“एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास ‘वाङ्मयचौर्य’ म्हणतात. वाङ्मयचौर्य लेखक मूळ साहित्यकृतीचा निर्माता नसतानाही त्या साहित्यकृतीचा निर्माता असल्याचा दावा करतो. मूळ साहित्यकृती लपविणे, किंवा रूपांतरात तिचा मुळीच उल्लेख न करणे, याला वाङ्मयचौर्य असे संबोधतात.”
वाङ्मयचौर्य (Plagiarism) आणि श्रेयचौर्य (Credintial Stealing) या वस्तुतः दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. त्यात फरक करता येतो पण त्यांना एकमेकापासून वेगळे करता येत नाही. दोन्हीच्या मुळाशी ‘चोरी’ ही समान संकल्पना आहे. कधी वाङ्मयाची थेट चोरी केली जाते, कधी वाङ्मयाच्या निर्मितीच्या श्रेयाची चोरी केली जाते. संस्कृत किंवा मराठी अथवा तत्सम भारतीय भाषांमध्ये वाङ्मयचौर्य आणि श्रेयचौर्य यात फरक केलेला आढळतो; पण इंग्रजीमध्ये हा फरक आढळत नाही. इंग्रजीमध्ये वाङ्मयचौर्य आणि श्रेयचौर्य यांना उद्देशून ‘Plagiarism’ ही एकच संज्ञा उपयोगात आणली जाते; तथापि गेल्या दशकातील काही पाश्चात्य लेखकांनी दोन्ही संकल्पना वेगळ्या करून लेखन केले आहे.
वाङ्मयचौर्य ही आधुनिक काळात केवळ विद्यापीठीय, महाविद्यालयीन संशोधक व शिक्षक वर्गाची समस्या राहिलेली नाही. तिला व्यापक स्वरूप मिळालेले आहे. विद्यमान काळात व्यावसायिक, औद्योगिक, वृत्तपत्रीय इत्यादी विविध प्रकारच्या लेखनविश्वात वाङ्मयचौर्य आणि श्रेयचौर्य या समस्या उग्र झाल्या आहेत. वाङ्मयचौर्याबद्दल फार काही तत्त्वज्ञानात्मक साहित्य लिहिले गेलेले नाही; पण वाङ्मयचौर्य आणि श्रेयचौर्य या दोन कृती नीतीशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या तत्त्वज्ञानाच्या दोन शाखांतील आजच्या नव्या प्रमुख समस्या जागतिक पातळीवर मानल्या जातात.
ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार इंग्रजी संज्ञा ‘प्लेजिअरिझम’चे मूळ प्राचीन ग्रीक भाषेतील ‘प्लेजिअन’मध्ये आहे. लॅटीनमधील ‘प्लेजिअरिअस’ म्हणजे पळवणारा किंवा चोर. ‘प्लेजिअम’ म्हणजे पळवणे, चोरी करणे. इंडो-यूरोपियन भाषेतील ‘प्लेज’चा अर्थ जाळे किंवा सापळा. एखाद्याला जाळ्यात पकडणे ही गुप्तकृती आहे. म्हणून कोणतीही गुप्तकृती करणे, या अर्थाने ‘प्लेजिअरिअस’ हे निष्पादित रूप बनले गेले आणि तसे करण्याची वहिवाट म्हणून ‘प्लेजिअरिझम’ ही संज्ञा आली असावी. ग्रीक, लॅटीननंतर ‘प्लेजिअरिअस’चा प्रवास इंग्रजीकडे सुरू झाला. १६०१ साली बेन जॉन्सन या नाटककार-समीक्षकाने साहित्यचोराला उद्देशून ‘प्लेजिअरी’ हा शब्द उपयोगात आणला. इंग्रजी विचारविश्वात ‘प्लेजिअरिझम’ ही संज्ञा १६२० च्या दरम्यान स्वीकारण्यात आली. सॅम्यूएल जॉन्सनने त्याच्या १७५५ साली प्रकाशित झालेल्या शब्दकोशात ‘प्लेजिअरी’च्या “A thief in literature; one who steals the thoughts or writings of another”, “The crime of literary theft” अशा व्याख्या दिल्या आहेत. ऑक्सफर्ड शब्दकोशात लॅटीन ‘प्लेजिअरिअस’ हा शब्द सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात आल्याचे म्हटले आहे.
प्राचीन रोमन कवी मार्शल याने त्याच्या काव्याची चोरी त्याचा प्रतिस्पर्धी कवी फिडेन्टीअसने केल्याची तक्रार केली; त्या वेळी त्यासाठी त्याने जो शब्द वापरला त्याचे ‘प्लेजिअरिअस’ लॅटीन रूप आहे. ते भाषाविश्वात आणि विचारविश्वात एकदम चपखल बसले. त्यावरून ‘प्लेजिअरिझम’ हा शब्द बनला, असे मत जॅक लिंच हा समीक्षक व्यक्त करतो.
वाङ्मयचौर्य आणि प्रक्षिप्त वाङ्मय : वाङ्मयचौर्याची कृती ही प्रक्षिप्त वाङ्मयाच्या नेमकी उलटी असते. “आपले स्वतःचे लेखन सहेतुकपणे पूर्णतः किंवा अंशतः दुसऱ्याच्या, विशेषतः पूर्वकालीन लेखकाच्या नावे, खपविण्याचा जो प्रयत्न असतो; त्यास प्रक्षिप्त वाङ्मय म्हणतात.” प्रक्षिप्त वाङ्मय लिहिणारा लेखक स्वतःचे लेखनकर्तृत्व नाकारून ते इतराच्या नावावर दडपतो. याउलट, वाङ्मयचौर्य करणारा लेखक दुसऱ्याच्या लेखनाची अंशतः वा पूर्णतः सहीसही किंवा आपली उचलेगिरी लपेल इतके फेरफार करून चोरी करतो आणि ते लेखन आपलेच आहे, असे दडपून भासवितो.
वाङ्मयचौर्याचे प्रकार : आधुनिक काळात वाङ्मयचौर्याचे वेगवेगळ्या दृष्टीने प्रकार केले जातात. विविध विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी, शिक्षणसंस्थांनी आपले स्वतःचे वाङ्मयचौर्याचे प्रकार व वाङ्मयप्रतिबंधक नियम केलेले आढळतात. त्यांचा लसावि पाहता हेतूपूर्ण वाङ्मयचौर्य आणि निर्हेतूक वाङ्मयचौर्य असे ढोबळ प्रकार केले जातात. निर्हेतूक वाङ्मयचौर्यामध्ये स्व-वाङ्मयचौर्याचा समावेश होतो. अनेकदा लेखक, संशोधक स्वतःचा एका ठिकाणचा मजकूर अन्यत्र उपयोगात आणतो, पण मूळ स्त्रोताचा संदर्भ देत नाही, अशा वेळेस स्व-वाङ्मयचौर्याचा आरोप होत नाही; पण ती ज्ञानात्मक अचूकता नसते. मात्र एकच मजकूर हेतूतः एकापेक्षा जास्त ठिकाणी मूळ स्रोत वगळून दिल्यास ते स्व-वाङ्मयचौर्य ठरते. मजकुरासह चित्रे, चित्रफिती, ध्वनी इत्यादी बहुमाध्यमांनाही हाच वाङ्मयचौर्याचा नियम लागू केला जातो.
वाङ्मयचौर्य अपवाद : ‘काय केले असता’ किंवा ‘काय केल्यास’ ते लेखन वाङ्मयचौर्य ठरत नाही, हे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येऊ शकते.
- इतिहास, पुराणे, मिथ्यकथा, मौखिक लोकसाहित्य आदी साधनांचा कच्ची सामग्री म्हणून आधार घेऊन त्यांवर आधारित स्वतंत्र साहित्यकृती निर्मिल्यास ते वाङ्मयचौर्य ठरत नाही.
- परभाषेतील एखाद्या साहित्यकृतीच्या मूळ आशयावर वा मध्यवर्ती कल्पनेवर आधारित साहित्यनिर्मिती केल्यास व ‘अमुकअमुक साहित्यावर आधारित’ असा मूळ साहित्यकृतीचा उल्लेख केल्यास तेही वाङ्मयचौर्य ठरत नाही.
- कधीकधी दोन लेखकांना एकच कल्पना सुचू शकते. कथा, कादंबरी किंवा नाटक लिहिताना एकाच तऱ्हेचा प्रसंग दोघांनाही सुचणे सहज शक्य आहे. अशा बाबतीत मात्र कोणावरही वाङ्मयचौर्याचा आरोप करणे संयुक्तिक नाही.
- विशेषतः निसर्गविज्ञानाच्या क्षेत्रात दोन संशोधकांना, वैज्ञानिकांना एकच सिद्धान्त अथवा त्याचे मूलतत्त्व एकाचवेळी पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुचू शकते. त्यांचा एकमेकांशी संपर्कही नसतो. उदा., न्यूटन व लायब्नीज यांना लागलेला ‘गणन सिद्धान्ता’चा शोध (‘गणन युद्ध’ म्हणून हा वाद प्रसिद्ध आहे).
- काही विषय आणि काही कल्पना वाङ्मयात सर्वसाधारणपणे व संकेतार्थाने रूढ असतात. त्या कल्पनांची व विषयांची वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्यकृतींमध्ये अनेकदा पुनरावृत्ती होते, तरीही ते वाङ्मयचौर्य ठरत नाही.
- कोणत्याही लेखकाच्या वाङ्मयीन जडणघडणीत त्याच्या आधीच्या तसेच समकालीन लेखकांचा व त्यांच्या साहित्यकृतींचा संस्कार होत असतो. त्या साहित्यातील मूळ आशयद्रव्याचे, कल्पनांचे, तंत्र वा मांडणीचे, शैलीचे कळत-नकळत अनुकरण, उसनवारी त्या लेखकाच्या उमेदवारीच्या काळात होत असते. तेही तत्त्वतः वाङ्मयचौर्य मानता येणार नाही. मात्र जाणीवपूर्वक अनुकरण अथवा उसनवारी केल्यास तसा उल्लेख करणे आवश्यक असते. अन्यथा ते वाङ्मयचौर्य ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- पण अशी एखादी पूर्वलिखित वा पूर्वप्रकाशित साहित्यकृती जशीच्या तशी हुबेहूब तिचा आशय-विषय, मांडणी व शैली यांसहित पूर्णतः वा अंशतः, मूळ लेखकाचा उल्लेख न करता दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावावर छापल्यास ते वाङ्मयचौर्य ठरते.
- एखाद्या परभाषेतील साहित्यकृतीचा अनुवाद वा रूपांतर मूळ लेखकाच्या पूर्वसंमतीविना तसेच मूळ लेखकाचा व मूळ साहित्यकृतीचा उल्लेखही न करता एखाद्या लेखकाने स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केल्यास तेही वाङ्मयचौर्य ठरते.
तत्त्वज्ञानात्मक बाजू : वाङ्मयचौर्य कृतीमध्ये तत्त्वज्ञानात्मक दृष्टीकोनातून तीन मूल्ये गुंतलेली आढळतात. (१) ज्ञानात्मक (२) नैतिक (३) सौंदर्यात्मक . आधुनिक काळात या तीन मूल्यव्यवस्थांना वाङ्मयचौर्याने आव्हान दिले असून या आव्हानामुळे उपयोजित नीतिशास्त्रात ‘संशोधनाचे नीतिशास्त्र’ या उपयोजित ज्ञानशाखेचा उदय झाला आहे. एका अर्थाने ‘ज्ञान हीच नीती’ हा सॉक्रेटीसचा सिद्धान्त ज्ञानात्मक व नैतिक दृष्टीकोनातून येथे उपयोजित ठरतो.
ज्ञानात्मक मूल्य : ज्ञानात्मकतेच्या दृष्टीने वाङ्मयचौर्य हे ज्ञानात्मक सचोटीचा अभाव दर्शवते. ज्ञान नसताना ज्ञानाभास निर्माण केला जातो. वाङ्मयचौर्य व लबाडी (प्रक्षिप्त वाङ्मय प्रकार) या दोन्हींत अस्सलता नसते. एखादी कविता ही जशी मानवी कौशल्याची निर्मिती असते तसे बनावटगिरी किंवा लबाडी या दोन्हींत मानवी कौशल्य अशा रीतीने व्यक्त झालेले असते की, त्यामुळेच वाङ्मयचौर्य असूनही ते अस्सल असल्याचा भास निर्माण होतो आणि त्याचा हेतू वाचकाला फसवणे हाच असतो. वाङ्मयचौर्य कृतीत चोर इतरांचे लेखन स्वतःच्या नावाने लाटू इच्छितो. तर प्रक्षिप्त वाङ्मयात स्वतःचे लेखन इतरांच्या नावावर खपवू पाहतो. सकृतदर्शनी दोन्ही कृती नैतिक दृष्ट्या चुकीच्या आहेत, पण ‘वाङ्मयचौर्य आणि लबाडी’ या दोन्हींत सौंदर्यशास्त्रीय दृष्टीकोनातून सकृतदर्शनी चूक काय ? ही अधिक अवघड समस्या आहे, असे मत प्राध्यापक मायकेल रीन (मार्व्क़ेट युनिव्हर्सिटी, अमेरिका) यांनी मांडले आहे.
स्टॅनले फिश या अमेरिकन साहित्य सिद्धान्तकर्ता आणि कायदेतज्ञाच्या मते लोकांना वाङ्मयचौर्याची समस्या तात्त्विक आणि नैतिक दृष्ट्या अतिरंजित करण्याची सवय असते. खरे तर वाङ्मयचौर्य हे उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित पाप आहे, ती तात्त्विक समस्या नाहीच. वाङ्मयचौर्य हा वैचारिक शिस्तीच्या सभ्यतेचा भंग आहे. डेनीस डटन (न्यूझीलंड) या कला कायदेतज्ञ व कला तत्त्ववेत्त्याच्या मते वाङ्मयचौर्यात नक्कलबहाद्दर नामश्रेयापेक्षा आशयाचे अपहरण करत असल्याने वाङ्मयचौर्य तात्त्विक दृष्ट्या कमी महत्त्वाचे आहे. आशय म्हणजे विचार, ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तिच्यावरचा प्रताधिकार संशयास्पद असतो; खुद्द त्या विचारापेक्षा वाङ्मयचोराने त्याच्या लेखनात त्या विचाराची अभिव्यक्ती कशी केली आहे, कोणत्या शब्दात, वाक्यप्रचारात, कोणत्या शैलीने केली आहे, यावर चोरी झाली की नाही, हे ठरते. परिणामी वाङ्मयचौर्य तात्त्विक समस्या असण्यापेक्षा कायदेशीर बाबच अधिक आहे.
विचारांची अस्सलता : स्टॅनले फिश याच्या मते, गेल्या काही वर्षात साहित्यिक सिद्धान्त, इतिहास, सांस्कृतिक अभ्यास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, महाजाल अभ्यास इत्यादी ज्ञानक्षेत्रांतून ‘विचारांची अस्सलता’ या संकल्पनेवर मोठा हल्ला होतो आहे. ‘एकमेव लेखक’ हा व्यक्तिवादीग्रस्त बूर्ज्वा संस्कृतीचा शोध आहे. अनेक ठिकाणी सामूहिक विचार केला जातो. ‘अस्सलता’ हीच आता संशयास्पद ठरवली जात असल्याने वाङ्मयचौर्याचा तात्त्विक पाया ढासळतो. जॅक लिंच या संशोधकाच्या मते, ‘अस्सलता’ हा मुद्दा आधुनिक अर्थाने ‘आदर्श’ म्हणून प्रथम अठराव्या शतकात उपस्थित झाला. या बाबतीतील महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणजे एडवर्ड यंग या कवीने वाङ्मयचोरीचा केलेला निषेध. अशा वाङ्मयचोरीसाठी यंग “Sordid Theft” हा शब्दप्रयोग करतात. मराठीत त्याचे भाषांतर ‘घाणेरडी, नीच, गलिच्छ व दरिद्री चोरी’ किंवा ‘अधम चोरी’ या शब्दात करणे शक्य आहे. लिंच अधोरेखित करतो की, अशी ‘विचार, कल्पना चोरी’ ही काहीशी विचित्र चोरी आहे; कारण शब्द आणि कल्पना ह्याच मुळात विचित्र संपदा आहेत. उदा., ‘मी समजा तुमचे पाकीट चोरले तर तुमचे पैसे जातात; पण तुमचे शब्द किंवा कल्पना चोरल्या तर ज्याची चोरी झाली आहे अशी कोणतीही भरीव गोष्ट तुमच्यापासून हिरावली गेलेली नसते.’
नैतिक मूल्य : वाङ्मयचौर्याचा (आणि बनावटगिरीचा) सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात विचार केला, तर विचारांच्या अस्सलतेबाबत बरेच प्रश्न निर्माण होतात. ज्या अस्सलपणाचा आग्रह आधुनिक यूरोपीय-पाश्चात्त्य विचारविश्व धरते, तो जगात फारसा मान्य केला जात नाही. बहुतेक संस्कृतीत मूलतः स्मरणाधारित मौखिक परंपरेने ज्ञानाचे जतन केले गेले. पौर्वात्य देशात, विशेषतः भारतात, ज्ञानपरंपरा गुरुशिष्य आणि भाष्य, टीका इत्यादी माध्यमांद्वारे; पण मौखिक स्वरूपाची होती. काही ग्रंथ, ते कालौघात नष्ट होऊन केवळ भाष्य, टीका या स्वरूपात राहिल्याने तेथे वाङ्मयचौर्याचा प्रश्न नैतिक अधिष्ठानावर टिकत नाही. प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था आणि मध्ययुगीन यूरोपीय-पाश्चात्त्य शिक्षणव्यवस्था तर मौखिकच होती.
सौंदर्यशास्त्रीय मूल्य : डेनीस डटन या कला कायदेतज्ञ व कला तत्त्ववेत्त्याच्या मते बनावटगिरी, वाङ्मयचौर्य आणि चाचेगिरी (Pyrasi) यातही फरक केला पाहिजे. चाचेगिरीत लेखकाला श्रेय मिळते, पण आर्थिक लाभावर दरोडा घातला जातो. बनावटगिरीत कलेची अशी बनवेगिरी होते की, एकाने निर्माण केलेली बनावट कलाकृती मूळ कलाकाराची मूळ कलाकृती म्हणून खपविली जाते. बनावटगिरीत श्रेयाची चोरी होते, तर वाङ्मयचौर्यात दुसऱ्याची विचारकृतीच चोरली जाते. बनावटगिरी हेतुपूर्ण असते म्हणजे बनावटगिरीत अंतर्निहित सौंदर्यात्मक मूल्यापेक्षा केवळ आर्थिक हव्यास हाच हेतू असतो, तर वाङ्मयचौर्यात हेतू असतोच असे नाही. स्वतःच्याच लेखनाचा पुन्हा इतरत्र वापर करणे हे आत्मवाङ्मयचौर्य सुद्धा कळतनकळत घडते. अमेरिकन न्यायाधीश रिचर्ड पोस्नर यांच्या मते ‘वाङ्मयचौर्य हा भांडवलशाही बौद्धिक गुन्हा आहे’; कारण त्याविरुद्ध परिपूर्ण कायदा बनलेला नाही.
