अभिषेकी, जितेंद्र : (२१ सप्टेंबर १९२९ / १९३२ ॽ – ७ नोव्हेंबर १९९८). एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ. त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे; पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळुबुवा यांचे पुत्र म्हणून आडनाव अभिषेकी झाले.

अभिषेकींचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे झाला. त्यांचे वडील भिकाजी कीर्तनकार होते. वडिलांना कीर्तनात लहानपणी साथ केल्याने स्वर, ताल, लय व उच्चार यांची त्यांना चांगली जाण आली. संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांनी जितेंद्रांना दिले. संगीताबरोबर संस्कृत भाषाही त्यांना शिकविली. बांदिवड्याच्या गिरिजाबाई केळेकर या त्यांच्या पहिल्या गुरू. शालेय शिक्षणासाठी १९४३ साली ते पुण्यात आले. १९४९ मध्ये ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मराठी, कोंकणी, पोर्तुगीज, इंग्रजी आदी भाषा त्यांना अवगत होत्या. पुण्यात नरहरबुवा पाटणकर व यशवंतराव मराठे यांच्याकडे ते गाणे शिकले. तेथून ते बेळगावला गेले व तेथे पेटीवादक विठ्ठलराव कोरगावकरांकडून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. पुढे भवन्स कॉलेज, मुंबई येथून संस्कृत विषय घेऊन ते बी. ए. झाले (१९५२).  मुंबई आकाशवाणी केंद्रात कोंकणी विभागात संगीत संयोजक म्हणून ते रूजू झाले (१९५२). नोकरी करीत असतानाच उस्ताद अझमत हुसेन खाँसाहेब यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना मिळाली. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर (१९५९) ज्येष्ठ गायक जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्याकडून त्यांना दीर्घकाळ तालीम मिळाली. याबरोबरच अभिषेकी यांनी निवृ्त्तीबुवा सरनाईक, रत्नाकर पै, अझिझुद्दीन खाँ, मास्टर नवरंग, केसरबाई बांदोडकर इत्यादींकडून मार्गदर्शन घेऊन आपली गायकी अधिक समृद्ध केली. त्यानंतर त्यांनी गुलुभाई जसदनवालांकडून जयपूर घराण्याच्या गायकीची काही वैशिष्ट्ये आत्मसात केली. विविधांगी व्यासंगामुळे आपली अशी स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. गमकयुक्त स्वरावली, प्रतिमेचा स्वतंत्र आविष्कार, उत्कट, भावनापूर्ण आणि सौंदर्यप्रधान प्रस्तुती, रागभावाला आणि रागस्वरूपाला योग्य स्वराकृती देत केलेले आम आणि अनवट रागांचे गायन आदी गोष्टींमुळे त्यांचे सादरीकरण अविस्मरणीय होत असे.

भावपूर्ण आवाजातील सुंदर व संथ अशी आलापी, मोकळा, स्वच्छ व दीर्घकाळ लावलेला षडज्, अप्रतिम लयकारी, आग्रा गायकीची वैशिष्ट्ये दाखविणारी बोलबनावाची पखरण आणि मग आक्रमक गायकीचा प्रभावी आविष्कार, शब्दांची फेक, भरपूर दमसास व त्याच दमसासाने जाणारी तनाईत ही त्यांच्या ख्यालगायकीची गुणवैशिष्ट्ये होत. मैफलीत ते विशेषकरून अनवट रागांतील (उदा. खोकर, जैत, चारुकेशी, कौंसगंधार, मिश्र शिवरंजनी इत्यादी) नवनव्या बंदिशी सादर करीत असत. ‘श्यामरंग’ या टोपणनावाने त्यांनी विविध रागात बंदिशी केल्या.

अभिषेकी अगदी सहजपणे नाट्यगीते, अभंग, भावगीत, ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा आदी उपशास्त्रीय प्रकार रंगवीत. स्पष्ट उच्चारण पद्धतीने विशिष्ट शैलीत ते अभंग म्हणत. त्यांची अभंग गायनाची पद्धती चित्तवेधक होती. त्यांच्या या गायनात वारकरी संप्रदायाप्रमाणे नामसंकीर्तनाची छटा अधिक असे. ते नाट्यगीते शांत, सुंदर व एका विशिष्ट्य लयीत आणि अर्थानुकूल चालीत म्हणत.

नाट्यसंगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची असून तीमुळे मराठी नाट्यसंगीताला मनोहारी वळण मिळाले. त्यांनी मत्स्यगंधा, ययाती, देवयानी, कट्यार काळजात घुसली, हे बंध रेशमाचे, धाडिला राम तिने का वनी, लेकुरे उदंड जाहली  इत्यादी सतरा नाटकांतील पदांना सुरेल चाली लावल्या. हे करताना त्यांनी जुन्या पारंपारिक रागांऐवजी नवीन रागांमध्ये (उदा. गावती, बिहागडा इत्यादी) चाली गुंफल्या आहेत. पद गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला साजेल अशा रीतीने या चाली दिलेल्या आहेत. वृंदगानाचाही प्रयोग त्यांनी केला होता. त्यात चाळीस गायक-गायिकांनी नोमतोम, धृपद, धमार, मध्यलयीतील ख्याल, ठुमरी, टप्पा, लोकगीते व तराणा हे प्रकार सादर केले होते. त्यांच्या सर्व प्रकारच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आहेत.

त्यांनी लोणावळा या गिरीस्थानात गुरुकुल पद्धतीने सुमारे दहा वर्षे संगीताचे शिक्षण दिले. पुढे पुण्यात स्थायिक झाल्यावरही (१९८७) त्यांनी काही शिष्यांना गुरूकुल पद्धतीने संगीत शिक्षण दिले. शिवाय त्यांनी ‘तरंगिणी प्रतिष्ठान’ हा विश्वस्त न्यास स्थापण्यात पुढाकार घेतला. होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वृद्ध कलावंतांना मदत आदींसाठी हा निधी होता. होमी भाभा संशोधन केंद्राकडून ‘लोकनाट्यातील संगीत’ या विषयावरील संशोधनासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याद्वारे त्यांनी प्रदेशपरत्वे कुडियाट्टम, मोहिनीआट्टम्, कथकळी, माच, नौटंकी, दशावतार इत्यादी लोकनाट्यातील संगीताचा अभ्यास केला. पं. रविशंकर यांच्याबरोबर ते १९७० मध्ये अमेरिकेस गेले, तेथे सुमारे पाच ते साडेपाच महिने त्यांनी ‘किन्नरम’ या त्यांच्या संस्थेत विद्यादानाचे कार्य केले.

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नीचे नाव विद्यावती असून त्यांना शौनक व मेखला ही दोन अपत्ये आहेत. त्यांचे पुत्र शौनक अभिषेकी व त्यांचे शिष्य प्रभाकर कारेकर, राजा काळे, अजित कडकडे, शुभा मुद्गल, आशा खाडीलकर, सुधाकर देवळे, देवकी पंडित, अरुण आपटे, विनोद डिग्रजकर, हेमंत पेंडसे, मोहन दरेकर, रघुनाथ फडके, विजय कोपरकर, समीर दुबळे, महेश काळे आदी त्यांची गानपरंपरा पुढे नेत आहेत.

पं. जितेद्र अभिषेकी गोवा कला अकादमीचे सल्लागार व संस्कारभारतीचे सदस्य होते. चिपळूण येथे झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते (१९९५). त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांमध्ये होमी भाभा पुरस्कार (१९६९), नाट्यदर्पण पुरस्कार (१९७८), पद्मश्री सन्मान (१९८८), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८९), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), गोमंतक मराठी अकादमी पुरस्कार (१९९२), सूरश्री केसरबाई केरकर पुरस्कार (१९९६), मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार (१९९६), स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (१९९६), बालगंधर्व पुरस्कार (नाट्य परिषद, १९९७) इत्यादींचा समावेश होतो.

पुणे येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • दरेकर, मोहन, माझे जीवन गाणे, मधुश्री प्रकाशन, पुणे.

समीक्षक – सु. र. देशपांडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

This Post Has One Comment

  1. Uday Kulkarni

    अभिषेकी बुवांसारख्या तपस्वीची विश्व कोषामध्ये नोंद होणे हे व्हायलाच हवे होते. हे महत्वाचे कार्य श्री विनोद डिग्रजकर यांच्या कडून पार पडले त्याबद्धल त्यांचे अभिनंदन.
    तसेच श्री मोहन दरेकर यांनी माझे जीवन गाणे हे पुस्तक लिहून अतिशय मौल्यवान कार्य केले आहे.

Uday Kulkarni साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.