पार्श्वभूमी : राष्ट्रकुल परिषद ही पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात असलेल्या ५२ देशांची संघटना आहे. या संघटनेला पूर्वी ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ म्हणत असत. सदस्यदेशांच्या सहमतीने या संघटनेचे काम चालते. राष्ट्रकुल सचिवालय आणि काही अशासकीय संघटना यांच्यामार्फत हे काम चालते. लंडनमधील मार्लबरो हाउस येथे हे सचिवालय आहे. महाराणी एलिझाबेथ या राष्ट्रकुल संघटनेच्या प्रमुख आहेत. संघटनेतील ५२ सदस्यदेशांपैकी ३१ देश प्रजासत्ताक आहेत. ५ देशांत राजेशाही आहे, तर १६ देशांची प्रमुख राणीच आहे.

रचना व कार्य : राष्ट्रकुल परिषदेचा इतिहास १ जुलै १८६७ पासून सुरू होतो. या दिवशी कॅनडा हा देश ब्रिटिश साम्राज्यातून स्वतंत्र झाला. मात्र स्वातंत्र्यानंतरही कॅनडाने ब्रिटनबरोबरचे संबंध अबाधित ठेवले. हळूहळू ब्रिटिश साम्राज्य लयाला गेले. त्यानंतर बालफोर करार, लंडन, सिंगापूर आणि हरारे करार या घटना घडल्या आणि त्यातून सध्याची राष्ट्रकुल परिषद आकाराला आली.

राष्ट्रकुल ध्वज

प्रत्यक्षात १९४९च्या लंडन ठरावानंतर राष्ट्रकुल परिषद अस्तित्वात आली. राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य बनण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या. त्यासाठी कुठल्याही कायदेशीर अटी नाहीत. भाषा, इतिहास, संस्कृती, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि कायद्याचे राज्य या मूल्यांवरील श्रद्धा हा सदस्यत्वासाठीचा समान धागा ठरविण्यात आला. परिषदेच्या सदस्यदेशांकडून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांतून या मूल्यांची जपणूक केली जाते. राष्ट्रकुल देशांनी जगाचा २० टक्के भूभाग व्यापला असून या देशांची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एकतृतीयांश आहे.

सदस्यदेशांच्या प्रमुखांची बैठक दर दोन वर्षांनी होते. CHOGM (कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्ऩमेंट मीटिंग)  या आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या या बैठकीत सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्याशिवाय सदस्यदेशांचे अर्थमंत्री, आरोग्यमंत्री, कायदामंत्री यांच्या वेळोवेळी बैठका होत असतात.

लंडनमधील मार्लबरो हाउस इथल्या सचिवालयाची स्थापना १९६५ मध्ये झाली. हेच संघटनेचे मुख्य कार्यालय आहे. हे सचिवालय परिषदेच्या शिखर बैठका, सदस्यदेशांच्या मंत्र्यांच्या बैठका, सल्लागार समित्यांच्या बैठका यांचे आयोजन करते. हे सचिवालय सदस्यदेशांमध्ये संवाद साधून धोरणात्मक सल्लाही देते. सदस्यदेशांना त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाबाबत तांत्रिक मदत देते. हे सचिवालय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत निरीक्षक या नात्याने राष्ट्रकुल परिषदेचे प्रतिनिधित्व करते. परिषदेचे महासचिव (Secretary General) या सचिवालयाचे नेतृत्व करतात. सदस्यदेशांचे प्रमुख मतदानाने या महासचिवांची निवड करतात. ही निवड चार वर्षांसाठी असते आणि एका व्यक्तीला फक्त दोन वेळाच हे पद भूषविता येते.

दक्षिण सूदान, पॅलेस्टाइन, इझ्राएल, गँबिया अशा अनेक देशांनी राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नायजेरिया, पाकिस्तान, झिंबाब्वे आणि फिजी या देशांचे सदस्यत्व तात्पुरते रद्द करण्यात आले आहे. पाकिस्तान, आयर्लंड, मालदीव आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी सदस्यत्व सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यांपैकी काही देश पुन्हा सदस्य बनले आहेत.

विविध ठरावांच्या मार्फत राष्ट्रकुल परिषदेने आपली उद्दिष्टे निश्चित केली आहेत. लोकशाही, अर्थव्यवस्था, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, प्रशासन, मानवी ह्क्क, कायदा, क्रीडा, युवक आदी क्षेत्रांत ही परिषद काम करते. लिंग, जात, वंश, रंग, राजकीय विचार यांपैकी कोणत्याही कारणावरून होणाऱ्या पक्षपातास परिषदेचा पूर्ण विरोध आहे. खुला व्यापार आणि मुक्त संचार या धोरणास परिषदेचा पाठिंबा आहे.

पुरस्कार आणि मूल्यमापन : कॉमनवेल्थ या शब्दाचा अर्थ प्रजेचे कल्याण असा आहे. राष्ट्रकुल परिषदेतील देशांमध्ये असलेल्या राष्ट्रकुल विद्यापीठांचे काम अभिमानास्पद आहे. राष्ट्रकुल परिषदेच्या विविध उद्दिष्टांसाठी कॉमनवेल्थ फाउंडेशन काम करते. दर चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जगभरात लोकप्रिय झाल्या आहेत. या स्पर्धांनी संघटनेतील देशांना एकत्र बांधून ठेवले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युद्धभूमीवर हुतात्मा झालेल्या जवानांच्या अंत्यविधीसाठी तयार केलेल्या जगभरातल्या २५०० स्मशानभूमींची व्यवस्था कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशनतर्फे पाहिली जाते. या परिषदेने अनेक क्षेत्रांत केलेले मानवतावादी कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

संदर्भ :

  • www.thecommonwealth.org

भाषांतरकार : भगवान दातार

समीक्षक : शशिकांत पित्रे