कायदेशीर बाब : प्राचीन काळापासून लेखक कवी अशा चोरीची तक्रार करीत असले, तरी अठराव्या शतकापर्यंत त्याची दाद घेतली जात नव्हती. जगातील पहिला “प्रताधिकार कायदा” लंडनमध्ये १० एप्रिल १७१० रोजी पारीत झाला आणि ‘बौद्धिक संपदा हक्क’ ही गोष्ट प्रस्थापित झाली. या कायद्याचे नाव ‘द स्टॅट्यूट ऑफ ॲन’ (The Statute of Anne) असे होते. पण लिंच याच्या मते, हा नक्कल करण्यासंबंधीचा कायदा होता. वाङ्मयचोरीची व्याख्या करणे, तिचा विस्तार करणे किंवा ती थांबविणे इत्यादी हे या कायद्याचे थेट उद्दिष्ट नव्हते. एखाद्या वाङ्मयीन कृतीची अथवा त्याच्या एखाद्या भागाची नक्कल करण्यासंबंधी हा कायदा होता. म्हणजे बेकायदा नक्कल करून (आजच्या भाषेत ‘झेरॉक्स’ करून) विकणे, वितरीत करणे या संबंधी हा कायदा होता. हा कायदा एका अर्थाने बेकायदेशीर प्रकाशक आणि प्रकाशक मंडळींबाबत होता. ‘लेखकाची परवानगी न घेता लेखकाच्या नावासह त्याच्या पुस्तकांची छपाई करून ती विकण्याला प्रतिबंध करणे’ हाच मुद्दा या कायद्यामागे होता. त्यामुळे पूर्वी वाङ्मयचोरी हा गुन्हाच नव्हता.
अलेक्झांडर लिंडे या संशोधकाच्या मते, शब्द अथवा कल्पना ही कुणाची व्यक्तिगत मालमत्ता आहे आणि ती मुक्तपणे इतरांकडून ‘उसनी’ घेणे यात काही गैर आहे, असे कुणाला वाटलेले नाही. अनेक शतके लेखक, चित्रकार, शिल्पकार आणि संगीत रचनाकार मंडळी इतरांना त्यांच्या मूळ कलेची नक्कल करण्यास, त्या मूळ कलेच्या प्रतिकृती बनविण्यास उद्युक्त करीत असत. घटना, प्रसंग, पात्रे आणि कल्पना-संकल्पना हे अखेर ‘जनतेची मालमत्ता’ असते; म्हणजे ती सामान्य लोकांचे निरीक्षण करूनच निर्माण झालेली असते, असे प्राचीन रोमन कवी आणि समीक्षक होरास म्हणतो आणि अशा लेखन घटकांना ‘यथेच्छ लुटा’ असा जणू आदेश देतो. त्यामुळे शेक्सपिअरच्या साऱ्या सदतीस नाटकांत त्याच्या स्वतःच्या कल्पना अशा फारशा आढळत नाहीत, त्या साऱ्या त्याने इकडून तिकडून उचललेल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेक्सपिअरच्या द टेंपेस्ट या त्यातल्या त्यात शेक्सपिअरच्या त्याच्या स्वतःच्या समजल्या जाणाऱ्या नाटकातही फ्रेंच लेखक आणि तत्त्ववत्ता मॉन्तेन याचे अनेक लांबलचक उतारे आढळतील. ‘निसर्गाची नक्कल करून अस्सल लेखन करू पाहणाऱ्या कवी, लेखकांबाबत अलेक्झांडर पोप हा कवी आणि धर्मगुरू म्हणतो, “अभिजात साहित्यातून चोरण्याशिवाय आपल्यापुढे पर्यायच नाही; कारण निसर्गाची नक्कल करणे म्हणजेच त्यांची (अभिजात साहित्य लेखनाची) नक्कल करणे आहे.”
गंभीर गुन्ह्याची क्षेत्रे : वाङ्मयचोरी ही कायदेशीर रीत्या गुन्हा नसली, तरी ती नैतिक दृष्ट्या गंभीर मानली जाणारी क्षेत्रे म्हणजे पत्रकारिता आणि शिक्षणक्षेत्र. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, मार्गदर्शक हे वाङ्मयचोरीत अग्रेसर असतात. तथापि आज विसाव्या-एकविसाव्या शतकात अनेक कायदे करण्यात आले आहेत. प्रताधिकार (लेखाधिकार), बौद्धिक संपदा हक्क इत्यादी कायदेशीर तरतुदी आणि पदावनती, आर्थिक लाभ अवनती आणि प्रसंगी सक्तीची सेवामुक्ती अशा आनुषंगिक दंडात्मक कारवाई इत्यादी गोष्टी पुढे आल्या आहेत. अशा घटनांमध्ये सामाजिक अपकीर्ती हा मोठा तोटा भोगावा लागतो. विद्यमान काळाच्या संदर्भात या साऱ्या नव्या बदलांची नोंद घेणे अनिवार्य आहेच.
