भासकृत करुणरसप्रधान एकांकी संस्कृत नाटक. भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धात दुर्योधनाचा झालेला ऊरुभङ्ग म्हणजेच भीमाने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्यांचा केलेला चुराडा हा ह्या नाटकाचा विषय.हया कथानकातील खलप्रवृत्तीचा म्हणून प्रसिद्ध असणार्‍या दुर्योधनाच्या मृत्यूपूर्व शेवटच्या क्षणांचे करूणगंभीर नाट्य प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण करते. प्रसिद्ध कथासूत्र निवडूनही त्यातील वेगळे पैलू रंगवित खिळवून ठेवणारे नाटक लिहिण्यात भासाची हातोटी इथे प्रकर्षाने दिसून येते.या अंकातील संघर्ष घटनांमध्ये नसून मानसिक आंदोलनात आहे हे या नाट्याचे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणता येईल. संस्कृत नाटकांमध्ये शोकान्त नाटक नसल्याची उणीव जागतिक पातळीवर नेहमी उद्धृत केली जाते. ऊरुभङ्ग हा भासरचित शोकात्म अंक हे शल्य कमी करतो.

महाभारतातले युद्ध अंतिम टप्प्यावर आले असताना या नाटकाचे कथानक सुरू होते. कौरवांच्यातील काही मोजके वीर अजून जिवंत आहेत. त्यातील एक  दुर्योधन. नाटकाच्या अगदी सुरुवातीलाच भीमाने गदाप्रहाराने दुर्योधनाच्या मांड्या फोडल्याचा प्रसंग होऊन जातो.कृष्णाच्या संकेताप्रमाणे भीम युद्धाच्या नियमांकडे कानाडोळा करत दुर्योधनाच्या मांड्यांवर गदेचा प्रहार करतो. दुर्योधन जर्जर होतो.ह्या प्रसंगानंतर दुर्योधनाचे सरपटत जाणे,त्याला झालेला पश्चात्ताप,त्याची मरणाची तयारी हे सारे चित्रण भासाने फार तरलतेने केले आहे.मागे राहिलेल्या सर्वांना तो मोठया मनाने ‘झाले ते विसरून जा’असे सांगतो. दुर्योधनाच्या परिचित वर्तनापेक्षा वेगळी पण प्राप्त परिस्थितीत उचित वाटावी अशी उदात्त आणि प्रांजळ मनोभूमिका भासाने रंगविली आहे.त्याने केलेले मातापित्यांचे व राण्यांचे सांत्वन,बलराम आणि अश्वत्थामा यांच्याशी केलेले धैर्यपूर्ण वक्तव्य तसेच मुलगा दुर्जय ह्याच्याबरोबर असणारे त्याचे संवाद हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. आयुष्याच्या अंतिम क्षणांमध्ये वैर, राज्यलोभ, शत्रूत्व या गोष्टींचा मोह फोल ठरतो आणि सज्जनाला शोभावा असा निर्वेद (विरक्तिमय स्वभाव) दुर्योधनाच्या ठिकाणी दिसून येतो.

भास महाभारतातील घटनांना केवळ नाटयाचे रूप देत नाही तर त्यातील पात्रांच्या आधारे तो नवीन नाटय उभे करतो. असे नाटय उभे करत असताना भासाने जाणिवपूर्वक तपशीलांमध्ये अनेक बदल केले आहेत तसेच कलात्मक स्वातंत्र्यही घेतले आहे. दुर्योधनाच्या जीवनाच्या अखेरीच्या मानसिक आंदोलनांना मध्यवर्ती स्थान दिल्यामुळे ऊरुभंग हे दुर्योधनाचे नाटक झाले आहे.नाटकात मुख्य पात्राचा मृत्यू रंगभूमीवर दाखवायचा नाही असा संस्कृत नाट्यशास्त्रातील संकेत आहे, त्याचे उल्लंघन भासाने केले आहे आणि नाटकाला शोकात्म परिमाण प्राप्त करून दिले आहे.

संदर्भ :

  • कपिलदेवगिरी,श्री पं.(संपा), ऊरुभङ्ग, विद्याभवन संस्कृत ग्रन्थमाला,चौखम्बा विद्याभवन,वाराणसी,२०००.

समीक्षक – सुनीला गोंधळेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा