सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे (Saros Cycle :Eclipse Families) : सॅरोस चक्र किंवा ग्रहणांची कुटुंबे हा ग्रहण विषयातील एक कुतूहलाचा भाग आहे. या चक्राची कल्पना येण्यासाठी आपण ते उदाहरणाने समजावून घेऊ. पुढे सूर्यग्रहणांच्या तीन तारखा दिल्या आहेत : १) २१ जून १९५५,२) ३० जून १९७३ आणि ३) ११ जुलै १९९१

यातील कोणत्याही दोन तारखांच्या मधल्या कालावधीचा विचार केल्यास असे लक्षात येईल की, या लगतच्या ग्रहणांमध्ये सुमारे १८ वर्षांचा काळ गेलेला आहे.  नीट पाहिले तर, २१ जून १९५५ ते ३० जून १९७३ यामधील काळ १८ वर्षे १० दिवसांचा आहे, तर ३० जून १९७३ ते ११ जुलै १९९१ या मधील काळ १८ वर्षे ११ दिवसांचा आहे.  हा काळ १८ वर्षे १० दिवस की १८ वर्षे ११ दिवस हे त्या १८ वर्षाच्या काळात किती लीप वर्षे येतात, या वरून ठरते.  २१ जून १९५५ ते ३० जून १९७३ च्या दरम्यान पाच लीप वर्षे झाली, तर ३० जून १९७३  ते ११ जुलै १९९१ च्या दरम्यान झालेल्या लीप वर्षांची संख्या ४ होती. अर्थात या कालावधीचा एकूण काळ ६५८५ दिवसांचा होतो.  एका सूर्यग्रहणानंतर इतक्या दिवसांचा कालावधी गेला, की सूर्यग्रहण हमखास होते. अशा तऱ्हेने दर ६५८५ दिवसांच्या कालावधीनंतर सूर्यग्रहणे होत राहतात. अशी ही ग्रहणांची मालिका सुमारे ७२ ग्रहणांपर्यंत चालू राहते. या मालिकेतील ग्रहणांचे एक कुटुंब मानले जाते. या कुटुंबाला सॅरोस कुटुंब (Saros Family) असे म्हणतात.  असे ग्रहणांच्या मालिकेचे कुटुंब त्याच्या क्रमांकाने ओळखले जाते.  उदा., २६ डिसेंबर २०१९ रोजी झालेले आणि भारतातून दिसलेले कंकणाकृती सूर्यग्रहण हे १३२ क्रमांकाच्या सॅरोस कुटुंबातील होते.

आता प्रश्न असा की २१ जून १९५५ ते ३० जून १९७३ या कालावधीमध्ये सूर्यग्रहणे झालीच नाहीत का ? अर्थातच झाली, परंतु ती वेगवेगळ्या कुटुंबातील होती. १८ वर्ष १० दिवस किंवा ११ दिवसांचा कोणताही काळ घेतला, तर या कालावधीत सुमारे ४२ सूर्यग्रहणे आणि २८ चंद्रग्रहणे होतात. मात्र ती वेगवेगळ्या कुटुंबातील असतात. एकाच कुटुंबातील ग्रहणे मात्र दर १८ वर्षे १० दिवस किंवा ११ दिवसांच्या कालावधीनेच होतात. जी ग्रहणे राहू बिंदूजवळ होतात त्या ग्रहण कुटुंबाचे क्रमांक विषम ठरवलेले असतात आणि केतू बिंदूजवळ होणाऱ्या ग्रहणांचे क्रमांक सम असतात.  कोणत्याही कुटुंबातील सूर्यग्रहणांची संख्या सुमारे ७० ते ७२ असल्यामुळे एखाद्या कुटुंबातील ग्रहणांच्या या मालिकेचा एकूण कालावधी सुमारे १२५० ते १३५० वर्षांचा असतो.