बौद्धिक संपदा हक्क व संरक्षण या संदर्भात अमेरिकन कायदे अत्यंत काटेकोर असून त्यांची अंमलबजावणी अतिशय कडक रीतीने केली जाते. सर्व तऱ्हेच्या अमेरिकन ज्ञानव्यवस्थांमध्ये हे दिसून येते. विकीपीडिया प्रकल्पात तेथील लेखन, चित्रे इत्यादी सार्वजनिक उपयोगासाठी मुक्त प्रताधिकारात उपलब्ध करून दिला जातो; तथापि लेखक, संपादक इत्यादींना मात्र प्रताधिकार कायद्याचे पालन करणे अनिवार्य असते.
वाङ्मयचौर्य शोधाची मर्यादा : दुसर्याच्या साहित्याची हुबेहूब प्रतिकृती करून ती स्वत:च्या नावावर खापविणारी व्यक्ती लेखाधिकार अधिनियमाद्वारे गुन्हेगार ठरून तिला दंड वा कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. परंतु वाङ्मयचौर्य ही समकालीन महाजालाच्या काळात सहज, सोपी आहे. शिवाय या सुगमतेला जोडून चोरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी होते, पण त्याच वेळी ती अज्ञात राहू शकते. त्याची दोन स्पष्ट कारणे दिसतात. पहिले असे की, चोरी शोधणारी संगणकीय यंत्रणा इंग्रजी भाषेच्या माध्यमातून विकसित करणे सोपे झाले आहे. पण प्रादेशिक भाषेतील या चोऱ्या लक्षात याव्यात, अशा रितीच्या प्रादेशिक भाषेतील संगणकीय यंत्रणा अद्यापि उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. दुसरे असे की, ही संगणकीय यंत्रणा आजतरी निसर्गविज्ञानांपुरती मर्यादित आहे, तिचा विस्तार अद्यापि सामाजिक विज्ञाने आणि मानस-नीति आणि मानव्यविद्यापर्यंत झालेला नाही. शिवाय निसर्गविज्ञानांच्या नियतकालिकात लेख, निबंध प्रसिद्धीस कधी मिळाला इत्यादीची नोंद करण्याची एक व्यावसायिक शिस्त आहे, तशी इतर विद्याशाखेत अद्यापि रुजलेली, रुळलेली नाही.
संदर्भ :
- Honderich, Ted, Ed. The Oxford Companion of Philosophy, Oxford, 2005.
- Mallon, Thomas, Stolen Words : The Classic Book on Plagiarism, Oregon, 2001.
- Wreen, Michael, ‘Plagiarism’, Marquette University, Wisconsin, page 719-20.
- हेमाडे, श्रीनिवास, ‘वाङ्मयचौर्य आणि श्रेयचौर्य : एक सिंहावलोकन’, संगमनेर, २०१६.
- http://www.denisdutton.com/forgery_and_plagiarism.htm
- http://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/meta.12241/epdf?
- http://www.writing-world.com/rights/lynch.shtml.
- http://www.hup.harvard.edu/features/in-praise-of-copying/In-Praise-of-Copying-by-Marcus-Boon-HUP-free-full-text.pdf.
- http://www.esm.rochester.edu/registrar/files/2014/05/plagiarism_examples.pdf
- http://www.plagiarism.org/plagiarism-101/what-is-plagiarism/
- https://www.theguardian.com/technology/2014/mar/21/rise-plagiarism-internet-shia-labeouf, First published on Friday 21 March 2014 15.00 GMT
- https://opinionator.blogs.nytimes.com/2010/08/09/plagiarism-is-not-a-big-moral-deal/?_r=0, August 9, 2010 9:00 pm
समीक्षक – राधिका जाधव