मेघश्याम पुंडलीक रेगे

रेगे, मेघश्याम पुंडलीक : (२४ जानेवारी १९२४—२८ डिसेंबर २०००). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ, विचारवंत व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष तथा ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक. ‘मेपुं’ या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म कोकणातील आरोंदा (जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात पदवी (१९४४) व पदव्युत्तर पदवी (१९४६) घेतली. तत्त्वज्ञानाबरोबरच तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र, धर्म, भाषा-साहित्य आदी विषयांचाही त्यांनी सखोल, व्यापक, सर्वांगीण व्यासंग केला होता. त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक व वैचारिक जडणघडणीत प्लेटो, रसेल, कांट, व्हिट्गेन्श्टाइन इ. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ-विचारवंतांचा प्रभाव होता. तसेच एफ. एच. ब्रॅड्ली, जी. ई. मुर, सी. डी. ब्रॉड या तत्त्ववेत्त्यांच्या प्रभावातूनही रेगे यांच्या तत्त्वज्ञानात्मक विचारांची बैठक पक्की झाली. १९५९-६० या वर्षी त्यांना उच्च शिक्षणासाठी ‘ब्रिटिश कौन्सिल’ची  शिष्यवृत्ती मिळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी ए. जे. एअर व प्रा. डमेट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चिन्हांकित तर्कशास्त्र’ (सिम्बॉलिक लॉजिक) या ज्ञानशाखेचा विशेष अभ्यास केला. रेगे यांनी गुजरातमधील नवसारी येथील महाविद्यालयात (१९४६–४९) तसेच अहमदाबाद येथील महाविद्यालयात  (१९४९-५०)अधिव्याख्याता म्हणून व नंतर औरंगाबाद (छ. संभाजीनगर) येथील मिलिंद महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून काम केले (१९५०–५४). या काळात त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह निष्ठावान आंबेडकरवादी अनुयायांशी संबंध आला आणि दलित समस्यांविषयी त्यांच्या मनात आस्था व जागरुकता निर्माण झाली. तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाकडेही ते आकर्षिले गेले. पुढे ते मुंबईतील कीर्ती महाविद्यालयामधून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले (१९८४).

वाईतील प्राज्ञपाठशाळामंडळ आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी रेगे यांचा घनिष्ठ संबंध होता. १९६४ पासून ते ‘मराठी विश्वकोशा’त अभ्यागत संपादक म्हणून येत असत. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या पुढील कार्यासाठी वाई हे ठिकाण निवडले. तर्कतीर्थांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. तर्कतीर्थांनी ‘नवभारत’ मासिकाची जबाबदारी रेगे यांच्यावर सोपवली. याच काळात गोवर्धन पारीख, अ. भि. शहा, अच्युतराव पटवर्धन आदी विद्वानांशी त्यांची मैत्री जमली. ‘प्रा. जी. डी. पारीख संशोधन केंद्र’ (मुंबई) व ‘भारतीय शिक्षण संस्था’ (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’, पुणे) येथे संचालक म्हणून त्यांनी काम केले. शिवाय ‘न्यू क्वेस्ट’ या वैचारिक मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

तर्कतीर्थांनंतर रेगे हे प्राज्ञपाठशाळामंडळाचे अध्यक्ष, तसेच ‘धर्मकोश’ प्रकल्पाचे प्रमुख संपादक झाले. त्यांनी प्राज्ञपाठशाळामंडळातर्फे तर्कतीर्थांच्या नावे ‘सर्वधर्म अध्ययन केंद्र’ हा अभिनव प्रकल्प राबवून महाराष्ट्रभरातील विचारवंतांना व्याख्यानासाठी पाचारण केले. धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा मानवतावादी मूल्यांच्या आधारे घडवून आणता येते; समता, स्वातंत्र्य आणि करुणा या मूल्यांतून हे परिवर्तन शक्य आहे, अशी त्यांची धारणा होती. यासाठी त्यांनी हिंदू धर्मासह बौद्ध, यहुदी, जैन, ख्रिस्ती, इस्लाम, शीख आदी धार्मिक परंपरांचे चिकित्सक समालोचन केले; तसेच भारतीय संस्कृतीच्या घडणीत विविध धार्मिक परंपरांच्या योगदानाचा अभ्यास करण्यावर भर दिला. याबरोबरच त्यांनी प्राज्ञपाठशाळामंडळामार्फत भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची तौलनिक दृष्टीकोनातून मीमांसा व चिकित्सा करण्यासाठी ‘पंडित-तत्त्ववेत्ते प्रकल्प’ (पंडित-फिलॉसॉफर प्रोजेक्ट) राबवून ‘पूर्व-पश्चिम संवाद’ घडवून आणला (१९९२). त्याद्वारे त्यांनी पाश्चात्त्य विद्वानांना भारतीय तत्त्वज्ञान व तर्कशास्त्राची ओळख करून दिली. इंग्रजीतून तत्त्वज्ञान शिकलेले तत्त्ववेत्ते आणि पारंपरिक पद्धतीने पठण केलेले संस्कृत पंडित यांच्यात समन्वय घडवून ज्ञानाचे आदानप्रदान केले. यासाठी त्यांनी पुणे, मुंबई, नागपूर, गोवा, जगन्नाथपुरी आदी ठिकाणी शिबिरे भरविली. आकारिक तर्कशास्त्रासारख्या (फॉर्मल लॉजिक) जटिल विषयाचे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक यांच्यासाठी त्यांनी विनामूल्य अध्यापन केले.