 

सॅरोस चक्राच्या मालिकेतील पुढील ग्रहणात होणारे बदल: सॅरोस कुटुंबातील एका विशिष्ट तारखेला सूर्यग्रहण झाले, तर १८ वर्षे १० दिवस किंवा ११ दिवस, एवढ्या कालावधीनंतर त्याच कुटुंबातील पुढील ग्रहण होते. परंतु या ग्रहणात ग्रहण कालावधी, ग्रहण कोठून दिसेल ते पृथ्वीवरील स्थान, ग्रहणाचे स्वरूप इ. गोष्टी मागील ग्रहणाप्रमाणे तंतोतंत घडत नाहीत. याचे कारण म्हणजे दोन ग्रहणांच्या दरम्यानचा हा कालावधी बरोबर ६५८५ दिवसांचा नसतो. (तो सुमारे ६५८५.३२११ दिवस म्हणजे १८ वर्ष ११ दिवस ८ तास असा असतो.) अर्थात त्यात काही तासांचा फरक असतो. त्यामुळे या सॅरोस कालावधीनंतर ग्रहण निश्चितपणे झाले, तरी त्यात काही बदल होतात. ते असे…

१) अमावास्या समाप्तीकाळी (८ तासांच्या वाढीव कालावधीत) पृथ्वीचे परिवलन सुमारे १२० अंशातून अधिक होते. त्यामुळे ग्रहणमार्ग सुमारे १२० अंशातून पश्चिमेकडे सरकतो.

२) सॅरोस कुटुंबाच्या कोणत्याही मालिकेतील पहिले ग्रहण सूर्य पातबिंदूच्या पूर्वेस असतांना होते. ग्रहण होण्यासाठी कमाल मर्यादा पातबिंदूपासून १८ अंश असल्यामुळे सूर्य राहू बिंदूच्या पूर्वेस १८ अंशावर आहे असे समजा. परंतु, त्यानंतरच्या प्रत्येक ग्रहणात तो सुमारे अर्धा अंश पश्चिमेस सरकतो. म्हणजे सुमारे ३६ ग्रहणानंतर तो बरोबर राहू बिंदूपाशी पोहोचतो. यानंतरही प्रत्येक ग्रहणात तो राहूच्या पश्चिमेस अर्धा अंश सरकतो. अशा तऱ्हेने पुन्हा ३६ ग्रहणे होतात आणि त्यानंतर ही मालिका संपते (एका कुटुंबाची सांगता होते). अशा तऱ्हेने प्रत्येक कुटुंबात सरासरी ७२ ग्रहणे होतात.

३) कोणत्याही कुटुंबातील सुरुवातीची आणि शेवटची ग्रहणे खंडग्रास असतात. मधली ग्रहणे खग्रास किंवा कंकणाकृती असतात.

४) राहू बिंदूपाशी होणाऱ्या कुटुंबातील ग्रहणांचा मार्ग हळूहळू उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकतो, तर केतू बिंदूशी होणाऱ्या ग्रहणांचा मार्ग दक्षिणेकडून हळू हळू उत्तरेकडे सरकतो.

५) क्रमाने येणाऱ्या पुढील प्रत्येक पिढीतील ग्रहणात चंद्राचे अंतरही बदलते. त्यामुळे खग्रास किंवा कंकणाकृती ग्रहणांची संख्या समान असत नाही. प्रत्येक कुटुंबातील खंडग्रास, खग्रास, कंकणाकृती इ. ग्रहणांची संख्या वेगवेगळी असते.

सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहणांचीही कुटुंबे असतात. एका विशिष्ट सॅरोस कुटुंबाच्या मालिकेत होणाऱ्या चंद्रग्रहणांची संख्या सुमारे ४५ असते. ही ग्रहण संख्या कमी असण्याचे प्रमुख कारण चंद्रग्रहण होण्यासाठी राहू किंवा पातबिंदू पासून सूर्य किंवा चंद्र किती अंतरावर असावा ही मर्यादा कमी आहे. (चंद्रग्रहणाच्या बाबतीत पृथ्वीच्या विरळ छायेत होणारे चंद्रग्रहण ज्याला ‘छायाकल्प’ ग्रहण म्हणतात, ते गृहीत धरण्यात येत नाही. फक्त खग्रास आणि खंडग्रास ग्रहणेच यात धरली जातात.) त्यामुळे चंद्रग्रहणाच्या एका कुटुंबातील एकूण ग्रहण संख्या कमी असल्यामुळे एका कुटुंबातील ग्रहणांच्या मालिकेचा एकूण कालावधी सुमारे ८५० ते ९०० वर्षांचा असतो. तसेच सूर्यग्रहणांच्या बरोबर उलट, म्हणजे जी चंद्रग्रहणे राहू बिंदूजवळ होतात, त्या ग्रहण कुटुंबाचे क्रमांक सम ठरवलेले असतात आणि केतू बिंदूजवळ होणाऱ्या ग्रहणांचे क्रमांक विषम असतात. चंद्रग्रहणाच्या कुटुंबातील एका मालिकेतील राहू बिंदूपाशी होणाऱ्या कुटुंबातील ग्रहणांचा मार्ग हळूहळू दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो, तर केतू बिंदूशी होणाऱ्या ग्रहणांचा मार्ग हळू हळू उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडे सरकतो.

ग्रहणाच्या सॅरोस चक्राची माहिती इ.स. पूर्व आठव्या शतकापासून खाल्डियन लोकांना होती, असे ग्रहणांच्या नोंदीवरून दिसते.  एकाच कुटुंबातील लागोपाठच्या दोन ग्रहणांमध्ये ६५८५ दिवसांचा कालावधी का जातो याचे शास्त्रीय विवेचन पुढे एडमंड हॅलीने (१६७५ ते १७४२) केलेले आढळते. त्यानेच या चक्राला ‘सॅरोस’ हे नाव रूढ केले.

सॅरोस कुटुंबातील पहिल्या क्र. १ च्या कुटुंबातील सूर्यग्रहणांची मालिका संपुष्टात आली असून, इ.स. पूर्व १६ नोव्हेंबर १९९०चे सूर्यग्रहण या पहिल्या कुटुंबातील होते, असे मानण्यात येते. तर इ.स. पूर्व २३ फेब्रुवारी १९९४ रोजी झालेले चंद्रग्रहण हे चंद्रग्रहणांच्या पहिल्या सॅरोस कुटुंबातील गणले जाते. सध्या कार्यरत असणारी सॅरोसची एकूण ४० सूर्यग्रहण कुटुंबे असून त्यांचे क्रमांक ११७ ते १५६ असे आहेत. (यातील ११७ क्रमांकाचे कुटुंब २०५४ मध्ये संपणार आहे.) तर चंद्रग्रहणांच्या कुटुंबातील ४१ कुटुंबे सध्या कार्यरत आहेत.

२१ व्या शतकात भारतातून दिसलेली / दिसणारी ग्रहणे

फक्त खग्रास आणि कंकणाकृति सूर्यग्रहणे

क्रमांक ग्रहण दिनांक ग्रहण प्रकार कोणत्या राज्यातून दिसले /  दिसेल
२००९ जुलै २२ खग्रास गुजराथ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश,आसाम

उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल

२०१० जानेवारी १५ कंकणाकृती तामिळनाडू, केरळ
२०१९ डिसेंबर १६ कंकणाकृती तामिळनाडू, केरळ
२०२० जून २१ कंकणाकृती राजस्थान,हरियाना , उत्तरांचल
२०३१ मे २१ कंकणाकृती तामिळनाडू, केरळ
२०३४ मार्च २० खग्रास जम्मू आणि काश्मीर
२०७४ जून २७ कंकणाकृती कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तिसगढ,

झारखंड, बिहार

२०८५ जून २२ कंकणाकृती कर्नाटक, आंध्रप्रदेश
२०९३ जुलै २३ कंकणाकृती राजस्थान

 

संदर्भ :

 समीक्षक : आनंद घैसास