संस्कृत भाषेतील गद्यपद्यमय श्राव्य काव्य. ते मिश्रकाव्यप्रकाराहून वेगळे असून त्यात साधारणतः मनोभावात्मक विषयांचे वर्णनपद्यामध्ये, तर वर्णनात्मक विवेचन गद्यामध्ये केलेले असते आणि त्याची विभागणी उच्छवासांत (ग्रंथ विभाग) केलेली असते. साहित्यदर्पणात ‘गद्यपदमयं काव्य चम्पूरित्यभिधीयते’ अशी चम्पू शब्दाची व्याख्या दिली आहे. चम्पू शब्दाची व्युत्पत्ती गत्यर्थक अशा चप् या धातूपासून झाली असून त्याला ऊ हा प्रत्यय लागून चम्पू हा शब्द सिद्ध झाला आहे. दण्डीच्या काव्यदर्शात चम्पूचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो; पण दण्डीच्या पूर्वीचे चम्पूवाङ्मय उपलब्ध नाही.
चम्पूकाव्याचा मूलस्रोत रामायण, महाभारत, पुराणे आदींतील मुख्यत्वे कथाविषय आहे. सर्व चम्पूकाव्यात दहाव्या शतकातील त्रिविक्रमभट्टकृत नलचम्पू हा सर्वात प्राचीन (इ. स. ९१५) असून त्यात नलचरित्र वर्णिले आहे. त्या काळातील सोमप्रभसूरीचा यशस्तिलकचम्पूत (इ. स. ९५१) राजा यशोधराने जैन धर्माचा स्वीकार केल्याची कथा आहे. याच काळातील अनंतभट्टांचा भारतचम्पू काव्यदृष्ट्या रमणीय आहे. परमार भोज राजा (कार. १०००-१०५५) याने चम्पूरामायण रचले. यात वाल्मीकी रामायणातील हृद्य प्रसंग चटकदार भाषेत वर्णिले आहेत. काव्यदृष्ट्या हा ग्रंथ उच्चप्रतीचा सरस व सुंदर आहे. त्यात भोजाने गद्यपद्यात्मक रचनेचे अनेक चमत्कार दाखविले आहे. सतराव्या शतकातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची दोन चम्पूकाव्ये असून त्यांपैकी जयराम पिंड्ये रचित राधामाधवविलासचम्पू आणि आनंदरंग विजयचम्पू (श्रीनिवास) होत. पहिल्या चम्पूत शहाजीराजे भोसले यांचे चरित्रवर्णन असून दुसऱ्यात आनंदरंग या डुप्ले (फ्रेंच सेनापती) याच्या सहकाऱ्याचे वर्णन आहे. याच काळातील वेंकटाध्वरीकृत विश्वगुणदर्शचम्पू असून त्याचे स्वरूप विश्वकोशाप्रमाणे आहे. हा चम्पू संवाद रूपाने लिहलेला असून ह्यात कृशनू आणि विश्वावसू हे दोन गंधर्व विमानातून भारतातील तीर्थक्षेत्रे आणि विविध प्रदेश पाहतात आणि त्याचे गुणदोष विवेचन करतात. या चम्पूकडून प्रेरणा घेऊन अण्णय्याचार्याने तत्त्वगुणदर्शचम्पू रचला. त्यात जय आणि विजय यांच्या संभाषणातून शैव व वैष्णव मतांचे गुणदोष दर्शविले आहेत. याशिवाय सोमेश्वरलिखित भागवतचम्पू, शंकर दीक्षितांचा शंकरचेतोविलासचम्पू, तंजावरचा द्वितीय सरफोजी यांचा कुमार संभवचम्पू आदी काही उल्लेखनीय चम्पू अठराव्या शतकातील होत. वेंकटकृष्ण यांचा उत्तरचम्पू रामायण आणि भागवतचम्पू हे १९ व्या शतकातील होत. अर्वाचीन कालखंडातील चम्पूची संख्या दीडशेहून अधिक आहे.
चम्पूची निर्मिती उत्तर भारतात झाली असली, तरी तुलनात्मकदृष्ट्र्या त्यांचा विकास दक्षिण भारतात अधिकतर झाला. तेलुगू व मलयाळम या भाषांत अनेक चम्पूकाव्ये रचली गेली. त्यांपैकी तिरुमलांबा या कवयित्रीचा वरदाम्बाकापरीयण आणि नीलकंठ दीक्षितांचा नीलकंठविजय हे विशेष उल्लेखनीय होत. रस व भाव यांनी ओथंबलेली आणि शब्दार्थ वैचित्र्यामुळे चमत्कृतिपूर्ण वाटणारी अलंकारप्रचुर शैली, कथोपकथा व संविधानकातील विविध प्रसंग यांची सुसूत्र मांडणी, छंदांची योजना, विविध प्रदेश, ऋतू, चंद्रसूर्यांचे उदयारूप इत्यादींची विपुल चित्रदर्शी वर्णने ही या चंपूंची व्यवच्छेदक लक्षणे होत.
संदर्भ :
- उपाध्याय, बलदेव, संस्कृत साहित्य का बृहद इतिहास, वाराणसी, १९७४.
समीक्षक – मंजुषा गोखले