खाजण. समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे बुटके बांध यांमधील खाऱ्या, उथळ आणि शांत पाण्याची पट्टी किंवा क्षेत्र म्हणजे खारकच्छ होय. वाळू, खडे, चिखल यांनी बनलेला जमिनीच्या अरुंद पट्टीने उपसागराचे मुख अंशत: किंवा पूर्णपणे बंद झाले असेल, तर किनारा व ही पट्टी यांमधील जलविभागालाही खारकच्छ म्हणतात. तेथून समुद्रात पाणी जाण्यायेण्यासाठी वाट असली, तरी वाळूचे बुटके बांध वा दांडे, वाळूचे रोधक बेट अथवा प्रवाळभित्ती यांमुळे ते समुद्रापासून अलग झालेले असते. खार म्हणजे लवणयुक्त वा खारट आणि कच्छ म्हणजे पाणथळ जागा या शब्दांवरून खारकच्छ हा शब्द खाजण (लॅगून) या अर्थी बनला आहे. अनूप, पश्चजल (बॅक वॉटर), समुद्रताल हे खारकच्छासाठीचे पर्यायी शब्द आहेत.

किनारी खारकच्छ जमिनीच्या सीमाक्षेत्रांत आढळतात. सामान्यपणे ज्या किनाऱ्यावर भरती-ओहोटीचा पल्ला कमी ते मध्यम असतो, अशा किनाऱ्यालगत किनारी खारकच्छ सर्वाधिक आढळतात. जगातील एकूण खारकच्छांपैकी सुमारे १३ टक्के किनारी खारकच्छ प्रकारातील आहेत. असे खारकच्छ बहुधा लांबट, सामान्यपणे किनारपट्टीला समांतर आणि उघड्या समुद्रापासून रोधक बेटांनी किंवा वाळूच्या अथवा वाळू, गोटे व रेवेपेक्षा भरड कण यांच्या अटकावांमुळे अलग झालेले असतात. वाळूच्या टेकड्यांमुळेही खारकच्छ तयार होतात. खारकच्छ व समुद्र यांच्यातील पाण्याची ये-जा होण्यासाठी यात एक वा अनेक खुल्या अरुंद वाटा (मार्ग) असतात.

समुद्राचा किनारा किंवा तळावर निर्माण झालेल्या भरड अवसादावर (गाळावर) लाटा आणि दीर्घ किनाऱ्यावरील सागरी प्रवाह यांची क्रिया होऊन सुरुवातीला खारकच्छ अटकाव (दांडे, बेट, टेकडी) निर्माण होतात. अटकावांत सुरक्षित असलेले पाणी पुष्कळदा नद्यांकडून येते. त्यांनी वाहून आणलेला चिखल व अखेरीस गाळवट यांचा अटकाव (अडकवून ठेवणारा सापळा) तयार होतो. पुढे हा अटकाव सागरी मैदानाचा विस्तारित भाग होतो. किनारी खारकच्छांतील पाण्याच्या अभिसरणावर (खेळते राहण्यावर) भरती-ओहोटीचा प्रभाव पडत असतो किंवा परिणाम होत असतो. भरती-ओहोटीमुळे खारकच्छ आलटून पालटून भरले जाते व रिकामे होते. यासाठी खारकच्छाच्या अटकावातील फटींचा उपयोग होतो. भरती-ओहोटीच्या प्रत्येक उसळीच्या व खाली जाण्याच्या वेळी अरुंद फटींमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत गेल्याने प्रवेशाच्या ठिकाणी प्रवाह जोराचे असू शकतात. असे असले, तरी हे प्रवाह खारकच्छाच्या बहुतेक भागांत पुरेसे दुर्बल असतात. त्यामुळे अवसाद निक्षेपित होऊ (साचू) शकतो आणि यांतून भरती-ओहोटीद्वारे निर्माण होणारी सपाटी तयार होऊ शकते.

खारकच्छामधील पृष्ठीय क्षेत्रफळ व पाण्याची खोली यांचे गुणोत्तर उघड्या समुद्रापेक्षा अधिक जास्त असल्याने खारकच्छाच्या वातावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियेवर अवलंबून असलेल्या गुणधर्मांत टोकाची तफावत असते. उदा., हिवाळ्यात खारकच्छातील पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा अधिक थंड व उन्हाळ्यात अधिक उबदार असते. उबदार प्रदेशांत बाष्पीभवनाचे प्रमाण हे आत येणाऱ्या गोड्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक असू शकते आणि पाणी आत येण्याच्या वाटा मर्यादित असल्यास पाणी अतिशय खारट होते.  अगदी स्फटिकी लवण साचते. जेव्हा याबरोबर अधोगमन (जमीन खाली जाण्याची क्रिया) घडते, तेव्हा लवण साचण्याच्या या क्रियेने लवणाचे जाड निक्षेप साचतात.

