सारंगी : (किनरी). भारतात प्राचीन काळापासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वच प्रांतात कमीअधिक प्रमाणात वापरले जाणारे वाद्य. त्याला किनरी असेही म्हणतात. काळाप्रमाणे त्यात बदल होत गेले आणि विविध प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ते प्रचलित झाले. सारींदा, सारंगी, अलाबु, एकतारी, सारंगा, अशा विविध नावांनी ते ओळखले जाते. खान्देशात ते सारंग किंवा सारंगा या नावाने ते ओळखले जाते. विशेषतः जळगाव, धुळे जिल्ह्यात वैदू, जोशी, जोगी या भटक्या जमातीतील काही कलावंतांनी ही कला प्राणपणाने जपून ठेवली आहे.
सारंगा हे वाद्य बनवतांना साधारणतः दीडदोन फूट उंचीची गोलाकार शिसम किंवा सागाची काठी वापरली जाते. तिच्या खालच्या टोकाला मोठ्या नारळाची रिकामी अर्धगोलाकार करवंटी बांधली जाते. काही भागात वाळलेल्या भोपळ्याची करवंटी देखील वापरतात. (त्यातून सूर उंच व स्पष्ट निघतात). करवंटीतून लाकडी कांब छिद्र पाडून आरपार काढली जाते. या करवंटीवर घोरपडचे चामडे कमावून चढवले जाते. त्यासाठी उडीदाचे पीठ शिजवून गोंद बनवली जाते. बाकीच्या भागावर रंगीत कापड चढवले जाते. आता या करवंटीला तुंबा म्हणतात. तुंब्याच्या खाली दोन तार बांधतात. तुंब्यावरील चामड्यावरून हे तार काठीच्या वरच्या टोकावर दोन छिद्र पाडून त्यात सरकत्या खुंट्याना मेरुवरून बांधले जातात. तार खुंट्याना पिळतांना तुंबीवरील चामड्यावर लाकडाची बारीक तरफ सरकवली जाते. खुंट्याना दोन नक्षीदार चंची बांधतात. एका चंचीत मेणाचा गोळा असतो तर दुसरी चंची कुण्या रसिकाने बिदागी म्हणून काही पैसे दिले तर ते ठेवण्यासाठी असते. या तारांवर घासण्यासाठी दीडफूट धनुष्याकृती वेताची काठी असते. तिच्या दोन्ही टोकांना घोड्याच्या शेपटीच्या केसांनी बांधले जाते. या काठीला गजाला तर केसांना माया म्हणतात. या केसांवर मेण घासले जाते त्यामुळे तारांशी घर्षण होतांना विशिष्ट तारसुरातील ध्वनी निर्माण होतात. त्या ध्वनिंना एक किनार असते म्हणून या वाद्याला किनरी असेही नाव दिले असावे. हे ध्वनी कर्कश न वाटता कर्णमधुर वाटतात त्याची उंची बरीच असते. या गजालेवर मंजुळ ध्वनी निर्माण करणारे घुंगरू बांधले जातात.
तुंबी डाव्या हातात व गजाला उजव्या हातात घेत खांद्यावर झोळी अडकवून हा कलावंत गावात शिरतो. दारोदारी फिरतांना पारंपरिक लोकगीतांचा खजिना उलगडत आबालवृद्धांपर्यंत कुतूहलाचा विषय ठरतो. त्याच्या रचना पारंपरिक असतात. रामायण, महाभारत तसेच पौराणिक कथांमध्ये तो जितका रमतो तितकाच सामाजिक विषयांना देखील जाऊन भिडतो. सामाजिक प्रश्न हाताळतांना घर कुटुंबातील नात्यांची घट्ट वीण मजबूत व्हावी यावर देखील त्याचा कटाक्ष असतो. अहिराणी व मराठी या दोन्ही भाषांवर त्याचे कमालीचे प्रभुत्व असते. या कलावंताचे सर्वात मोठे भांडवल म्हणजे त्याच्या आवाजातील गोडवा. घरोघरी फिरतांना अनेक ठिकाणी वारंवार पाणी प्यावे लागते ; पण त्यामुळे आवाज फाटला असे कधी होत नाही. गजाला तुंबीवर फिरवतांना डाव्या बोटांनी तारांवर विशिष्ट दाब देऊन सप्तसुरांचे अधिराज्य सुरू होते. त्या सप्तमंत्रकांमध्ये जणू त्याचे भान हरपून जाते. ठेका घेत सहज बाहेर पडणाऱ्या सुरांमध्ये त्याच्या आवाजाची लकेर अशी बेमालूमपणे मिसळते की गाणारा अन ऐकणारा ही विरघळून जातो. त्या गाण्याला मधासारखा गोडवा असतो. प्रत्येक वेळी यमक साधलाच पाहिजे असे काही बंधन नसते. आवाजाची तरलता आणि बोटांच्या नखांनी तारेवर दिलेला विशिष्ट दाब यावर सगळा खेळ अवलंबून असतो. अत्यंत विषम परिस्थितीतही अनेक कलावंतानी या कलेचे जतन केले असल्याचे आढळते.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन