लीकी, रिचर्ड : (१९ डिसेंबर १९४४). विख्यात केनियन पुरामानवशास्त्रज्ञ. जन्म केनियातील नैरोबी येथे. ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ लुई लीकी आणि मेरी लीकी यांचे ते दुसरे अपत्य. पूर्ण नाव रिचर्ड एरस्काइन फ्रेरे लीकी. रिचर्ड आईवडिलांबरोबर शोधमोहिमांवर जात असल्याने त्यांना बालपणीच पुरामानवशास्त्राची गोडी लागली. त्यासाठी त्यांनी शाळा सोडली. पुरामानवशास्त्रीय स्थळांचा शोध त्यांनी लहान वयातच सुरू केला, परंतु योग्य शिक्षण नसल्याने त्यांच्या कामाला मान्यता मिळत नव्हती, म्हणून ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

नॅशनल म्यूझीअम ऑफ केनियातर्फे कूबी फोरा भागात काढलेल्या शोधमोहिमेचे नेतृत्व रिचर्ड यांनी केले (१९६८). लेक तुर्कानाच्या पूर्व आणि पश्चिम किनारी भागांतील अनेक शोधमोहिमांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी जीवाश्म शोधून काढले (१९६८-६९). कूबी फोरा येथे १९६९ मध्ये मिळालेला केएनएम-इआर ४०६ हा पॅरान्थ्रोपस बॅाइसी जीवाश्म, १९७२ मध्ये मिळालेला होमो रूडोल्फेन्सिस जीवाश्म (केएनएम-इआर १४७०), १९७५-७८ मधील होमो इरेक्टस कवट्या (केएनएम-इआर ३७३३, ३८८३), तुर्काना बॉय अथवा नरियोकोटोम बॉय हा होमो इरेक्टस मुलाचा सांगाडा (केएनएम-डब्ल्यूटी १५०००) आणि १९८५ मध्ये मिळालेला पॅरान्थ्रोपस इथिओपिकसचा जीवाश्म (केएनएम-डब्ल्यूटी १७०००/ब्लॅक स्कल) हे रिचर्ड लिकींचे महत्त्वाचे शोध आहेत.

रिचर्ड यांची केनिया वाइल्डलाइफ सर्व्हिसेसच्या प्रमुखपदी नेमणूक झाली (१९८९). त्यांनी गेंडा आणि हत्तींच्या चोरट्या शिकारीला आळा घातला आणि बिघडलेली वन्यजीव व्यवस्थापन यंत्रणा सुरळीत केली. तथापि राजकीय कारणांमुळे त्यांना हे पद सोडावे लागले (१९९४). विमान अपघातामुळे १९९३ मध्ये त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले असले तरी त्यांचे काम चालूच राहिले. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि सफीना या विरोधी पक्षाचे ते महासचिव झाले. १९९७ मध्ये ते संसदेत निवडून गेले. पुढे राजकारणातून ते निवृत्त झाले (२००१). रिचर्ड प्रत्यक्ष राजकारणात नसले, तरी राजकीय न्यायासाठी काम करतात. तसेच वन्यजीव संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी व्याख्याने देतात. वन लाइफ  हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

रिचर्ड यांनी पुरातत्त्वज्ञ मार्गारेट कूपर यांच्याशी विवाह केला (१९६५). त्यांना एक मुलगी (ॲना, जन्म १९६९) झाली. कूपर यांच्याशी घटस्फोट घेऊन त्यांनी ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ मेव्ह इप्स् यांच्याशी विवाह केला (१९७०). रिचर्ड व मेव्ह लीकी यांची कन्या लुईस लीकी (जन्म १९७२) पुरामानवशास्त्रज्ञ आहे. त्या केनियात संशोधन करतात. समीरा लीकी (जन्म १९७४) ही लीकी दांपत्याची दुसरी मुलगी अर्थशास्त्रज्ञ आहे.

संदर्भ :

  • Bowman-Kruhm, Mary, The Leakeys, London, 2005.
  • Morrel, Virginia, Ancestral Passion : The Leakey Family and the Quest for Humankind’s Beginnings, New York, 2011.
  • Poynter, Margaret, The Leakeys : Uncovering the Origins of Humankind, 2001.

                                                                                                                                                                                                                          समीक्षक : शौनक कुलकर्णी