिक-ऐतिहासिक’ सिद्धांताद्वारे बालके कृतीतून अधिक चांगले शिकतात, बालकांनी शिक्षण घेताना स्वत:शी तसेच इतरांशी नेहमी संवाद करावा आणि बालकांना इतरांच्या साहायाने अधिक वरच्या बौद्धिक स्तरावर जाता येते ही तत्त्वे मांडली; तर शिक्षकांनी मुलांना कृतिशील उपक्रमांद्वारे व परस्पर संवादांद्वारे शिकवावे, मुलांसमोर अधिक वरच्या स्तरांवरची आव्हाने ठेवावीत आणि मुलांना विविध अनुभव द्यावेत ही अध्यापनासंदर्भात तत्त्वे लेव्ह यांनी मांडली आहेत.

अलीकडचे रचनावादी शिक्षण हे लेव्ह यांच्या सामाजिक-ऐतिहासिक-सांस्कृतिक स्वरूपाच्या विचारांशी मिळते-जुळते आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ झां प्याजे यांच्या व्यक्तिगत दृष्टिकोणाला त्यांनी सामाजिकतेच्या दृष्टिकोणाची जोड दिली. यामुळे आकलनशास्त्राच्या विकासात एक पुढचे पाऊल पडले. आज सामान्यत: या दोन्ही दृष्टिकोणांचा समन्वय हा अधिक मान्यता पावलेला आहे. शिकणे व विकास यांच्या संबंधाबाबतची लेव्ह यांची भूमिका स्पष्ट आहे. या दोन प्रक्रिया एकत्र जात नाहीत, तर आधी शिकणे आणि मग त्यानंतर विकास होत जातो.

लेव्ह यांच्या मानसशास्त्रीय लेखनातून अनेक नव्या संकल्पना पुढे आल्या आहेत. लेव्ह यांची एकूण विचारधारा समजावून घेण्यासाठी या संकल्पना लक्षात घ्याव्या लागतात. यांतील शिक्षणाच्या अनुषंगाने असलेल्या काही महत्त्वाच्या संकल्पना पुढीलप्रमाणे :

विकासाचे समीपवर्ती क्षेत्र : मुलांचे शिकणे आणि मुलांचा बौद्धिक विकास यांमध्ये संबंध बांधणारी किंवा मुलांचे स्वत:हून शिकणे आणि इतर अधिक वरचढ व्यक्तींकडून शिकणे यांतील फरक समजावून सांगणारी दैनंदिन व्यवहारात अत्यंत उपयुक्त ठरणारी ही संकल्पना आहे. लेव्ह यांच्या मते, ‘मुलांच्या विकासाचे दोन स्तर असतात. एक, विशिष्ट बालकाच्या नैसर्गिक विकासचक्रानुसार अस्तित्वात येणारा स्तर. ही बालके स्वप्रयत्नाने विकासाच्या वेगवेगळ्या स्तरांपर्यंत पोचू शकतात. दोन, अन्य व्यक्तींच्या साहाय्याने विकासापर्यंत पोहोचणारा स्तर. अशा बालकांना विशिष्ट कामात त्यांच्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रौढांची, शिक्षकांची किंवा आपल्यापेक्षा हुशार विद्यार्थ्यांची मदत घ्यावी लागते. तेव्हाच ते वरच्या विकासस्तरावर पोहोचू शकतात.’ लेव्ह यांनी मांडलेल्या दोन स्तरांतील अंतराचे वर्णन ते ‘विकासाचे समीपवर्ती क्षेत्र’ असे करतात. त्यासंदर्भातील आकृती खालील प्रमाणे आहे.

 

‘उच्च स्तरावरील विकास साध्य करण्यासाठी परस्पर संवाद हे तंत्र खूप उपयोगी ठरते. विशेषत: विस्कळीत, असंघटित आणि उस्फूर्त स्वरूपाच्या बालकांच्या संकल्पनांना तार्किकतेकडे व बुद्धिनिष्ठ विचारांकडे वळविण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी परस्परसंवाद हे एक महत्त्वाचे साधन ठरू शकते’, असे लेव्ह यांनी मत मांडले आहे.

