कार्नाड, गिरीश रघुनाथ : (१९ मे १९३८- १० जून २०१९). जागतिक रंगभूमीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रमुख भारतीय कन्नड  नाटककार. सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.एक प्रयोगशील नाटककार, अनुवादक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ते ख्यातीप्रिय आहेत. १९६० नंतरच्या महत्त्वाच्या भारतीय नाटककारांमध्ये गिरीश कार्नाड यांचा समावेश होतो. त्यांच्या नाटकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाल्यामुळे त्यांच्या नाटकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय प्रसिद्धी मिळाली. जन्म महाराष्ट्रातील माथेरान येथे व बालपण अल्पकाळ मुंबई आणि पुणे येथे. पुढे वडिलांची बदली झाल्याने प्राथमिक शिक्षण उत्तर कॅनरा जिल्ह्यातील शिरसी येथे. बी.ए.(गणित व संख्याशास्त्र) कर्नाटक विद्यापीठ (१९५८), एम.ए.(तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र) ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड (१९६३) येथे. मुंबई विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात दक्षिणा फेलो म्हणून त्यांनी अध्ययन केले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मद्रास व्यवस्थापक (१९६३-७०), फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था, पुणे येथे संचालक (१९७४-७५),कर्नाटक नाटक अकॅडमी अध्यक्ष (१९७६ -१९७८ ), इंडो-यू.एस. सबकमिशन फिल्म्स ब्रॉडकास्टिंग व प्रेस जॉइंट मीडिया कमिटी, भारतीय सहअध्यक्ष (१९८४-९३ ), शिकागो कागो विद्यापीठात प्राध्यापक व फुलब्राईट प्लेराइट इन रेसिडेन्स (१९८७-८८), नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकॅडमी अध्यक्ष (१९८८-९३),लंडन येथील नेहरू सेंटर-संचालक, भारतीय हायकमिशनमध्ये सचिव (२००३-२००४)  ही काही महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत.

वाङ्मयीन कार्य

गिरीश कार्नाड यांनी एकूण १२ नाटकांचे लेखन केलेले आहे. त्यात ययाती (१९६०), तुघलक (१९६४), मा निषाद (१९६४), हयवदन (१९७१), काटेसावरी (१९७७), हित्तीना हुंजा (म.शी. बली, १९८०), नागमंडल (१९८८), तलेदण्ड (१९९०),अग्नि मत्तु मळे (म.शी.अग्नि आणि पाऊस १९९५),टिप्पुविन कनसुगळु (म.शी.टिपू सुलतानचे स्वप्न,२०००),ओदकलु बिम्ब (म.शी.भंगलेलं बिंब,२००४), वेडिंग अल्बम (२००६), समग्र नाटक, (२००७) इत्यादी नाटकांचा समावेश होतो. त्याचबरोबर खेळता खेळता आयुष्य (२०१३) या आत्मगताचाही त्यांच्या लेखनात समावेश आहे.याशिवाय त्यांनी बादल सरकार यांच्या एवं इंद्रजित या नाटकाचा इंग्रजीत अनुवाद केेला आहे. महेश एलकुंचवार यांच्या वासांसि जीर्णानिधर्मपुत्र या मराठी नाटकांचाही त्यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला आहे. तुघलक या नाटकाचा त्यांनी स्वतः हंगेरियन, स्पॅनिश आणि जर्मन भाषेत अनुवाद केला आहे. नागमंडल हे नाटक पोलिश भाषेत अनुवादित केलेले आहे. कार्नाड यांची सर्व नाटके ही सुरुवातीला कन्नड भाषेमधून मनोहर ग्रंथमाला, धारवाड यांनी प्रकाशित केलेली आहेत. नंतर ती इंग्रजी आणि अन्य प्रादेषिक भाषांमध्ये अनुवादित झाली.  कार्नाड यांची सर्व नाटके ही मराठी भाषेमध्येही अनुवादित झालेली आहेत. ही नाटके मराठीत अनुवादित करण्याचे काम उमा कुलकर्णी, श्रीमती सरोज देशपांडे आणि प्रदीप वैद्य यांनी केलेले आहे.

