पदय्या, कटरागड्डा : (२० मे १९४३). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करून पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात त्यांनी मूलगामी भर टाकली. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पामुलपाडू या छोट्या गावात झाला. आंध्र विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी घेतल्यानंतर ते पुण्यात आले आणि डेक्कन कॉलेजमधून त्यांनी एम. ए. पूर्ण केले (१९६५).  ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. संपादन केली (१९६८). उत्तर कर्नाटकातील शोरापूर दुआबातील प्रागैतिहासिक व इतिहासपूर्व संस्कृती हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

हॅालंडमध्ये काही काळ संशोधन केल्यानंतर पदय्या १९७२ मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून रुजू झाले. प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ अध्यापन केल्यानंतर ते डेक्कन कॉलेजचे संचालक झाले (२००३). सेवानिवृत्तीनंतरही ते डेक्कन कॉलेजमध्ये सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून संशोधनाचे कार्य करत आहेत.

पदय्यांनी सु. दोन दशके कर्नाटकातील हुन्सगी आणि बैचबाळ खोऱ्यांमध्ये अत्यंत प्राचीन अशा अशुलियन या पुराश्मयुगीय आणि नवाश्मयुगीन संस्कृतीच्या अवशेषांवर सखोल असे संशोधन केले. त्यांनी हुन्सगी, येदियापूर आणि इसामपूर पुराश्मयुगीय स्थळांचे उत्खनन केले. या त्यांच्या या कामामुळे भारतीय पुरातत्त्वात प्रथमच पुराश्मयुगातील मानवी जीवनाचे साकल्याने आकलन होऊ शकले. शोरापूर दुआबात त्यांनी कोडेकल आणि बुदिहाळ या नवाश्मयुगीन स्थळांचे उत्खनन केले आणि त्या वेळच्या कृषी-पशुपालक सांस्कृतिक जीवनामधील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. हे करत असताना त्यांनी पुरातत्त्वातील पारंपरिक आणि आधुनिक अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला.

भारतीय पुरातत्त्वात काही मोजक्या लोकांनीच सिद्धांतांचा विचार केला. पदय्या त्यांमधील एक व जगभर मान्यता असलेले आहेत. पुरातत्त्वीय सिद्धांतांमध्ये १९५० नंतर आमूलाग्र बदल घडून आले व नवपुरातत्त्वाचा उदय झाला. पदय्यांनी यानंतर निर्माण झालेल्या चर्चांमध्ये सहभाग तर घेतलाच; शिवाय नवपुरातत्त्वाने पुरस्कार केलेल्या प्रक्रियावादी तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनात कसा वापर करायचा ते दाखवून दिले. या संदर्भातील त्यांचा न्यू आर्किओलॉजी अँड आफ्टरमॅथ (१९९०) हा ग्रंथ आजही मैलाचा दगड मानला जातो. पुरातत्त्वीय सिद्धांत हा समजायला आणि शिकवायला अवघड विषय ते अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवत असत. अनेकदा उन्हात काम करण्याचे टाळणारे लोक आरामखुर्चीत पुरातत्त्वीय सिद्धांतांची मांडणी करतात, अशी सिद्धांतावर काम करणार्‍यांची कुचेष्टा केली जाते व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु स्वतः दीर्घकाळ प्रत्यक्ष उत्खनन व क्षेत्रीय कार्य केले असल्याने पदय्यांच्या आग्रही प्रतिपादनाकडे दुर्लक्ष करता येत नाही.

प्राचीन सांस्कृतिक स्थळांमध्ये घडणारे बदल आणि त्यांच्यावर होणारे विविध परिणाम यांचा अभ्यास (Site formation processes) पुरातत्त्वात १९९० नंतर सुरू झाला. पदय्यांनी सातत्याने भारतीय पुरातत्त्वात अशा अभ्यासांचा आग्रह धरला व या विषयावरील ग्रंथाचे त्यांनी संपादन केले (२००७). पुरातत्त्वाचा इतिहास आणि विविध विद्वानांनी केलेले योगदान हा पदय्यांच्या आवडीचा विषय. एसेस इन हिस्ट्री ऑफ आर्किओलॉजी (२०१३) आणि रिव्हायटलायझिंग इंडियन आर्किओलॉजी (२०१६) हे ग्रंथ त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची साक्ष देतात. आपण जे काम करतो त्यात आपल्या गुरुजनांचा मोठा वाटा असतो असे ते मानतात. त्यांनी त्यांचे गुरू ह. धी. सांकलिया आणि इरावती कर्वे यांच्या जन्मशताब्दींच्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करुन त्यांचे वृत्तांत प्रकाशित केले. पदय्यांचे शंभरापेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झालेले असून जगभर त्यांचे संदर्भ सातत्याने दिले जातात.

पदय्यांच्या पुरातत्त्व क्षेत्रातील अनुभवाचा फायदा अनेक संस्थांना झाला. ते भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे (आयसीएचआर) सदस्य होते (२००५ — ११). त्याचप्रमाणे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व सरकारच्या अनेक तज्ज्ञ समित्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

पदय्यांना अनेक मानसन्मान लाभले. दोन वेळा (१९८६ व १९९९) त्यांनी फुलब्राइट फेलो म्हणून अमेरिकन विद्यापीठांमध्ये संशोधन व अध्यापनकार्य केले. कोलकात्याच्या बंगीय साहित्य परिषदेने राखालदास बॅनर्जी पदकाने त्यांचा गौरव केला (२००२). लंडनमधील सोसायटी ऑफ ॲन्टिक्वेरीज या संस्थेने त्यांना मानद सदस्यत्व दिले (२०११). त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा पद्मश्रीने सन्मान केला (२०१२).

                                                                                                                                                                                                समीक्षक : सुषमा देव