पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस २३ १/२° वर कल्पिलेल्या अक्षवृत्तांना अनुक्रमे ‘कर्कवृत्त’ आणि ‘मकरवृत्त’ म्हणतात. यांनाच भौगोलिक अयनवृत्ते ही संज्ञा वापरतात. ही अयनवृत्ते सूर्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भासमान भ्रमणाच्या कमाल मर्यादा म्हणजेच उत्तरायण (Northward Solar Journey)-दक्षिणायन (Southward Solar Journey) यांच्या मर्यादा दाखवितात. पृथ्वीचे परिवलन (अक्षीय परिभ्रमण) व पृथ्वीचे परिभ्रमण (कक्षीय परिभ्रमण), तिच्या आसाचा तिच्या कक्षेच्या पातळीशी असलेला ६६ १/२° कोन आणि आसाचा एकाच दिशेकडे सतत असलेला रोख (कल) यांमुळे कोणत्याही ठिकाणी दररोज मध्यान्हीचा सूर्य आकाशात एकाच ठिकाणी दिसत नाही.

२१ जूनपासून २२ डिसेंबरपर्यंत सूर्य दररोज आदल्या वा आधीच्या  दिवसापेक्षा अधिकाधिक दक्षिणेला गेलेला दिसतो. तसेच २२ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत तो आदल्या दिवसापेक्षा अधिकाधिक उत्तरेस गेलेला दिसतो. सूर्याच्या या भासमान दक्षिणोत्तर जाण्याला (अयनाला) व २१ जून ते २२ डिसेंबर आणि २२ डिसेंबर ते २१ जून या कालावधींना अनुक्रमे ‘दक्षिणायन’ व ‘उत्तरायण’ म्हणतात. २१ जून रोजी सूर्याचे लंबरूप किरण कर्कवृत्तावर पडतात; म्हणजेच तेथे त्या दिवशी मध्यान्हीचा सूर्य खस्वस्तिकी (बरोबर डोक्यावर) आलेला दिसतो आणि या दिवशी सूर्याचे उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. तसेच २२ डिसेंबरला सूर्याचे लंबरूप किरण मकरवृत्तावर पडतात; म्हणजे तेथे सूर्य डोक्यावर येतो आणि सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. म्हणून कर्कवृत्त व मकरवृत्त यांस ‘अयनवृत्ते’ आणि २१ जून व २२ डिसेंबर या दिवसांना ‘अयनदिन’ म्हणतात. या दोन अयनवृत्तांच्या दरम्यानच्या प्रदेशाला ‘उष्ण कटिबंध’ म्हणतात. या प्रदेशातील प्रत्येक ठिकाणी वर्षातून फक्त दोनच दिवशी सूर्य खस्वस्तिकी येतो; मात्र कर्कवृत्ताच्या उत्तर ध्रुवाकडील बाजूच्या प्रदेशात आणि मकरवृत्ताच्या दक्षिण ध्रुवाकडील बाजूच्या प्रदेशात सूर्य कधीही खस्वस्तिकी येत नाही.

समीक्षक : वसंत चौधरी