खाडीत व छोट्या आखातांत समुद्राचे खारे पाणी व भूखंडावरून येणारे गोडे पाणी यांची मिसळ होते.  नद्यांनी व समुद्रप्रवाहांनी वाहून आणलेल्या गाळांचे अशा ठिकाणी छोट्या गोट्यांत रूपांतर होऊन त्यांचे निक्षेपण होते.  हा नव्याने बनलेला भूभाग कालांतराने ओहोटीच्या वेळी उघडा पडू लागतो.  खाऱ्या पाण्यावर वाढणारे वनस्पतिप्रकार तेथे उगवू लागतात आणि या भूभागाची उंची वाढते.  या भूभागास ‘खाजण’ असे म्हणतात.

खाड्यांच्या किनारी असणाऱ्या साऱ्या दलदलीत वाढणाऱ्या वनस्पतींना एकत्रितपणे तिवरे म्हटले जाते.ही तिवरे खाडी किनारी दाट वने तयार करतात. चक्री वादळे किंवा त्सुनामीसारख्या संकटातसुद्धा तिवरे किनाऱ्याचे रक्षण करतात. तिवर वनांमुळे अनेक समुद्री जीवांचे आणि वनस्पतींचे संरक्षण होते आणि ती जैवविविधतेने समृद्ध होतात. तिवर वनांची उत्पादनक्षमता मोठी असते. जीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या परिसंस्था येथे आहेत. या वनांपासून अनेक उपयुक्त वस्तू मिळतात. व्यापारी मच्छीमारीसाठी उपयुक्त माशांची पैदास तेथे करतात. जगातील एकूण तिवर वनांपैकी भारताचा वाटा ३% आहे. सध्या भारतात एकूण भूभागाच्या ०.१४ %  भागात खाजणे आहेत. यापैकी जवळजवळ निम्मा हिस्सा पश्चिम बंगालमधील सुंदरबनांचा आहे. २०१३ सालच्या तुलनेत २०१५  साली १४२ चौ. कि.मी.ची वाढ खाजण जागेत झाली आहे.

थोमने दिलेल्या खाड्यांच्या वर्गीकरणानुसार भारतीय तिवर वनांचे  प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात : (१) त्रिभुज प्रदेशातील तिवरे, (२) खाडया –नदीमुखातील तिवरे  आणि (३) बेटांवरील तिवरे. भारताच्या पूर्व किनारपट्टीला असलेल्या गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, कृष्णा, कावेरी इ. नद्यांचे त्रिभुज प्रदेश आहेत. त्रिभुज प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण वने आढळतात. खाडयांवरील तिवरे प्रामुख्याने पश्चिंम किनारपट्टीवरील नर्मदा, तापी इ. नद्यांच्या मुखाशी आढळतात. अंदमान, निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांवर तेथील वैशिष्ट्यपूर्ण तिवर वने  आढळतात.

तिवर वनांचा २०१५ सालचा आढावा (चौ. किमी. मध्ये).

राज्य / केंद्रशासित प्रदेश जास्त घनतेच्या वनांचे क्षेत्रफळ मध्यम घनतेच्या  वनांचे क्षेत्रफळ विरळ घनतेच्या  वनांचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ
आंध्र प्रदेश १२९ २३८ ३६७
गोवा २० २६
गुजरात १७४ ९३३ ११०७
कर्नाटक
केरळ
महाराष्ट्र ७९ १४३ २२२
ओडिशा ८२ ९५ ५४ २३१
तमिळनाडू १८ ५८ ७७
पश्चिम बंगाल ९९० ७०० ४१६ २१०६
अंदमान-निकोबार बेटे ३९९ १६८ ५० ६१७
दमण आणि दीव
पुदुचेरी
एकूण क्षेत्रफळ १४७२ १३९१ १९०७ ४७७०

संदर्भ :

  • India State of Forest Report, Forest Survey of India, Dehradun, India,2013.
  • Mandal  R.N., Naskar, K. R.   Diversity and Classification of Indian Mangroves: A review. Tropical Ecology  49: 131-146., 2008.

                                                                                                                                                                                                  भाषांतरकार : शारदा वैद्य ; समीक्षक : डॉ.बाळ फोंडके