मुखातील कठीण व सामान्यत: अन्नाचे तुकडे तसेच चर्वण करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या भागास दात असे म्हणतात. अन्न चावण्याबरोबरच शब्द उच्चारणात देखील दात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच सुंदर निरोगी दात मानवी सौंदर्यातही भर घालतात. स्तनी प्राणी सोडून बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये समदंती प्रकारचे दात आढळतात. असमदंती (Heterodont)  अवस्था ही सामान्यत: स्तनी प्राण्यांत आढळते.

आ. १ दाताची रचना

मानवी दात हे वरचा जबडा/ऊर्ध्वहनू (Maxilla) आणि खालचा जबडा /अधोहनू (Mandible) यांच्या हाडांना हिरडीच्या साहाय्याने जोडलेले असतात. जेव्हा जबडा बंद होतो तेव्हा वरचे दात खालच्या दातांवर चपखल बसतात. दाताचे पुढील तीन भाग पडतात. (१) किरीट (Crown) – म्हणजे तोंडामध्ये (मुखगुहेत) डोकावणारा भाग,  (२) मान (Neck) – हिरडीलगतचा संकोच पावलेला भाग आणि (३) दंतमूळ (Root) – जबड्याच्या हाडामध्ये रुतलेला दाताचा न दिसणारा भाग. दात दंतवल्क, दंतिन व दंतमज्जा या तीन स्तरांनी बनलेले असतात. दाताचा किरीटावरील सर्वांत बाहेरील पांढरा व अत्यंत कठीण स्तर दंतवल्काचा (Enamel) असून त्याची कठिणता ५ मोह (कठिणता मोजण्याचे परिमाण) असते. दंतवल्क ९६% हायड्रॉक्सी ॲपॅटाईटच्या (Hydroxyapatite) स्फटिकरूपी कॅल्शिअम फॉस्फेटने बनलेले असल्यामुळे ते अत्यंत कठिण असते. दात हिरडीतून बाहेर येण्यापूर्वीच दंतवल्काची निर्मिती झालेली असते. पूर्ण  वाढलेल्या दंतवल्कामध्ये रक्तवाहिन्या किंवा चेतापेशींचे अस्तित्व नसते. दातांच्या टोकांकडे  दंतवल्काची जाडी जास्त (सु. २.५ मिमी.), तर कडेच्या बाजूस कमी असते. दंतवल्क हे अर्धपारदर्शक (Translucent) असते, त्यामुळे  दाताला पांढरा रंग येतो. लहान बालकांमध्ये मात्र दंतवल्क अधिक अपारदर्शक असते, त्यामुळे त्यांचे दुधाचे दात अधिक पांढरे दिसतात.

दंतवल्क व दंतमज्जा यामध्ये दंतिन (Dentine) हा स्तर असतो. संपूर्ण दात हा दंतिनापासून बनलेला असतो. दंतिन हा कॅल्शिअमयुक्त उतींपासून बनलेला असून याच्या बाहेरील बाजूवर दंतवल्काचे आवरण असते, तर हिरडीच्या आतील बाजूस दंतमुळावर संधानकाचे (Cementum) आवरण असते. त्यावर असलेल्या परिदंत आवरणाने दात हिरड्यांना घट्टपणे जोडलेले असतात. दंतिनमध्ये सु. ४५% कॅल्शिअम फॉस्फेट, ३५% सेंद्रीय द्रव्य आणि २२% पाणी असते. दंतिन पिवळ्या रंगाचे असून याची कठीणता ३ मोह असते.

दाताचा सर्वांत आतील स्तर हा दंतमज्जेचा (Dental pulp) असतो. हा  दाताच्या मध्यभागी असलेल्या चेतापेशी व रक्तवाहिन्यांच्या जाळ्याने युक्त स्तर असून तो संयोजी ऊती आणि दंतिनजनक (Odontoblast) पेशींपासून बनलेला असतो. या पेशी सतत आतील बाजूने  दंतिन द्रव्य स्त्रवत असतात. केवळ सस्तन प्राण्यांच्या आहारात दूधाचा समावेश होतो. दुधातील केसीन प्रथिनाचे रेणू कॅल्शियम फॉस्फेटने जोडलेले असल्यामुळे केसीनचे विघटन होताना कॅल्शियमचे शोषण होते. त्यामुळे सस्तन प्राण्यांचे दात व अस्थी यांमध्ये तुलनेने कॅल्शियम अधिक प्रमाणात असते.

  आ. २ मानवी दाताची प्रतिकृती

जबड्याच्या पुढील भागात सुतारकामातील पटाशीसारखे चपटे दात (Incisors) असून ते अन्न तोडण्यासाठी वापरले जातात. या दातांच्या शेजारी थोड्या मागील बाजूस टोकदार सुळे (Canines) असतात. अन्नावरील कठीण आवरण सोलून काढण्यासाठी यांचा वापर होतो. सुळ्यांच्या मागे उपदाढा (Premolars) आणि दाढा (Molars) असतात. त्यांचे पृष्ठभाग सपाट असतात. त्यांचा वापर अन्नाचे चर्वण करण्यासाठी  होतो. या क्रियेत कठीण अन्न फोडून व चावून अन्न  बारीक केले जाते.

सुरुवातीला दाताचा आकार लहान गोळीसारखा असतो. हळूहळू त्याला परिपूर्ण आकार मिळतो. मानवामध्ये दुधाचे दात व कायमचे दात असे दोनवेळा दात येतात. दुधाच्या दातांची संख्या प्रत्येक जबड्यात दहा-दहा अशी दोन्ही मिळून वीस असते. प्रत्येक जबड्यात ४ पटाशीचे दात, २ सुळे  व ४ दाढा असतात. दुधाचे दात वयाच्या सहाव्या महिन्यापासून सुरुवात होऊन २.५–३ वर्षांपर्यंत येतात. त्यातील पटाशीचे दात ८–१३ महिने, सुळे १६–२२ महीने व दाढा २५–३३ महीने या काळात येतात. त्यामुळे बालकाच्या शारिरीक वाढीचे टप्पे ठरविण्यातही दातांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. वयाच्या सातव्या ते अकराव्या वर्षांपर्यंत दुधाचे दात आले त्या क्रमाने पडतात व त्या जागी नवीन दात येतात, त्यांना कायमचे दात म्हणतात. सर्वसाधारणपणे बाराव्या वर्षापर्यंत एकूण २८ दात येतात. अठराव्या वर्षी किंवा त्यानंतर वरच्या आणि खालच्या जबड्यात दोन्ही बाजूंस एक-एक अशा एकूण ४ दाढा येतात. त्यांना अक्कलदाढा (Wisdom teeth) म्हणतात. या चार दाढांपैकी एखादी किंवा चारही अजिबात येत    नाहीत, म्हणून कायम दातांच्या एकूण संख्येचा उल्लेख २८ ते ३२ करतात. प्रत्येक जबड्यामध्ये ४ पटाशीचे, २ सुळे, ४ उपदाढा

(Premolars) व ६ दाढा असे एकूण १६ दात असतात. या दंतपंक्तीमध्ये पटाशीचे दात (I), सुळे (C), उपदाढा (P) आणि दाढा (M) यांच्या संख्या I:C:P:M या क्रमाने मांडल्या तर दुधाच्या दाताचे २/२.१/१.०/०.२/२ व कायमच्या दाताचे २/२.१/१.२/२.३/३ असे दंतसूत्र मिळते. हे दंतसूत्र दोन्ही जबड्यातील उजव्या (कोणत्याही एका) बाजूच्या दातांची रचना दाखवते. सर्व सस्तन प्राण्यांचे वर्गीकरण दंतसूत्रावरून केलेले असल्याने वर्गीकरण विज्ञानात दंतसूत्र महत्त्वाचे ठरले आहे.

आ. ३ मानवी दाताचे प्रकार : (१) दुधाचे दात व (२) कायमचे दात 

दात स्वच्छ ठेवणे हे मुख आरोग्याचे लक्षण आहे. त्यासाठी मऊ ब्रश व मऊ दंतधावन वापरावे. खरबरीत दंतधावन व कडक ब्रश वापरल्याने दात झिजतात. तसेच दंतमंजन, कडुनिंबाच्या काड्या, त्रिफळा चूर्ण इत्यादींनीही दात घासल्यास दात स्वच्छ होतात. सुपारी,  तंबाखू,  पान-गुटखा, कार्बोनेटेड शीतपेये यांच्या सततच्या सेवनाने दातांचे आरोग्य बिघडते. तसेच गरम पदार्थांनंतर लगेच थंड पदार्थ किंवा थंड पदार्थांनंतर लगेच गरम पदार्थांचे सेवन करणे यांमुळे दातांवरील संरक्षक कवच (दंतवल्क) खराब होते. सतत अतिशिजवलेले अन्न खाल्ल्याने दातांना व हिरड्यांना पुरेसा व्यायाम मिळत नाही. दातांचा पुरेसा वापर न झाल्यानेही दात आणि हिरड्या नाजूक तसेच कमजोर होतात. हिरडीमुळे जबड्याच्या हाडात दात पक्के बसलेले असतात. त्यामुळे हिरड्या सैल पडल्याने दात हलू लागतात व पडतात. आहारात ऊस, खारीक, फळ (फळाच्या रसाऐवजी आख्खे फळ चावून खाणे) अशा कडक पदार्थांचा समावेश केल्यास दात व हिरड्या यांना उत्तम व्यायाम मिळू शकतो. दातांमधील अंतर कमी-जास्त असल्यास अशा दातांमध्ये अन्नकण अडकून राहण्याची शक्यता अधिक असते. अशाने दात लवकर किडू शकतात. त्यामुळे जेवणानंतर खळखळून चूळ भरणे तसेच रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आवश्यक आहे. दातांचा रंग आनुवंशिक असतो. दंतवल्काच्या रंगावर तसेच त्याच्या पारदर्शकत्वावर दातांचा रंग अवलंबून असतो. त्यामुळे व्यक्तिपरत्वे दातांचा रंग व आकार यांमध्ये विविधता दिसून येते.

दात  कॅल्शिअमयुक्त कठीण संयुगापासून बनलेले असल्यामुळे हजारो वर्षे टिकून राहतात. त्यामुळे प्राचीन मानवी दंतरचनेचे मानवी उत्क्रांतीबाबतच्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान आहे.

संदर्भ :

समीक्षक – नंदिनी देशमुख

This Post Has One Comment

  1. Dinkarrao Narayan Thorat

    सुंदर,परिपूर्ण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा