चारित्र्याचे किंवा शीलाचे स्वरूप दुहेरी आहे. ज्याच्या ठिकाणी चारित्र्य आहे, अशा माणसाच्या मानसिक जीवनात व वर्तनात सुसंगती असते, त्याच्या आचरणात स्थैर्य असते, कित्येक उद्दिष्ट्ये–उदा., आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे कल्याण, व्यावसायिक यश इ.–साधण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो, कित्येक नियम तो न ढळता पाळतो. तेव्हा चारित्र्यवान माणसावर भरवसा ठेवता येतो, कोणत्या परिस्थितीत तो कसा वागेल ह्याची चांगली अटकळ बांधता येते. चारित्र्यवान माणूस लहरी, उथळ नसतो; तात्कालिक भावनेच्या भरात, मोहाच्या प्रसंगी तो वाहवून जात नाही. पण चारित्र्यामुळे स्थिर, सुसंगत आचरण शक्य होते, ही चारित्र्याची एक बाजू झाली. चारित्र्याला दुसरी, नैतिक बाजू असते. चारित्र्यवान माणसाचे आचरण ज्याप्रमाणे स्थिर, सुसंगत असते; त्यामध्ये ज्याप्रमाणे शिस्त व संयम आढळतो, त्याप्रमाणे चारित्र्यवान माणूस सदाचरणी असावा लागतो. जी उद्दिष्ट्ये साधण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो, ती चांगली उद्दिष्ट्ये असावी लागतात; जे नियम तो न ढळता पाळतो, ते नैतिक नियम असावे लागतात. एखादा खलपुरुष आपल्या कित्येक दुष्ट हेतूंच्या पूर्तीसाठी जन्मभर सातत्याने प्रयत्न करील, त्यासाठी आवश्यक तो संयम व शिस्त तो पाळील; पण त्याला कोणी चारित्र्यवान म्हणणार नाही. तेव्हा चारित्र्य ही जशी मानसशास्त्रातील संकल्पना आहे, तशी ती नीतिशास्त्रातील संकल्पना आहे.
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वभावधर्म हा जसा विशेष आहे, त्याचप्रमाणे चारित्र्य हाही मानवी व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा विशेष आहे. ह्या गोष्टीवर विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्या मानसशास्त्रज्ञाने विशेष भर दिला होता. माणसाचे चारित्र्य कसे विकास पावते व दृढ होते, ह्याची मॅक्डूगलने केलेली मीमांसा आजही लक्षणीय आहे. मॅक्डूगलच्या मताप्रमाणे सहजप्रेरणा ह्या माणसाच्या आणि प्राण्यांच्याही मनाचे अंतिम घटक होत. आपण जर एखादी विशिष्ट सहजप्रेरणा घेतली, उदा., भीतीची सहजप्रेरणा, तर तिची तीन अंगे असतात, असे आढळून येते : (१) काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू आणि प्रसंग ह्यांचे अवलोकन करण्याची प्रवृत्ती. उदा., भीती ह्या सहजप्रेरणेच्या बाबतीत बोलायचे, तर ज्यांच्यापासून आपल्याला काही इजा पोहोचेल अशा वस्तूंचे व प्रसंगांचे अवलोकन करण्याची प्रवृत्ती; (२) ह्या अवलोकनामुळे एक विशिष्ट आवेग (Impulse) व भावनिक खळबळ मनात निर्माण होण्याची प्रवृत्ती–इजा होईल अशा वस्तूपासून किंवा प्रसंगापासून पळून जाण्याची प्रेरणा आणि भीती ह्या भावनेची खळबळ–आणि (३) ह्या प्रेरणेचे समाधान करण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक कृती. उदा., पळून जाणे, लपणे इ. करण्याची कुवत. माणसाचे (आणि प्राण्यांचे) मन अशा अनेक सहजप्रेरणांचे बनलेले असते. उदा., रागावण्याची सहजप्रेरणा, वत्सलतेची सहजप्रेरणा, आपल्या बरोबरीच्या वा कनिष्ठ लोकांवर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती, आपल्याहून श्रेष्ठ असलेल्यांपुढे लीन होण्याची प्रवृत्ती इत्यादी.