नाटकांची विचारसूत्रे

कार्नाडांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वावर भारतीय मौखिक परंपरेतून आलेल्या पुराणकथा, इतिहासकथा, कथासरित्सागरातील कथा, लोककथा, लोकधारणा इत्यादींचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे ते त्यांच्या नाटकांतून लोककथांतील घटितांना एका विलक्षण पातळीवर आणून वेगळा समांतर अन्वयार्थ देऊ पाहतात.भारतीय लोकसाहित्यातील विविध कथाबीजं, कल्पनाबंध घेऊन त्यांनी आपले नाट्यावाङ्मय समृद्ध केलेले दिसून येते.त्यांच्या नाटकांमध्ये धार्मिक विधींना कमालीचे प्राधान्य दिसून येते.मिथकांची स्वैर कल्पनाविलासी अभिव्यक्ती त्यांच्या नाटकांतून पाहावयास मिळते; अतर्क्य परंतु अर्थपूर्ण असे कल्पनाविलास त्यांच्या नाटकांतून दिसतात. लोकरंगभूमीचा उपयोग नागर रंगभूमीसाठी करण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न दिसून येतो. कार्नाडांनी त्यांच्या नाटकांतून आपलं भारतीयत्व अथवा देशीपण शोधण्याचा अभूतपूर्व प्रयत्न केलेला आहे. नाटकात कितीही प्रगल्भ विचार मांडण्याचा प्रयत्न ते करीत असले तरी ते आपल्या प्रश्नांची उत्तरे हिंदू विधि-विधानांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या नाटकांना वर्ण-वर्ग वर्चस्ववादाचे परिमाण प्राप्त झालेले पाहावयास मिळते.

भारतीय संस्कृती आणि त्यांतील मिथकांची मांडणी करणारी नाटके

ययाती या त्यांच्या पहिल्या नाटकामध्ये त्यांनी भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात महाभारतातील ययातीच्या कथानकाचा नाट्यागत विचार केलेला आहे. वयाच्या विशीत  असताना, परदेशी शिक्षणासाठी जहाजातून प्रवास करताना तीन आठवड्याांमध्ये या नाटकाचे लेखन केलेले दिसून येते.अग्नि आणि पाऊस हे नाटकही पौराणिक कथेवरच आधारलेले आहे. हे नाटक ऋग्वेदातील इंद-वृत्रासुराची कथा आणि महाभारतातील यवक्रीत आणि अर्वावसू, परावसूच्या कथेवर आधारित आहे. दोन भावांमधील सनातन हाडवैर किंवा शत्रुत्व या नाटकाच्या निमित्ताने वाचकांच्या समोर येते. दोन कथांचे संमिश्रण करून त्यांनी हे नाटक लिहिलेले आहे. या नाटकात यज्ञभूमीलाच रंगमंचाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. इंद्र-वृत्राच्या संघर्षाला ऐतिहासिक आणि आदिबंधात्मक अन्वयार्थ देण्याचा आगळा-वेगळा प्रयत्न त्यांनी त्यातून केलेला आहे. मिथकातील अलौकिकाला गाळून त्यांनी ती पात्रे लौकिक रूपात आणून त्यांच्यातील सूडप्रवृत्तीही चित्रित केेलेली आहे. सूड उगवण्यासाठी यज्ञाच्या माध्यमातून ब्रह्मराक्षस कृत्या अवतरतो. अशा अतिमानवी शक्तींचा प्रवेश आणि उपयोग हे त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य मानावे लागते. यात त्यांनी द्राविड आणि आर्य संस्कृतींमधील संघर्ष चित्रित केलेला आहे.