सांस्कृतिक मध्यस्थी व आत्मसातीकरण : बालकांच्या शिकण्यात आणि विकासात सांस्कृतिक मध्यस्थी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. विशेषत: मुला-मुलांमधील, मुले व शिक्षक यांमधील किंवा मुले व अन्य संबंधीत प्रौढ यांमधील परस्परसंवाद, संस्कृतीतील ज्ञान आत्मसात करण्यास साहाय्य करीत असते. बालकाच्या पातळीवर ज्ञान आत्मसात होणाऱ्या या प्रक्रियेस आत्मसातीकरण ही संज्ञा लेव्ह यांनी वापरली आहे. अगदी लहान वयात चेंडू झेलणे किंवा सायकल चालविणे याचे आकलन होणे, ते कौशल्य अंगी येऊन कालांतराने त्यात तज्ञता प्राप्त होणे म्हणजेच बालकात आत्मसातीकरणाची प्रक्रिया घडून येणे होय. अशाच प्रकारे बालके प्रौढांकडून रूढी, परंपरा, विशिष्ट सवयी, मुख्यत: भाषा, लिहिणे-वाचणे, गणन, सभ्यतेचे नियम इत्यादी गोष्टी आत्मसात करीत जातात.

भाषा आणि विचार : भाषा विकास आणि विचार यांमधील परस्परसंबंध कसा असतो, याविषयी लेव्ह यांनी १९३४ मध्ये थॉट अँड लँग्वेज हा ग्रंथ लिहिला; मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित झाला. या ग्रंथात भाषा व विचार यांबाबत वेळोवेळी लिहिलेले त्यांचे लेख एकत्र करण्यात आले आहेत. या ग्रंथात भाषांविषयी आणि भाषा व विचार यांमधील परस्पर संबंधाविषयी लेव्ह यांनी खूप सखोल विवेचन केले आहे. याविषयी जेरोम ब्रुनर यांनी ग्रंथाची ओळख करून देताना म्हटले आहे की, ‘थॉट अँड लँग्वेज या ग्रंथाचा मुख्य विषय विचार व भाषा यांमधील संबंध हा असला तरी, अधिक खोलात जाऊन पाहिले असता हा अत्यंत मूलभूत आणि विचारगर्भ अशाप्रकारचा बौद्धिक विकासाचा सिद्धांत आहे.’ लेव्ह यांची विकासविषयक संकल्पना म्हणजे एक शैक्षणिक सिद्धांत आहे.

भाषा आणि विचार यांचा संबंध बांधताना लेव्ह यांनी ‘मूकभाषा’ ही ‘मुखभाषे’पेक्षा गुणात्म दृष्ट्या वेगळी असते, असा दोहोंत फरक केला आहे; मात्र विचारांशी संबंध बांधताना त्यांनी वाणी या संज्ञेत दोनही प्रकारच्या भाषांचा समावेश केला आहे. त्यांच्या मते, ‘मूकभाषा ही मुखभाषेतूनच आत्मसातीकरणाच्या प्रक्रियेद्वारे विकसित होते.’ बालक आपल्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत भाषेचा आणि त्यापूर्वीची न कळणारी बडबड, रडणे इत्यादींचा एक साधन म्हणून वापर करीत असतो. या वेळी तो स्वत:शी मोठ्याने बोलत असतो आणि कालांतराने त्याचे हे बडबडणे ‘मूकभाषा’ बनत असते. त्याचे ‘स्वत:शी बोलणे’ म्हणजेच, मोठ्या आवाजातील – मुखभाषेतील विचार करणे होय. थोडक्यात, ‘मुखभाषा म्हणजे शब्दांनी मांडलेला विचार होय; तर मूकभाषा म्हणजे मुखभाषेचे रूपांतर अंतर्गत विचारांमध्ये करणे होय’ असे लेव्ह यांचे मत आहे.

रशियाच्या नव्या राजवटीमध्ये आणि विषयक्षेत्रांतर्गत शत्रूंमुळे लेव्ह यांना अखेरच्या काळात मोठ्या टिकेला तोंड द्यावे लागले. त्यांच्या थॉट अँड लँग्वेज या पुस्तकावर रशियात १९३६ मध्ये बंदी घातली गेली, ती १९५६ मध्ये उठविली. त्यानंतर १९६२ मध्ये या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध होऊन पाश्चात्त्य भागात उपलब्ध झाली. लेव्ह यांचे विद्यार्थी ल्यूरिया आणि लिआँटिव्ह यांनी १९५८ मध्ये त्यांच्या ग्रंथाचा जर्मन भाषेतून परिचय करून देताना या काळातील मानसशास्त्रीय क्षेत्राचे नेमके वर्णन केले आहे. त्यांच्या मते, ‘एकीकडे प्रसिद्ध पावलेल्या वर्तनवादी विचारसरणीतून मुक्त होतानाच, दुसरीकडे मनाचा शोध घेऊ पाहणाऱ्या आत्मशोधन पद्धतीलाही नाकारले जात होते. अशा परिस्थितीत लेव्ह यांनी मुलांच्या आकलनविषयीचे आपले स्वतंत्र सिद्धांत मांडले. त्यामुळे बंदी असूनही त्यांच्या थॉट अँड लँग्वेज या ग्रंथाचा प्रभाव मानसशास्त्राच्या क्षेत्रात वाढता होता.’

खेळाचे मानसशास्त्र : लेव्ह यांनी बालकांच्या खेळाकडे एक मानसशास्त्रीय घटना म्हणून पाहिले आहे. खेळाचा बालकाच्या उच्च मानसिक क्रियांशी घनिष्ट संबंध असतो. बालके खेळ आणि वस्तू यांमधील अर्थ अमूर्त पातळीवर समजावून घेत असतात. उदा., बालकांना घोड्यावर बसावेसे वाटणे, त्यासाठी काठीचा घोडा करून त्यावर दोन्ही बाजूस पाय टाकून बसणे, घोडा पिटाळणे इत्यादी. बालक हा कल्पना करणे शिकतो आणि आपली इच्छा अमूर्त कल्पनेद्वारे पूर्ण करीत असतो. ही कृती जाणीवपूर्वक केलेली असून ती बालकांच्या प्रत्यक्ष कृतीतून साकारते. कालांतराने बालक प्रत्यक्ष कल्पनेच्या पातळीवर जातात. त्यामुळे त्यांना या वस्तूंची गरजही लागत नाही. लेव्ह यांच्या मते, ‘खेळाचा व्यावहारिक फायदा सांगितला असून खेळांद्वारे बालके सामाजिक नियम जाणीवपूर्वक आत्मसात करायला आणि पाळायला शिकतात. त्यांनुसार आपल्या वागणुकीला वळण लावतात.’ लेव्ह यांनी बालकाच्या नैसर्गिक विकासाचा वेध घेतला आहे. व्यक्तिव्यक्तीमंधील परस्परसंबंध आणि एकूण संस्कृती यांचा बालकाच्या विकासप्रक्रियेत व घडणीत मोठा वाटा असतो, हे त्यांनी अधोरेखित केले.

लेव्ह यांचा १९३४ मध्ये मॉस्को येथे अचानक मृत्यू झाला. १९२४ ते १९३४ या केवळ दहा वर्षांच्या कालावधीत त्यांच्या संशोधनात्मक लेखनाचे सहा खंड प्रकाशित झाले आहे. त्याच बरोबर त्यांनी पुढील ग्रंथांचे लेखन केले : दी सायकॉलॉजी ऑफ आर्ट (१९२५); एज्युकेशनल सायकॉलॉजी (१९२६); एप, प्रिमिटीव्ह मॅन अँड चाइल्ड : एस्से इन दी हिस्ट्री ऑफ बिहेवियर (१९३०); दी डेव्हलपमेंट ऑफ स्पीच (१९३१); थॉट अँड लँग्वेज (१९३४) इत्यादी.

समीक्षक : अनंत जोशी