किनाऱ्याजवळील प्रवाळभित्तींमुळेही खारकच्छ निर्माण होते. जेथे उबदार पाण्यातील प्रवाळांची जोमाने वाढ होते अशा सागरी क्षेत्रांत प्रवाळभित्ती खारकच्छ आढळतात. किनारा व

कंकणद्वीप प्रवाळभित्तीमधील खारकच्छ

भित्ती यांमध्ये अरुंद व उथळ खारकच्छ असते. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरिअर रीफच्या सीमाक्षेत्रीय प्रवाळभित्तींवर प्रवाळभित्ती खारकच्छ आढळतात. किनाऱ्यापासून दूर असलेल्या प्रवाळभित्ती आणि किनारा यांच्या दरम्यान असलेले खारकच्छ रुंद, खोल व विस्तृत असतात. उदा., ऑस्ट्रेलियाचा ईशान्य किनारा आणि त्या किनाऱ्याजवळची ग्रेट बॅरिअर रीफ यांदरम्यानचे खारकच्छ. जेव्हा रोधक प्रवाळभित्ती गोलाकार किंवा घोड्याच्या नालाच्या आकाराची असते, तेव्हा तिला कंकणद्वीप प्रवाळभित्ती असे म्हणतात. तिच्या मध्यभागी उथळ पाण्याचे खारकच्छ असते. पॅसिफिक महासागरात तसेच मालदीव द्वीपसमूहातील कंकणद्वीपे ही अशा खारकच्छाची विलोभनीय असामान्य उदाहरणे आहेत. यांपैकी काही कंकणद्वीपे ५० किमी. पेक्षा अधिक रुंद आहेत. काही कंकणद्वीपे फक्त खारकच्छांची बनलेली आहेत. पुष्कळदा त्यांची खोली अगदी एकसारखी असते व त्यांभोवती कमी उंचीची प्रवाळभित्ती असते. काही कंकणद्वीपांत एक किंवा अधिक उंच, खडकाळ ज्वालामुखी बेटे आहेत; तर इतर कंकणद्वीपे गुंतागुंतीची म्हणजे लहान प्रवाळभित्ती खारकच्छाने वेढलेली असते आणि त्या खारकच्छाच्या भोवती अधिक मोठी प्रवाळभित्ती असते. जमिनीचे अधोगमन व समुद्रपातळीतील फेरबदलांमुळे झालेल्या समुद्रपातळीतील सापेक्ष वाढीच्या काळात प्रवाळाच्या वरील दिशेतील वृद्धीमुळे सर्व कंकणद्वीपांची बांधणी वा उभारणी होत गेली, असे मानतात.

वाळूच्या अरुंद मैदानाला अटकाव बेट म्हणतात. अशा अटकाव बेटांमुळे तयार झालेले खारकच्छ अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर  व मेक्सिकोच्या आखातालगत आढळतात.

उथळ खारकच्छ सपाट तळाच्या लहान नौकांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त असतात. असे खारकच्छ भारताच्या आग्नेय व नैर्ऋत्य किनाऱ्यांवर आढळतात. केरळचे वैशिष्ट्य असणारे असे खारकच्छ नारळ, काथ्या, आणि त्यांच्यापासून बनविलेल्या वस्तू या स्थानिक मालाच्या वाहतुकीसाठी वापरतात. केरळमध्ये खारकच्छाला ‘कायल’ म्हणतात. समुद्रात शिरू न शकणारे पाणी नदीमुखाजवळ किनाऱ्याला समांतर दिशेत नदीमुखाच्या दोन्ही बाजूंना पसरते. या पाण्यालाही तेथे कायल म्हणजे पश्चजल म्हणतात. वाहतुकीच्या सोयीसाठी कायले एकमेकांना व समुद्राला कालव्यांनी जोडतात.

जर्मनी, पोलंड व रशिया यांच्या बाल्टिक समुद्रावरील किनाऱ्यावर काही नद्यांच्या मुखाशी एक टोक जमिनीशी जोडलेल्या वाळूच्या दांड्यांनी खारकच्छ तयार झाले आहेत. त्यांना तेथे ‘हाफ’ म्हणतात आणि खारकच्छ तयार करणाऱ्या वाळूच्या दांड्याला ‘नेहरूंग’ हे नाव आहे. या बंदिस्त खारकच्छाचे मुख अरुंद असून त्यातून आत येणाऱ्या जहाजांना तेथे आसरा घेता येतो. नदीच्या पाण्यामुळे येथील खारकच्छाचे पाणी कमी खारट व कधीकधी जवळजवळ गोडे होऊन जाते. काही काळानंतर नदीचा गाळ साचत राहून हाफ भरून जाते व  मग तेथे नौकानयन होऊ शकत नाही.

समीक्षक : वसंत चौधरी