हित्तीना हुंजा या नाटकातून विविध धर्मांनी आणि धर्मग्रंथांनी पुरस्कृत केलेल्या लोकधारणांची, तत्त्वज्ञानाची अर्थचिकित्सा आणि त्याने प्रभावित मानवी स्वभाववृत्ती याची प्रचीती येते. हिंसेची कल्पनादेखील जगण्याची नैतिक बैठक कशी नष्ट करते.माणसाच्या मनात कशी अपराधी भावना निर्माण करते, याचे चित्रण या नाटकातून येते. पशुयज्ञामध्ये केले जाणारे विधि-विधाने, धार्मिक कृती, क्रियाकर्म यांवर या नाटकातून आक्षेप घेतला आहे. प्रस्तुत नाटकातून कणकेच्या कोंबड्यााची मिथ्यकथा चित्रित केलेली आहे.

हयवदन आणि नागमंडल या नाटकांमध्ये लोककथांचा पुरेपूर उपयोग त्यांनी केला आहे. ही नाटके वेताळपंचेविशीतील कथांवर आधारलेली आहेत. लोकरंगभूमीचा पुरेपूर वापर त्यांनी या नाटकांच्या संहितालेखनासाठी आणि सादरीकरणासाठी केलेला आहे. या नाटकांतून पुरूषप्रधान समाजव्यवस्थेतील सामाजिक,शाश्वत मूल्यांविषयीचे प्रश्न कलात्मक निर्मितीतून उपस्थित केलेले आहेत.चेहरा हेच माणसाच्या व्यक्तित्वाचं अत्युच्च परिमाण आहे, हे त्यांनी हयवदनमधून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.धड आणि मस्तक यांच्यातील सनातन द्वंद्व हा हयवदनचा विषय ठरतो. देवतांचे आगमन आणि त्यांचा मानवी जीवनातील हस्तक्षेप या नाटकाचा विषय आहे.विशेष म्हणजे मुखवट्यांना या नाटकात व्यक्तित्व प्राप्त होते. हयवदनची कथा ही शरीराच्या विसंगतीची कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नाटकात अतार्किक चित्रणही येते. नागमंडल या नाटकात लोककथेने नाट्याात्म आकार धारण केलेला दिसून येतो. स्त्री-पुरूष संबंधातील प्रश्न ही कथा उपस्थित करते.कळत्या मुलीचा योग्य वयात विवाह करणे, नवऱ्याविषयी तिचे सुयोग्य वर्तन असणे, प्रसंगी तिचे सोशिक आणि सहनशील असणे या सर्व योग्यता तिच्याकडे असणे क्रमप्राप्त आहेत, हे समाजमान्य वास्तव या नाटकातून प्रत्ययास येते.

भारतीय इतिहासाचे पुनर्मूल्यांकन करणारी नाटके

तुघलक,तलेदण्ड आणि टिपू सुलतानचे स्वप्न ही त्यांची नाटके भारतीय इतिहासाचा चिकित्सक वेध घेतात.स्वातंत्र्योत्तर काळात १९६० नंतर बदललेले भारतीय जनमानस,विविध संघटना आणि त्यांची विचारमुल्ये,सामाजिक चळवळी याची तुलनात्मक मांडणी त्यांच्या या नाटकांमध्ये दुसून येते.तलेदण्ड या नाटकात ही बाब आपणाला प्रकर्षाने जाणवते.या नाटकातून त्यांनी महात्मा बसवण्णाचे राष्ट्रीय  चारित्र्य रेखाटले आहे.भारतीय इतिहासातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचे अनेक संदर्भ घेऊन हे नाटक उभे राहते. तुघलक यां नाटकाने कार्नाडांना अधिक लोकप्रियता मिळवून दिली. टिपू सुलतानचे स्वप्न या नाटकातून टिपू सुलतानच्या राष्ट्रनिष्ठेची मीमांसा केलेली आहे. या नाटकाकडेही इतिहासनिष्ठ मिथक म्हणून पाहता येते. एका शासक व्यक्तीच्या मनामध्ये कशा प्रकारची स्वप्ने पडतात.तो त्या स्वप्नांकडे कशा पद्धतीने पाहतो; ती पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने धडपडतो याचे नाट्याात्मक चित्रण यातून घडते.या नाटकातून कार्नाड यांनी ऐतिहासिक घटनांचा स्वतंत्र अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.कार्नाडांनी या नाटकाचा संबंध हा आधुनिक भारताशीही जोडलेला आहे.

