एजर्टन, फ्रँक्लीन : (२३ जुलै १८८५ – ७ डिसेंबर १९६३). विख्यात अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ. संस्कृत, तौलनिक भाषाविज्ञान, वेदविद्या, भारतीय धर्मशास्त्र, प्राच्यविद्या इत्यादी अनेक विषयातील मूलभूत योगदानामुळे विशेष ख्यातकीर्त. त्यांचा जन्म अमेरिकेतील आयोवा येथे झाला. १९०७ ते १९०९ या कालखंडात जॉन हॉपकिन्स विद्यापीठामध्ये शिकत असताना संस्कृत आणि तौलनिक भाषा विज्ञान या विषयांसाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी संस्कृतबरोबरच ग्रीक, लॅटिन जर्मानिक भाषा इत्यादी विषयांचा अभ्यास मॉरिस ब्लूम फील्ड यांच्या मार्गदर्शनाखाली केला.१९०९ साली त्यांनी इंडो इराणी भाषेतील क-प्रत्यय, आणि वेद आणि (पारशी धर्मग्रंथ)अवेस्ता यांमधील क-प्रत्यय या विषयावर आपला पीएच्. डी. चा शोध निबंध सादर केला. त्यानंतर १९१३ ते १९२६ या कालखंडात त्यांनी, पेनसिल्व्हेनिया विदयापीठात संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर १९२६ साली येल्विद्यापीठामध्ये संस्कृत आणि तौलनिक भाषा विज्ञान या विषयाचे ते मानद सॅलिसबरी प्राध्यापक होते. १९४६ साली तेथेच स्टर्लिंग प्राध्यापक या अतिशय सन्माननीय श्रेणीत त्यांचा समावेश झाला.
संस्कृत आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक म्हणून एजर्टन यांचे भारताशी एक नाते जोडले गेले होते. १९५३-५४ मध्ये फुल्ब्राईट शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्राच्यविद्येचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. गौतम बुद्धांच्या महापरिंनिर्वाणाला २५०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या संशोधनावर ब्लूमफील्ड यांच्या संशोधनातील मर्मदृष्टीचा प्रभाव होता. त्यांनी भारतीय धर्मशास्त्र, लोकसाहित्य आणि वैदिक साहित्य या विषयांचा प्रामुख्याने अभ्यास केला. वेद आणि उपनिषदे यांच्या अर्थनिर्णयातील समस्यांचे अध्ययन, वैदिक साहित्याचा भाषाविज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास, अथर्ववेदाच्या काश्मीरी उपशाखेचा अभ्यास यांमधून ब्लूमफील्ड यांच्या वैदिक भाषेतील संशोधनाशी जोडलेली आनुपूर्वी स्पष्ट होते. १९३०, १९३२ आणि १९३४ साली त्यांनी वैदिक भाषेतील तसेच इंडो यूरोपियन भाषांतील अंतःस्थस्वर आणि इतर संबंधित विषयांवरचा अभ्यास तीन ग्रंथांच्या स्वरूपात पूर्ण केला आणि प्रकाशित केला. त्याशिवाय त्यांच्या वैयक्तिक संशोधनाचा भाग म्हणून, अथर्ववेद आणि उपनिषदातील धार्मिक आणि तत्वज्ञानात्मक आशयाचे संपादन त्यांनी केले. १९२४ साली त्यांनी पंचतंत्राची चिकित्सित संशोधित आवृत्ती प्रकाशित केली. पंचतंत्राच्या अनेक आवृत्या गोळा करून, त्यांनी त्याची पुनर्रचना केली. १९२५ साली त्यांनी भगवद्गीतेवरील एक शोधनिबंध आणि त्याच्याच अनुषंगाने सांख्य आणि योग या विषयांवरचे चिंतन प्रकाशित केले.
एजर्टन यांच्या संस्कृतच्या व्यासंगाविषयी एक गोष्ट सांगितली जाते. १९२६ साली ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पुण्यातल्या एका पंडितांकडे मीमांसा हा विषय शिकायला सुरुवात केली. त्यामागे त्यांची प्रमुख भूमिका अशी होती, की इतर विद्यार्थी ज्याप्रमाणे संस्कृतमधूनच संस्कृत शिकतात तसेच आपल्यालाही जमले पाहिजे, मात्र त्यांचा हा आग्रह फार काळ टिकला नाही.
एजर्टन यांच्या संशोधनातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी केलेले महाभारताच्या सभापर्वाचे संपादन. 1920 ते 30 मध्ये एक संस्कृतज्ञ म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. महाभारताच्या सभापर्वाचे संपादन एका अभारतीय विद्वानाने करायचे असे ठरले होते. त्यानुसार थोर प्राच्यविद्या विशारद मॉरिझ विंटरनिट्झ हे काम करणार होते; पण त्यांच्या मृत्यूमुळेही शक्यता संपुष्टात आली. तेव्हा महाभारताच्या चिकित्सक पाठावृत्तीचे तत्कालीन संपादक विष्णु सिताराम सुकथनकर यांनी १९३७ साली ही कामगिरी फ्रँकलीन एजर्टन यांच्यावर सोपवली. हा क्षण फ्रँकलीन एजर्टन आणि तत्कालीन अमेरिकन संस्कृतचे क्षेत्र दोघांचाही सन्मान करणारा होता. १९३७ ते १९४४ या कालावधीत अथक परिश्रमांनी, मध्ये आलेल्या युद्धासारख्या समस्यांनी पुष्कळ वेळ घालवूनही, त्यांनी हे काम जिद्दीने पूर्ण केले. १९५३ साली प्रकाशित झालेला बौद्धांचा संकरित–संस्कृत व्याकरण व शब्दकोश (2 खंड) एक बौद्धांचा संकरित–संस्कृत व्याकरण शब्दकोश (Buddhist Hybrid Sanskrit Grammar and Dictionary) हे त्यांचे संशोधन क्षेत्रातील लक्षणीय कार्य होय.
एजर्टन हे अमेरिकन लिंग्वि स्टिक सोसायटीचे संस्थापक सदस्य होते. १९३४ साली त्यांनी अमेरिकन लिंग्विस्टिक सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. लँग्वेज या नियतकालिकाचा १९५३ सालचा अंक त्यांना समर्पित केला होता. त्याशिवाय अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स् अँड सायन्सेस्या संस्थेचे सदस्य (1920). याशिवाय अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफग्रेट ब्रिटन, लिंग्विस्टिक्स सोसायटी ऑफ इंडिया, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (पुणे), गंगानाथ झा रिसर्च इन्स्टिट्यूट (अलाहाबाद), अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांशी त्यांचे नाव निगडित होते. येल विद्यापठाने, डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स ही पदवी त्यांना बहाल केली. त्यांची सुमारे २०० संशोधनात्मक प्रकाशने आहेत. एखाद्या ग्रंथाचे रूप आणि अर्थ यांच्या अचूकते विषयी ते अतिशय आग्रही असत. त्यांची विद्वत्ताही चिकित्सक, परिश्रम साध्य, अचूक आणि आधार सामग्रीवर (Data) बेतलेली होती. काही विद्वानांना त्यांच्या या अभ्यासात अतिचिकित्सेचा भास होत असला तरी अचूकतेच्या बाबतीत ते एजर्टन यांच्याशी स्पर्धा करीत नसत. त्यांची वर्णनात्मक क्षमता आणि ऐतिहासिक दृष्टी ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने त्यांच्या मांडणीत जाणवतात. त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले.
संदर्भ :
- एमिनो, ए. बी. लँग्वेज (Vol. 40 No.2 ) एप्रिल – जून १९६४.