रेगे यांच्यावर ‘धर्मकोशा’बरोबर ‘मराठी विश्वकोशा’चीही जबाबदारी आली (४ जून १९९४). ‘मराठी विश्वकोशा’च्या रचनेमागची प्रमुख प्रेरणा ही तर्कतीर्थांची होती. मराठी भाषकांच्या दृष्टीने हा अत्यंत उपयुक्त ज्ञानप्रकल्प असल्याने रेगे यांनी ‘विश्वकोशा’ची गुणवत्ता व दर्जा यत्किंचितही ढळू न देता १५ व्या आणि १६ व्या खंडांचे काम मार्गी लावले. यांतील १५ वा खंड त्यांनी तर्कतीर्थांच्या नावे प्रकाशित केला. महाराष्ट्रातील सामान्य वाचकवर्ग हा तुलनेने मोठा असून, त्यांना तत्त्वज्ञानातील अनेक संज्ञा, संकल्पना, विविध समस्या इ. पटवून देण्याच्या उद्देशाने रेगे यांनी ‘मराठी विश्वकोशा’त तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र इ. विषयांतर्गत येणार्‍या बर्‍याच नोंदींचे लेखन केले. हे लेखन करीत असताना नोंदींमध्ये वापरलेली परिभाषा ही प्रमाणभूत, बिनचूक व चपखल असावी यावर त्यांनी कटाक्षाने भर दिला. त्यांनी आपल्या वस्तुनिष्ठ लेखनातून सामान्य वाचकाला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून तर दिलाच, शिवाय विषयासंबंधीची जिज्ञासा वाढावी यासाठीही काटेकोर प्रयत्न केला. उदा., प्रातिनिधिक स्वरूपात विविध खंडांत आलेली नोंदींची नावे–ॲरिस्टॉटल; ईश्वरवाद; ग्रीक तत्त्वज्ञान; तर्कशास्त्र, आकारिक; नीतिशास्त्र; विरोधापत्ति, तार्किक; विज्ञानाचे तत्त्वज्ञान (पूर्वार्ध) इत्यादी. तसेच तर्कतीर्थांच्या संकल्पनेतील ‘मराठी कुमार विश्वकोशा’च्या प्रकल्पाचे नियोजन व परिचय खंड तयार करण्याचे मोलाचे कार्यही त्यांनी केले.

रेगे हे बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि शिक्षक-प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध होते. ‘आकारिक तर्कशास्त्र’ (१९७६), ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ (१९७८), ‘तत्त्वज्ञानातील समस्या’ (मराठी अनुवाद १९७८, मूळ लेखक बर्ट्रंड रसेल), ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ (१९९४), ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’ (१९९६), ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’ (२००२), ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ (२००४), ‘स्वातंत्र्य, समता आणि न्याय’ (२००५) ही त्यांची मौलिक ग्रंथसंपदा. आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र त्यांचा वैचारिक प्रवास आस्तिक, सश्रद्ध व धर्मसुधारणावादी आध्यात्मिक विचारप्रणालीच्या दिशेने होत गेला. ‘मी आस्तिक आहे का?’, ‘परंपरागत श्रद्धा’, ‘देवाशी भांडण’, ‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ आदी त्यांचे स्फुटलेख विशेष गाजले.

रेगे यांनी प्राचीन भारतीय परंपरेचा आध्यात्मिक वारसा आणि आधुनिक पाश्चात्त्य विचार यांची आधुनिक भारताच्या परिप्रेक्ष्यातून तटस्थपणे मांडणी केली. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान एकोणिसाव्या शतकात अनुभववादाने (इंपिरिझम) प्रभावित होते. या अनुभववादी तत्त्वज्ञानाला एकोणिसाव्या शतकात जॉन स्ट्यूअर्ट मिल यांनी सुव्यवस्थित रूप दिले. नीतिशास्त्रात अनुभववादाशी सुसंगत असलेल्या सुखवादी उपयुक्ततावादालाही (हिडॉनिस्टिक यूटिलिटॅरिॲनिझम) त्यांनी सुव्यवस्थित रूप दिले. ‘जास्तीत जास्त व्यक्तींचे जास्तीत जास्त सुख साधावे–तो त्याचा हक्क, अधिकारच आहे–पण हे सुख साधताना इतर व्यक्तींच्या सुखाच्या आड येता कामा नये’ ही समाजहिताची जाणीवही या तत्त्वज्ञानात अध्याहृत होती. हे तत्त्वज्ञान पूर्णतः भौतिक-इहवादी होते. तथापि या अनुभववादी, उपयुक्ततावादी तत्त्वज्ञानाच्या काही मर्यादा व त्रुटी रेगे यांना जाणवल्या. हे तत्त्वज्ञान जीवनाला एक आध्यात्मिक, धार्मिक अंग असते, हे नाकारत होते. ते नास्तिक, पाखंडी होते. कला, ललित, साहित्य, सौंदर्यात्मक अनुभव, निसर्गाशी भावनिक तादाम्य यांची दखल या तत्त्वज्ञानात घेतली नव्हती. या पार्श्वभूमीवर रेगे यांनी स्वतःच्या आध्यात्मिक, नैतिक तत्त्वज्ञानाची मांडणी केली. तसेच भारतीय तत्त्वज्ञानाच्या आध्यात्मिक, नैतिक अशा पारंपरिक विचारधारेशी कांटच्या पाश्चात्त्य तत्त्वप्रणालीची सांगड घालून रेगे यांनी स्वतःच्या नैतिक-आध्यात्मिक तत्त्वप्रणालीची मांडणी व सिद्धता केली. हिंदुत्वाचा सश्रद्ध स्वीकार करणारी अध्यात्मवादी, आस्तिक तसेच सामाजिक आणि व्यक्तिगत नैतिकतेची तत्त्वज्ञानात्मक भूमिका रेगे यांनी मांडली. भक्ती, पूज्यभाव, प्रेम, वैराग्य इ. भावनांनी धार्मिक-आध्यात्मिक आचरण व साधना प्रेरित झालेली असते. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, अहिंसा, अपरिग्रह या आध्यात्मिक साधनेत फुललेल्या, नीती पलीकडे जाणाऱ्या पण नीतीशी सुसंगत असलेल्या भावना होत. आध्यात्मिक साधनेच्या सर्व रूपांचा आदर केला पाहिजे. रेगे यांच्या धार्मिक-नैतिक तत्त्वज्ञानाचे हे सार म्हणता येईल. प्राज्ञपाठशाळेने प्रकाशित केलेल्या ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ आणि ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’ या दोन पुस्तकांमध्ये रेगे यांची आध्यात्मिक विचारसरणी सुस्पष्टपणे दिसून येते.

रेगे यांनी युक्रांद (युवक क्रांतिदल), दलित पँथर, मुस्लीम सत्यशोधक समाज आदी संस्थांच्या कार्यात मार्गदर्शक या नात्याने सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे तत्त्वचिंतन समाजाप्रती होते, तसेच भाषेप्रतीही होते. डिसेंबर १९८१ मध्ये मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात त्यांनी मराठी भाषेच्या भवितव्याचा विचार म्हणजे मराठी भाषकांच्या भवितव्याचा विचार मांडून मराठी भाषेसमोरील आव्हानांची चिकित्सा केली.

रेगे यांना महाराष्ट्र फौंडेशन (न्यूयॉर्क) यांच्याकडून वैचारिक साहित्यासाठीचा पहिला पुरस्कार (१९९५), मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९९६), कोकण साहित्यभूषण पुरस्कार (१९९९) इत्यादी मानसन्मान लाभले. अभ्यवेक्षक मंडळ (सेन्सॉर बोर्ड); महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांचे ते अनेक वर्षे सदस्य होते.

मुंबई येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

रेगे यांच्या पत्नी शांता या मुंबईतील वायदा बाजार आयोगात अधिकारपदी कार्यरत होत्या. मुलगा किरण (वैज्ञानिक), चित्रा (बालरोगतज्ज्ञ) आणि रूपा (अर्थतज्ज्ञ) ही त्यांची तीन सुविद्य मुले. डॉ. सुनीती देव संपादित ‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ (२०००) हा रेगे यांच्यावरील गौरवग्रंथ, तसेच वसंत पळशीकर संपादित ‘नवभारत’चा ‘रेगे विशेषांक’ (२००१) प्रसिद्ध आहे. एस. डी. इनामदार संपादित रेगे यांच्या लेखांवरील ‘मर्मभेद’ (२००७) आणि ‘भाषा-साहित्य चिंतन : प्रा. मे. पुं. रेगे’ (२०२४) हे ग्रंथ विशेष विचारप्रवण आहेत.

संदर्भ :

  • इनामदार, एस. डी. संपा., ‘भाषा-साहित्य चिंतन : प्रा. मे. पुं. रेगे’, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई, २०२४.
  • जोशी, अशोक कृष्णाजी, संपा., ‘मे. पुं. रेगे जन्मशताब्दी विशेषांक’, ‘नवभारत’, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई, जानेवारी २०२४.
  • देव, सुनीती, संपा., ‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’, नागपूर, २०००.
  • रेगे, मेघश्याम पुंडलीक, ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’, सर्वधर्म अध्ययन केंद्र, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई, १९९४; सुधारित आवृत्ती २००२.

समीक्षक : एस. डी. इनामदार