लेटोली हे पुराजीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. टांझानियातील ओल्डुवायी गॅार्ज या पुरातत्त्वीय स्थळापासून ४५ किमी. अंतरावर असलेले हे स्थळ होमिनिन प्राण्याच्या जगातील सर्वांत प्राचीन पाऊलखुणांसाठी प्रसिद्ध आहे. प्लायोसीन-प्लाइस्टोसीन कालखंडातील (३६ लक्ष वर्षपूर्व) या पाऊलखुणांचा शोध ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ मेरी डग्लस लिकी (१९१३–१९९६) यांना १९७६ मध्ये लागला. त्यांनी त्या ठिकाणी (स्थळ-जी) १९७८ मध्ये उत्खनन केले आणि त्यात पावलांचे ७० ठसे आढळले. हे ठसे २७ मी. अंतरापर्यंत होते.

सु. ३६ लक्ष वर्षांपूर्वी दोन ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राणी ज्वालामुखीतून पसरलेल्या राखेतून (Tuff) चालत गेले. पावसाने राख ओली झाल्यामुळे त्यांच्या पाऊलखुणा पक्क्या झाल्या. पुन्हा जवळच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पसरलेल्या राखेच्या थरामुळे या पाऊलखुणा गाडल्या गेल्या. लेटोलीपासून २० किमी. अंतरावरील सदीमन ज्वालामुखीची ही राख असावी, असे मानले जात होते. परंतु ए. एन. झेटसेव्ह यांनी त्याबद्दल शंका व्यक्त केली. त्यांच्या मते, मेरी लिकी यांना मिळालेल्या पाऊलखुणा तीन जणांच्या असून ते सगळे एकाच दिशेने जात होते. त्यांमधील एकजण दुसऱ्या प्राण्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालल्याने या खुणा पुसट झाल्या आहेत.

लेटोली याच ठिकाणी स्थळ-जी पासून १५० मी. अंतरावर २०१५ मध्ये आणखी दोन ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांच्या पाऊलखुणा एफ. टी. मसाओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आढळल्या. या ठिकाणाला स्थळ-एस असे नाव देण्यात आले. हे दोन्ही प्राणी (एस-१ आणि एस-२) पूर्वी आढळलेल्या राखेच्या पृष्ठभागावर आधीचे तीन प्राणी चाललेल्या दिशेनेच चालत गेले होते. पाऊलखुणांवरून या पाचही प्राण्यांच्या आकाराचा खालीलप्रमाणे अंदाज करण्यात आला आहे :

क्रमांक उंची (सेंमी.) वजन (किग्रॅ.) चालण्याचा वेग (मी. प्रतिसेकंद)
एस-१ १६१ – १६८ ४१·३ – ४८·१ ०·४७ – ०·५५
एस-२ १४२ – १४९ ३६·५ – ४२·४
जी-१ १११ – ११६ २८·५ – ३३·१ ०·४३ – ०·५०
जी-२ १३९ – १४५ ३५·६ – ४१·४ ०·३६ – ०·४२
जी-३ १२९ – १३५ ३३·१ – ३८·५ ०·३९ – ०·४६

एस-१ हा नर असून त्याच्याबरोबर माद्या अथवा लहान वयाचे प्राणी असावेत. ही सगळी टोळी बहुधा पाणी पिण्यासाठी एका दिशेने गेली असावी. सर्वांत छोटा प्राणी जी-१ हा जी-२ या मोठ्या प्राण्याच्या बाजूने चालत होता, तर जी-३ हा प्राणी जी-२ प्राण्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होता.

येथे पाच ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांच्या व्यतिरिक्त गेंडा, जिराफ, ससा, गिनीफाउल व इतर प्राण्यांच्या पावलांचे ठसे लेटोली येथे मिळाले आहेत; इतकेच नाही, तर पावसाच्या थेंबाने राखेत तयार झालेले छोटे खळगेही मिळाले आहेत.

संदर्भ :

  • Leakey, M. D.; Hay, R. L. ‘Pliocene footprints in the Laetoli Beds at Laetoli, northern Tanzaniaʼ, Nature, Vol., 278 : 317-23, 1979.
  • Masao, Fidelis T.; Ichumbaki, Elgidius B.; Cherin, Marco; Barili, Angelo; Boschian, Giovanni; Iurino, Dawid A.; Menconero, Sofia; Moggi-Cecchi, Jacopo & Manzi, Giorgio  ‘New footprints from Laetoli (Tanzania) provide evidence for marked body size variation in early homininsʼ, eLife, Vol., 5, 2016.
  • Tuttle, R. H.; Webb, D. M. & Baksh, M. ‘Laetoli Toes and Australopithecus afarensisʼ, Human Evolution, Vol., 6 (3), 193-200, 1991.

समीक्षक – शौनक कुलकर्णी