आधुनिक भारतीय जीवनपद्धतीवर भाष्य करणारी नाटके

गिरीष कार्नाड यांच्या काही नाटकांना आधुनिक पार्श्वभूमी  लाभलेली आहे.काटेसावरी, उणे पुरे शहर एक आणि वेडिंग अल्बम या नाटकांतून याचा प्रत्यय येतो.आधुनिक सभ्यतेचे परिणाम भारतीय कुटुंबव्यवस्थेवर कशा विपरीत प्रकारे झालेले आहेत, याचा विचार उपरोक्त नाटकांतून केलेला आहे. काटेसावरी या नाटकात  १९६० सालच्या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणांची कथा आलेली आहे. रूढी, परंपरा, संस्कृती एवढेच नव्हे तर धर्म, वंश यांच्याही पलीकडे जाऊन दिसणारी मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि मानवी मनाची अनाकलनीयता या नाटकांमधून कार्नाडांनी प्रभावीपणे व्यक्त केली आहे.

वेडिंग अल्बम हे नाटक आजच्या काळाबद्दलचे भाष्य करते. स्वतंत्र विचारसरणी, आधुनिकता आणि उच्च शिक्षण यांमुळे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे दुभंगलेपण, अलिप्तता आणि तरीही आपुलकीचा भास त्यात सूचकपणे मांडला आहे. एका कथानकातून अनेक कथानके उलगडत जाणारे हे नाटक समाजातील आजच्या प्रश्नाकडे  लक्ष वेधून घेते.भंगलेलं बिंब आणि पुष्पसाज हे प्रकाशित झालेले आत्मगतपर नाटक. यानिमित्ताने कार्नाड यांनी एका वेगळ्याा वाङ्मय प्रकाराची हाताळणी केली आहे. या दोहोंत एकच व्यक्तिरेखा असून तिचा स्वतःशीच चाललेला संवाद असे त्यांचे स्वरूप आहे. भंगलेलं बिंबमध्ये मंजुळा नायक हिचा आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रतिमेशी चाललेला संवाद आहे. या मोनोलॉगच्या निमित्ताने कार्नाडांनी भारतीय रंगभूमीला तंत्रदृष्ट्या एक नवे परिमाण मिळवून दिले आहे.

नाटकांचे निवेदन आणि सादरीकरण शैली

कार्नाड यांच्या बहुतांश सर्वच नाटकांमध्ये मुख्यकथा आणि उपकथा अशा दोन कथा समांतर प्रवास करताना जाणवतात. दोन्ही कथांचे प्रश्न  सारखेच असतात; परंतु उत्तरे मात्र भिन्न पातळीवर अनुभवता येतात. उदा. हयवदनमधील अश्वमुखी मुलाची उपकथा, नागमंडलमधील काळूची उपकथा इत्यादी. मुळात इतिहासात आणि पुराणात नसणारी अनेक पात्रे कार्नाड आपल्या नाटकांमध्ये जन्माला घालतात. उदा. ययातीमधील चित्रलेखा आणि अग्नि आणि पाऊसमधील नित्तिला. त्यांच्या नाटकांतील नायिका ह्या पुरूषी  मानसिकतेच्या बळी ठरलेल्या दिसतात. त्यांच्या नायिका ह्या हिंदू समाजव्यवस्थेतील स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना जाणवतात. स्त्री-पुरूष संबंधातील बदलते परिमाण या नाटकांना लाभलेले आहेत.