ह्या सहजप्रेरणांतून स्थिरभाव (Sentiments) निर्माण होतात. स्थिरभाव हे विशिष्ट वस्तू, व्यक्ती, समूह किंवा कल्पना ह्यांच्याशी निगडित असतात. उदा., मला इजा करील अशा कोणत्याही व्यक्तीविषयी भीती वाटणे, ही माझी सहजप्रेरणा आहे; पण एका विशिष्ट व्यक्तीने जर मला वारंवार इजा केली असेल, तर ह्या अनुभवामुळे ह्या विशिष्ट व्यक्तीविषयीचा भीतीचा स्थिरभाव माझ्या मनात निर्माण होईल. ह्याचप्रमाणे एखाद्या समूहाविषयी–उदा., एखादे राष्ट्र किंवा एखाद्या कल्पनेविषयी (उदा., सर्वंकषवादाची विचारसरणी)–भीतीचा स्थिरभाव निर्माण होईल. तसेच एखाद्या व्यक्तीविषयीच्या स्थिरभावामध्ये अनेक सहजप्रेरणा एकवटलेल्या असतील. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला आदर वाटतो, तेव्हा त्याच्याविषयी भीती वाटते, त्याच्या श्रेष्ठ गुणांमुळे त्याच्यापुढे आपण लीन होतो व त्याच्याविषयी आपुलकीची भावनाही आपल्या मनात असते. सर्वसाधारण माणसाच्या मनात त्याच्या सहजप्रेरणांवर आधारलेले असे अनेक स्थिरभाव असतात. त्याची मुलेबाळे, पत्नी, आई व वडील, मित्र, गुरूजन, सहकारी, त्यांचे कुटुंब, समाज, राष्ट्र, त्याचे नैतिक व धार्मिक आदर्श इत्यादींविषयीच्या त्याच्या मनात असलेल्या स्थिरभावांमुळे त्याच्या वर्तनाला स्थैर्य, सुसंगती लाभते. उदा., मुलांविषयीच्या वत्सलतेमुळे तो कंटाळवाणी असलेली नोकरी करीत राहतो, आपल्या इच्छा मारून पैसे साठवतो, बायकोवरील प्रेमामुळे, कुटुंबाच्या प्रतिष्ठेविषयीच्या इमानामुळे तो मोहाच्या क्षणी संयम पाळतो.
सर्वसाधारणपणे माणसाच्या मनात केवळ असे फुटकळ स्थिरभाव नसतात, तर अशा स्थिरभावांची एक व्यवस्था असते. त्याच्या स्थिरभावांपैकी एक स्थिरभाव इतका प्रबळ असतो की, तो प्रधान ठरतो व त्याच्यापुढे इतर स्थिरभाव दुय्यम, गौण ठरतात. सर्वसामान्य माणसे घेतली, तर स्वतःच्या कुटुंबाविषयीचा स्थिरभाव त्यांच्या बाबतीत प्रधान असतो. तेव्हा ह्या स्थिरभावाशी सुसंगत ठरेल अशा रीतीने इतर स्थिरभावांचे तो समाधान करतो व त्याच्याशी विरोधी असलेल्या स्थिरभावांचे तो दमन करतो. ह्याचप्रकारे खऱ्याखुऱ्या देशभक्ताच्या मनात देशभक्ती हा प्रधान स्थिरभाव असतो आणि विद्वानाच्या मनात ज्ञानाविषयीची आस्था हा प्रधान स्थिरभाव असतो. ज्या माणसाच्या स्थिरभावांची एका प्रधान स्थिरभावाभोवती व्यवस्था लागलेली नसते, त्याचे वागणे लहरी व स्वच्छंदी असते, त्या त्या वेळी जो जो स्थिरभाव किंवा जी जी सहजप्रेरणा त्याच्या मनात जागृत असते त्याला किंवा तिला अनुसरून त्याचे वर्तन घडत असते.
एका प्रधान स्थिरभावाभोवती सर्व स्थिरभावांची व्यवस्था लावल्याने व्यक्तीच्या आचरणात सुसंगती व सातत्य निर्माण होते, हे आपण पाहिले; पण त्यामुळे त्या व्यक्तीच्या ठिकाणी चारित्र्य आहे, असे होत नाही. कारण चारित्र्य नैतिक असते. ह्यासाठी समाजात मान्य असलेले नैतिक आदर्श व दंडक व्यक्तीने आत्मसात केले पाहिजेत. हे आत्मपर स्थिरभावांचे कार्य आहे. हा स्थिरभाव स्वतःचा इतरांवर प्रभाव पाडण्याची वा स्वनिर्धारणाची जी सहजप्रेरणा असते तिच्यावर आधारलेला आहे. आपले गुण व कर्तबगारी, त्याचप्रमाणे ज्यांना आपले मानले आहे–उदा., आपली मुले, कुटुंब, देश इ.–त्यांचे गुण व कर्तबगारी ह्यांचा अभिमान बाळगणे, हे ह्या सहजप्रेरणांचे कार्य आहे. जेव्हा नैतिक आदर्श व दंडक आपण आत्मसात करतो व आपले वर्तन सदैव त्यांना अनुसरून घडते ह्याचा अभिमान बाळगतो, तेव्हा आत्मपर स्थिरभाव निर्माण होतो. हा स्थिरभाव ज्यांच्या ठिकाणी प्रबळ असतो, त्यांच्या आचरणात नैतिक अधिष्ठान असते. ते चारित्र्यवान असतात. चारित्र्याची मॅक्डूगलने केलेली ही मीमांसा आजही मोलाची समजली जाते.
