रित्ती, श्रीनिवास हनुमंतराव : (८ जून १९२९ – १५ ऑगस्ट २०१८).
दक्षिण भारतातील पुराभिलेख तसेच प्राच्यविद्यांचे अभ्यासक व संस्कृत पंडित. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील हवेरी (धारवाड तालुका) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हवेरी येथील नगरपालिका शाळेत झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये झाले. १९५० मध्ये संस्कृत व कन्नड विषय घेवून ते पदवीधर झाले. यासाठी त्यांना ‘कन्नड रिसर्च इन्स्टिट्यूटʼची शिष्यवृत्ती मिळाली. या संस्थेचे तत्कालीन प्रमुख आर. एस. पंचमुखी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. संस्कृत व प्राकृत विषयांतील पारंगत पदवी त्यांनी प्राप्त केली (१९५२).
रित्ती यांनी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या कायदा विभागात भाषांतरकार म्हणून नोकरी केली (१९५३-५५). पुढे ते उटकमंड येथील ‘ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट एपिग्राफिस्टʼ या संस्थेचे अधिकारी पी. बी. देसाई यांच्या संपर्कात आले. या संस्थेत त्यांनी ‘साहाय्यक पुराभिलेखकारʼ म्हणून नोकरी केली (१९५५–६४). येथे त्यांच्या संशोधनाला दिशा मिळाली. या काळात देसाई यांच्यासह डी. सी. सरकार, बी. एस. छाब्रा, एन. लक्ष्मीनारायण व जी. एस गई यांच्या मार्गदर्शनाखाली रित्ती यांनी ‘साउथ इंडियन इन्स्क्रिप्शनʼ या प्रकल्पांतर्गत कन्नड इन्स्क्रिप्शन खंड क्र. १५, १८ व २० साठी काम केले. द सेऊणाज या विषयावरील पीएच.डी. त्यांनी संपादन केली (१९६४). त्यानंतर धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विभागात अधिव्याख्याता, प्रपाठक, प्राध्यापक, विभागप्रमुख अशा विविध पदांवर काम करून ते सेवानिवृत्त झाले (१९६४–८९).
कर्नाटक विद्यापीठात कार्यरत असताना रित्ती यांनी संपूर्ण भारतात पुराभिलेखविद्येच्या सखोल अभ्यासासाठी व संशोधनासाठी ‘डिप्लोमा इन एपिग्राफीʼ हा अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमामुळे पुराभिलेखविद्येला लोकप्रियता लाभली व त्या अनुषंगाने या विषयातील संशोधकाची नवी पिढी उदयास आली.
‘एपिग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाʼ या संस्थेचे संस्थापक सदस्य, सचिव, कार्यकारी संपादक व अध्यक्ष या नात्याने त्यांनी या संस्थेची जबाबदारी संभाळली. कन्नड भाषेमध्ये त्यांची सात पुस्तके, विविध शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. द सेऊणाज : द यादवाज ऑफ देवगिरी (१९७३) हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ. सहलेखक तसेच सहसंपादक म्हणून त्यांनी केलेले उल्लेखनीय लेखन असे : इन्स्क्रिप्शन फ्रॉम नांदेड डिस्ट्रिक्ट (१९६८), इन्स्क्रिप्शन फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट (१९८८), इन्स्क्रिप्शन फ्रॉम कोल्हापूर डिस्ट्रिक्ट (२०००), इन्स्क्रिप्शन ऑफ विजयानगर रूलर्स (खंड : १ ते ३; २००४, २००८, २००९), एपिग्राफिया कर्नाटिका, हिस्ट्री ऑफ कर्नाटक (१९७०) इत्यादी.
रित्ती यांनी पन्नास वर्षे केलेल्या प्रदीर्घ कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली. मिथिक सोसायटी, बंगलोरतर्फे सन्मान पुरस्कार (१९८४), कर्नाटक शासनाचा राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार (२००७), तसेच गुलबर्गा विद्यापीठातर्फे डी.लिट. ही सन्माननीय पदवी (२०१०) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले.
वयाच्या ८९ व्या वर्षी धारवाड येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Padigar, Shrinivas V.; Shivanand, V. Eds., Pratnakirti : Recent Studies in Indian Epigraphy, History, Archaeology and Art (Essays in Honour of Prof. Shrinivas S. Ritti) 2 Vols., Agam Kala Prakashan, Delhi, 2012.
समीक्षक – कंचना भैसारे