गिरीष कार्नाड यांनी आपल्या नाटकांच्या माध्यमांतून लोकरंगभूमीचा पुरेपूर उपयोग केलेला पाहावयास मिळतो. मंचीय पातळीवरदेखील नाटकांचे अभिनव प्रयोग आणि रंगमंचीय व्यवस्थेतही आमुलाग्र बदल केलेले दिसून येतात.विशेषतः मुखवट्याांचा वापर, लोकसंगीत, लोकनृत्यशैली, यक्षगान, दशावतारी नाट्य इत्यादी प्रादेशिक लोककलांचा वापर, बिंब आणि प्रतिबिंबांचा खेळ, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा केलेला वापर पाहावयास मिळतो. त्यांच्या नाटकातील निवेदकसुद्धा लोकनाट्याातील असल्यासारखाच जाणवतो. एकूणच कार्नाड यांनी भारतीय रंगभूमीला स्वतंत्र देशी परिमाण देण्याचा अभूतपूर्व प्रयत्न केलेला आहे.

चित्रपट व धारावाहिक यांमधील कार्य 

चित्रपट क्षेत्रातही यांनी लक्षणीय असे कार्य केले आहे. संस्कार, वंशवृक्ष, काडु, गोधुली, ओंदानोदु कालदल्लि, उत्सव, वो घर, चेलुवि, कानूरु हेग्गडति यांसारख्या चित्रपटांच्या पटकथा, दिग्दर्शन आणि त्यात त्यांनी अभिनयही केलेला आहे. याशिवाय द.रा.बेंद्रे, कनक-पुरंदर, आले में चिराग, भगवद् गीता यांसारखे माहितीपटही त्यांनी तयार केलेले आहेत. अंतराळ, स्वराज नामा, कानूरकी ठकुरानी यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी अभिनेता म्हणून काम केलेले आहे. त्यांना चित्रपटांसाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यांना फिल्म प्रतिनिधी मंडळाचे सभासदत्वही प्राप्त झालेले होते. त्याचबरोबर मद्रास प्लेयर्स , दोरे इडिपस व जोकुमारस्वामी या नाटकांमधूनही त्यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या पाहावयास मिळतात.

विविध पुरस्कार व मानसन्मान

कार्नाड यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७२), हयवदनसाठी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार (१९७२),पद्मश्री  (१९७४), नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२),तलेदंडसाठी कर्नाटक नाटक अकादमी पुरस्कार (१९९२),पद्मभूषण (१९९२),कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४), दक्षिण भारतीय पुस्तक प्रकाशन व वितरक संघाकडून पुरस्कार (१९९२) कर्नाटक साहित्य अकादमी-विषेश गौरव (१९९४), संगीत नाटक अकादमी-विशेष फेलो (१९९४), कर्नाटक सरकारचा गुब्बी वीरण्णा पुरस्कार (१९९७), भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८),मध्यप्रदेश सरकारकडून कालिदास सन्मान (१९९९) इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.कर्नाटक विद्यापीठ  (१९९४), विद्यासागर विद्यापीठ, मिदनापूर (२०१० ), रॅवनशा विद्यापीठ, भुवनेश्वर(२०११) या विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट. ह्या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

बेंगलुरु येथे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

संदर्भ :

  • भवाळकर, तारा: मराठी नाटक: नव्या दिशा, नवी वळणे, पुणे,१९९७.
  • वाघुंबरे, दिनेश, मिथकांचा रंगाविष्कार, गोदावरी प्रकाशन, अहमदनगर २०१८.
  • साळुंखे, रमेश: ‘इतिहासदृष्टी, आधुनिकता आणि टिपू सुलतानचे स्वप्न’  लेख, नव-अनुष्टुभ, मे-जून २००९. ४.
  • http://www.agdc.ac.in/pdf/resource/girish.pdf