व्यक्तीला चांगली व्यक्ती म्हणून संयम, धैर्य, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, न्यायबुद्धी इ. जे गुण आवश्यक असतात, ते ‘नैतिक सद्गुण’ होत. हे सद्गुण व्यक्तीचे चारित्र्य घडवितात. ते नीतिमत्तेचे घटक असतात. त्यांना स्वत: मूल्य (Good-in-Itself) असते. चांगली व्यक्ती म्हणजे चारित्र्यसंपन्न, सज्जन, सत्प्रवृत्त व्यक्ती. नैतिक दृष्टिकोनानुसार सदसद्विवेकबुद्धी ही व्यक्तीच्या चारित्र्याची, विशिष्ट आदर्श व तत्त्वे यांना तिच्या असलेल्या बांधिलकीची अभिव्यक्ती असते. व्यक्तीचे निर्णयस्वातंत्र्य, परिपक्वता, चारित्र्य आणि एकूण नैतिक सचोटी यांची सदसद्विवेकबुद्धी कसोटी असते.
समाजाचे नेतृत्व चारित्र्यवान व्यक्तींनी केले पाहिजे आणि अशा व्यक्ती निर्माण करणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, हा विचार प्लेटो (इ.स.पू.४२८–३४८) याने आग्रहाने मांडला. चारित्र्यवान पुरुषाचा त्याने वर्णन केलेला आदर्श आणि अशा व्यक्ती निर्माण करण्यासाठी त्याने घालून दिलेली शिक्षणपद्धती ह्यांचा प्रभाव यूरोपीय विचारसरणीवर अजूनही जाणवतो. उदा. ईटन, हॅरो इ. इंग्लिश पब्लिक स्कूलचे पारंपरिक कार्य, समाजाचे नेतृत्व करू शकतील असे चारित्र्यवान तरुण निर्माण करणे हे होते. निरोगी व बळकट शरीर, धैर्य, इमान, सांघिक वृत्ती, आज्ञापालनाची सवय, जबाबदारीची जाणीव हे ह्या चारित्र्याचे घटक होते. लोकशाही व सामाजिक समता मानणाऱ्या आजच्या युगात चारित्र्याच्या ह्या आदर्शात काही भर घालावी लागेल; पण नेत्यांचे चारित्र्य हा सामाजिक स्वास्थ्य आणि प्रगती ह्यांचा पाया आहे, हे सत्य कोणत्याही समाजपद्धतीत अबाधित राहील.
‘यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन:।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।
भगवद्गीतेतील (३.२०) श्लोकाचा मथितार्थ हाच आहे.
पाश्चात्त्य नीतिशास्त्रात चारित्र्याला नैतिक वक्तव्यांचा निकष मानून चर्चा केली आहे. ‘हा निर्णय योग्य आहे’, ‘ही कृती चांगली आहे/नाही’, ‘असे वागणे स्तुत्य होय/नाही’ असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा म्हणण्याचा रोख कृतीवर किंवा वागण्यावर असतो. अधिक विचारांती नीतीचे जे तत्त्व अभिप्रेत असेल, ते लक्षात येते. कृतीचा किंवा वागण्याचा भलेबुरेपणा ठरविताना आपण कधी कर्त्याची बुद्धी, कधी धोरण, कधी हेतू, कधी प्रयोजन व कधी कृती यांचे परिणाम विचारात घेतो. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे कर्ता कसा आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे, आचरण कसे आहे, हे विचारात घेऊन युक्तायुक्तता ठरविली जाते. म्हणून ‘चारित्र्य’ हा नैतिक मूल्यमापनातील महत्त्वाचा निकष होय.
संदर्भ :
- Bain, A. A. Study of Character, London, 1861.
- Brandt, Richard, Morality, Utilitarianism, and Rights, Cambridge, 1992.
- Devettere, Raymond, Introduction to Virtue Ethics, Georgetown, 2002.
- Doris, John, Lack of Character : Personality and Moral Behavior, Cambridge, 2002.
- Flanagan, Owen; Rorty, Amélie, Eds. Identity, Character, and Morality : Essays in Moral Psychology, Cambridge, 1990.
- Hartshorne, H.; May, M. and others, Studies in the Nature of Character, 3 Vols, New York, 1928, 29, 30.
- Kupperman, Joel, Character, New York, 1995.
- McKinnon, Christine, Character, Virtue Theories, and the Vices, Ontario, 1999.
- Mischel, Walter, Personality and Assessment, New Jersey, 1968.
- Roback, A. The Psychology of Character, London, 1953.
- https://iep.utm.edu/moral-ch/
- https://plato.stanford.edu/entries/moral-character/