लोकनाट्य आणि लोकवाद्य. आदिवासी होळीच्या वेळी तारपा, मादळ, ढोल, डेरा, थाळी अशा वाद्यांच्या साथीने होळी साजरी करतात. मादळ हा आदिवासींचा वादनप्रकार असून मादळ या वाद्यनामाने मादळ हे आदिवासी नाटक ओळखले जाते. डाका, काठा, घांगळी, थाळगाणे, डेरा, तारपा, ढोल आदी वाद्यांच्या नावाने जसे आदिवासी नृत्यप्रकार ओळखले जातात, तसेच मादळ हा वाद्यनामाने ओळखला जाणारा नाट्यप्रकार आहे. मादळ या वाद्याच्या साथीने, व या वाद्यालाच देवता मानून मादळ नाट्यप्रकार सदर होतो.तसेच मादळ किंवा मांदळ ही संज्ञा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात आहे (१३२ ओवी).

महाराष्ट्रातील जव्हारच्या आदिवासी भागात मादळ हे वाद्य प्रामुख्याने आढळते. पखवाजापेक्षा लांबीने अधिक असणारे मादळ हे वाद्य साधारणतः 32इंचलांबीचे, मधला घेर २६ इंच, आणि दोन्ही तोंडे एकाच व्यासाची साधारण ९ इंच व्यासाची असतात.शिवणी, मोघळ, धामण, वरस, कळंब आदी झाडांच्या खोडापासून मादळ बनविला जातो.महाराष्ट्रातील आदिवासींच्या क-ठाकूर व म-ठाकूर या जमातींपैकी क-ठाकूर तसेच वारली, कोकणा या जमातींमध्ये मादळ प्रचलित आहे. मादळ हे अवनद्ध प्रकारातील वाद्य आहे. मृदुंग आणि मादळ दोन्हींची प्रकृती एक पण वादनशैली मात्र भिन्न आहेत.मादळ वाद्य, मादळ नाट्यासाठीगळ्यात घालून हाताची बोटे व तळवा यांचा वापर करून वाजविले जाते. या हेतूने वाद्याची लांबी अडीच फुटांपर्यंत ठेवले जाते. मादळपेक्षा कमी लांबीचे वाद्य मणिपूरमध्येही लोकप्रिय असून पुंग ढोल चोलम असे त्या वाद्यवादन प्रकारास म्हटले जाते.मध्य प्रदेशातील बस्तर भागातील माडिया जमातीचे आदिवासी तरूण ‘घोटूल’ किंवा गोटूल या सायंकालिन मनोरंजन प्रकारात मांदर नावाचे वाद्य वाजवितात व लिंगो पेन देवतेची पूजा करतात. तरूण आणि तरूणी एकमेकांना आकर्शित करण्यासाठी खेळ आणि नृत्ये करतात. मांदर हे वाद्य वाजविले जाते व ते काठीने वाजवितात. राजस्थानातील भिल्ल, मीना या आदिवासी जमातीत लग्न वरातीत, वीरश्रीयुक्त नृत्यासाठी मादळ हे वाद्य काठीनेवाजविले जाते त्याला थाळी वाद्याची जोड द्यावी लागते. हे नृत्य मादळथाळी नृत्य म्हणूनओळखले जाते.

मादळ या नाट्यप्रकारावर भाष्य करताना डॉ. रमेशकुबल म्हणतात,‘‘मादळ भवानी मातेचे प्रतीक आहे. ज्या आदिवासी जमातीत मादळ प्रथा आहे, अशा आदिवासी पाड्यावरच मादळ वाद्य असते. तेही एका पाड्यावर एकच आणि मादळ वादकही बहुदा एकच. मगशीर (मार्गषीर्श) ते वैशाख हा मादळ कार्यक्रमाचा मोसम. हा मोसम सुगीचा, तसाच लग्नाचाही. मार्गशीर्ष महिना उजाडला की मादळी (मादळ वादक) मादळ वाद्याची डागडुजी करतो. पावसाळ्यात वाद्याचे कातडे खराब झालेले असले, तर नवीन चढवून वाद्य सजवितो. त्याची हळद, कुंकू, गुलाल, फुले वाहून पूजा करतो. भंडारा उधळतो. गोड्यातेलाच्या पंचारतीने ओवाळतो. मादळरूपी भवानी मातेला कोंबडा बळी देतो. हे सारे मादळ वादक सर्वांच्या साक्षीने, स्वखर्चाने करतो. मादळ हीच भवानी माता आहे, या श्रद्धेने करतो. मादळ एकदा सजविले की ते किमान बारा गावात (पाड्यांवर) फिरविले पाहिजे. त्याचे कार्यक्रम केले पाहिजेत. मादळ मातेचा/भवानी मातेचा बारा गावांत फेरा झाला पाहिजे. त्याचे कार्यक्रम केले पाहिजे. मादळ आपल्या पाड्यावर आले की पाड्यावर सुखसमृद्धी नांदते अशी आदिवासींची समजूत आहे. तसे केले नाही तर भवानी मातेचा कोप होतो. पाड्यावर संकटे येतात अशी समजूतही दृढ होती. अलिकडे ती थोडी मागे पडत आहे.

