रनू, लुई : (२८ ऑक्टोबर १८९६ – १८ ऑगस्ट १९६६). फ्रेंच वेदाभ्यासक व भारतविद्यावंत.त्यांचा जन्म पॅरिसमध्ये सुशिक्षित कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर सॅयीलीमधील लायसी जॅन्सॉन विद्यालयात त्यांचा भारतविद्येशी परिचय झाला. स्वप्रयत्नांनी त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला आणि पुढे सिल्व्हएन लेव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली ते संस्कृत पाठ्यपुस्तके सहजरीत्या वाचू लागले. याशिवाय त्यांनी ऑग्यूस्त वार्त या मित्राचे लेख वाचले. त्यांनी Licence es letters (१९२१) पदवी प्राप्त केली. पुढे त्यांची अध्यापक म्हणून रव्हँच्या लायसी कॉर्निल शाळेमध्ये नियुक्ती झाली.

या काळात त्यांनी La valeur du Parfait dans les hymns ve digue (१९२५) हा प्रबंध सादर करून docteures letters (डॉक्टरेट) ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी La geographie de problemee : L’ind हा चिकित्सक टीकात्मक दुसरा प्रबंध लिहिला. त्यांची लेऑन येथे संस्कृत व तुलनात्मक साहित्य या विषयांचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१९२५-१९२८). त्यानंतर त्यांनी Eeole des Hantes Etudes (पॅरिस) येथे अध्यापन केले. सॉरबॉर्न विद्यापीठात त्यांची भारतीय भाषासाहित्याचा प्रमुख प्राध्यापक म्हणून निवड झाली (१९३७). तिथे असतानाच त्यांची अल्फ्रेद फूचर यांच्या जागी इन्स्टिट्यूट द सिव्हिलायझेशन इंडियना या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. रेनूंची ॲकॅदेमी दे स इन्स्क्रिप्शन्स एट बेलाज लेटर्स (१९४६) आणि द ॲकॅडेमी द्यू जपान (१९५६) यांवर निवड झाली. तसेच भारत, डेन्मार्क, झकोस्लोव्हाकिया, नेदर्लंड्स व अन्य देशांच्याॲकॅडेमिक व बौद्धिक संस्थांवर निवड झाली. एशियाटिक सोसायटीचे (फ्रान्स) ते उपाध्यक्ष होते. त्यांनी भारतात १९४८-४९ दरम्यान व्या्ख्याने दिली. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील संस्कृत महाशब्द कोशाच्या कार्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला. लूव्हें विद्यापीठ (बेल्जियम) आणि लंडन विद्यापीठातील स्कूल ऑफ ओरिएंटल ॲण्ड आफ्रिकन स्टडीज यांनी त्यांना  व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले (१९५१). येल विद्यापीठात (अमेरिका) अध्यापनासाठी फ्रँक्लीन एजर्टनचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आणि १९५२-१९५३ दरम्यान त्यांनी तिथे अध्यापन केले. १९५४-५६ दरम्यान ते मायसॉन फ्रँको-जापीनइजचे (टोकिओ) संचालक होते. या ठिकाणी त्यांनी अथर्ववेदाची अध्यापन पद्धती विकसित केली. संस्कृत व्याकरणावर त्यांनी लक्ष केंद्रित केले असले, तरी भारतीय संस्कृती आणि समग्र संस्कृत साहित्याचा त्यांचा व्यासंग लक्षणीय होता. रनु यांचे बहुतेक सर्व लेखन फ्रेंच भाषेत आहे.त्यांनी प्रथम Les maitres de la philology vedique (वैदिक वाग्विद्याविशारद,१९२८) ह्या ग्रंथात आपल्या पूर्वसूरींच्या कार्याचे मूल्यमापन केले. Bibliographic vedique ह्या ग्रंथात १९३१ पर्यंत झालेल्या वेदविषयक लेखनाची त्यांनी सूची केली असून, पुढे सतत अखंडपणे वेद आणि संस्कृत व्याकरण ह्या विषयावर विपुल चिकित्सात्मक लेखन (ग्रंथ आणि लेख ह्या स्वरूपात) केले. त्याबरोबरच अनेक पुस्तकांची परीक्षणेही त्यांनी शोधविषयक नियतकालिकांतून प्रसिद्ध केली. वैदिक साहित्याशिवाय  रघुवंश, कथाश्लोकसंग्रह, वेतालपंचविंशति ह्यांसारख्या ग्रंथांचेही फ्रेंच भाषेत अनुवाद त्यांनी केले. त्यांचे महत्त्वाचे काही ग्रंथ पुढील प्रमाणे, Grammaire Sanskrite (दोन खंड १९३२), संस्कृत-फ्रेंच शब्दकोश (सहकार्याने), वैदिक व्याकरण (१९५२), Vocabulaire du ritual vedique (वैदिक कर्मकांडविषयक शब्दकोश,१९५४), Histoire de langue Sanskrite (संस्कृत भाषेचा इतिहास,१९५६) इत्यादी. त्याशिवाय त्यांचे Les ecoles vedique et la formation du veda (वैदिक शाखा आणि वेदरचना,१९४७), Etudes sur lo vocabulaire du Rgveda (ऋग्वेदातील काही शब्दांचे अर्थनिर्धारण,१९५८), दुर्घटवृत्ति (१९४२), काशिकावृत्ति (१९६०) इत्यादी ग्रंथ महत्त्वाचे आहेत. Etudes vedique et panineenes ह्या १७ खंडात्मक ग्रंथात त्यांनी ऋग्वेदातील अनेक सूक्तांची सटीप भाषांतरे आणि पाणिनीय व्याकरणविषयक अनेक लेख प्रसिद्ध केले आहेत. त्यांचा ऋग्वेद अनुवाद अतिशय शब्दश: आहे. त्यात आधीच्या अनुवादांचाही परामर्श घेतलेला आहे. अंतर्गत तुलना ही पद्धत त्यांनी प्रस्तुत अनुवादासाठी स्वीकारली असून ऋग्वेदातील एखाद्या शब्दाचा अर्थ करताना ऋग्वेदातच अन्यत्र तो शब्द कुठे, कसा वापरला आहे, ते पाहून त्या संदर्भाची परस्पर तुलना करून अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे, हे करताना उत्तरकालीन संस्कृतचा वापर न करणे हेही तत्त्व त्यांनी अवलंबिले आहे. रनू ऋग्वेदाचा संपूर्ण अनुवाद पूर्ण करू शकले नाहीत. सुमारे दोन-तृतीयांश भाग ते पूर्ण करू शकले; कारण तत्पूर्वीच त्यांचे अल्पशा आजाराने पॅरिस येथे निधन झाले. त्यानंतर त्यांचा गौरवग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला. त्यांची पत्नी मेरी सिमॉन रनू त्याच्या लेखन कार्यास मदत करीत असे.

संदर्भ :

  • ‘‘Benveniste, Notice sur la vie et travaux de M. Renou….Paris, 1966.’’, ह्या लेखाचा मराठी अनुवाद, नवभारत, एप्रिल, १९६८.