वैशाख महिन्यापर्यंत मादळाचे कार्यक्रम होत राहतात. वैशाख महिना संपला की लग्नमोसमही संपतो. मादळाचे कार्यक्रम बंद होतात. मोसमाच्या शेवटी पुन्हा मादळाची पूजा होते. ओवाळणी होते. कोंबडा बळी दिला जातो. पुढील वर्षाचा मोसम सुरू होईपर्यंत मादळ सुरक्षित जागी ठेवून दिले जाते. त्यानंतर वर्षभरातील सणासुदीला मादळ वाद्याला नैवेद्य दाखविला जातो. वैशाख महिन्याच्या कोणत्याही मंगळवारी कोंबडे कापून देवीला रक्त अर्पण करतात.

मादळ हा केवळ नृत्य प्रकार नसून स्वतःची नाटय संहिता आणि स्वतंत्र रंगरूप असलेला नाट्यप्रकार आहे. गायन, वादन, नृत्य नाटय या सर्व घटकांचा समग्र आविष्कार मादळ मध्ये बघायला मिळतो. त्याचे स्वरूप लग्नात सादर करावयाचा नाटयात्मविधी असे असल्या मुळे मादळ हे विधी नाटय आहे. मादळ नाटक करमणूक प्रधान असले तरी वधुवरांना पतीपत्नीच्या नाते संबंधातून जीवनमार्ग दाखविणे, चालीरीती समजावून सांगणे संस्कृतिची जपणूक करणे, आपल्या आराध्यदेवतेचे पूजन व दर्शन घेणे करमणूक करणे इत्यादी बरोबर नवसर्जन विधी हे मादळ नाटकाचे प्रयोजन मानले गेले आहे. मादळ हे विशिष्टआदिवासी नाटक आहे. या नाटकाच्या रंगमंच घटकांचे भरताच्या नाटय शास्त्रातील रंगमंच घटकांशीकाही प्रमाणात साम्य असले तरी मादळची रचना सर्वस्वी वेगळी आहे.

दिवसा उजेडी सादर करावयाचा नाटय प्रकार असणारया  मादळची नाटय संहिता लिखित नसून मौखिक, मुक्त संहितेचे असते. लोकाविष्कारी नाटय प्रकारच्या मौखिक शब्दसंहिते प्रमाणे मादळ नाटकाच्या संहितेचे स्वरूप अतिशय लवचिक असते. प्रास्ताविक, नमन, भवानी स्तवन, पूजा विधी, सत्वपरीक्षा, गीत, विगुत आणि मादळ समाप्ती गीत असे मादळ नाटय संहितेचे मूळ रूप असते. नवसर्जनाचे प्रतिेक म्हणून लग्न मंडपातच मादळ विधी संपन्न होतो. हा विधी नवरा नवरीला लग्न मंडपात विशिष्ट ठिकाणी एकत्र बसवून त्याच्या सह संपन्न होतो. हा विधी लग्न मादळ नाटय संहितेचा पूर्वरंग असतो. त्या नंतर सादर होणारया मादळ नाटयाच्या विविध विगुती(विधि) या विधिनाटयाचा उत्तररंग असतो.

विगुती इतकेच गीत गायन हे मादळ नाटकाचे महत्वाचे अंग आहे. गीत गायना मुळे मादळ नाटकाचे रंग अधिक खुलतात. त्यामुळे मादळ नाटकाचा गद्य संवाद रूपातील अविष्कार जितका सौंदर्यपूर्ण असतो, तितकाच गीत संगीत आणि नृत्याभिनयाची जोड प्राप्त होताच सौंदर्यपूर्ण बनतो.

मादळ नाटयात हगेरीची विगुती, पान्हेरीची विगूती, फांटेरीची विगुती, राखाडीची सोंग, सीकारीची विगुती, नवरीचं मोल, हळदीचं मोल, बाळशिंगाच मोल, कापडाचं मोल, पोशाच मोल, नवरीचं सोंग, लग्न विगुती, वीरभद्र विगुती, मादळ मोडायची विगुती अशाविगुती (कथाप्रसंग) असतात. या चौदा पारंपरिक विगुती आणि गायली जाणारी विगुत गीते यांनी सिध्द होणारी संहिता हिच खरी लग्न मादळ नाटकाची संहिता होय. या वेळी सादर होणार्याविगुतींना सांधणारी गीते मुख्य गायकाच्या इच्छेनुसारच गायली जातात. दशावतार, लळित, नमनखेळे, तमाशा, पंचमी, बोहाडा, दंडार या परंपरागत लोककलांसारखीचे मादळ हे आदिवासी विधीनाटय आपले पारंपरिक महत्व अजूनही टिकवून आहे. इतर लोकनाटय प्रकारांसारखेच रंजनपर आणि भक्तिमूलक असले तरी इतर आदिवासी नाटय प्रकारांहून ते सर्वस्वी वेगळे आहे त्याला स्वतःचा आकृतिबंध आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा