ब्यूह्लर, योहान जॉर्ज : (१९ जुलै १८३७, बोर्स्टेल,जर्मनी – ८ एप्रिल १८९८).भारतविद्येचे अग्रगण्य जर्मन अभ्यासक आणि संशोधक. भारतीय लिपिशास्त्रातील त्यांच्या योगदानामुळे प्रसिद्ध. भारतीय विद्येच्या कोणत्याही शाखेविषयी पूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा घेताना यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही इतके मूलभूत स्वरूपाचे काम त्यांनी केले. जन्म जर्मनीच्या हॅनोवर प्रांतातील न्यूएनबर्गजवळील बोर्स्टेल येथे. त्यांचे वडील ख्रिश्चन धर्मगुरू होते. आरंभीचे शिक्षण हॅनोवर येथे झाल्यावर १८५५ ते १८५८ या काळात गटिंगेन विद्यापीठात त्यांनी अभिजात वाग्विद्या (Classical Philology), जर्मन वाग्विद्या, तत्त्वज्ञान, प्राच्यविद्येच्या सर्व शाखांसह विविध पौर्वात्य भाषांचे अध्ययन केले. लोकसाहित्याचे अभ्यासक थिओडोर बेन्फे हे त्यांचे संस्कृतचे गुरु. इ.स.१८५८ मध्ये त्यांनी गटिंगेन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. काही काळ रॉयल लायब्ररी, विन्डसर, इंग्लंड येथे सहायक ग्रंथपाल म्हणून काम केल्यावर गटिंगेन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ते काम करू लागले. त्यांचे सुरुवातीचे लेखन हे तौलनिक वाग्विद्या आणि वैदिक पुराणशास्त्र याविषयी होते.तौलनिक वाग्विद्येचा केवळ एक भाग म्हणून संस्कृतचा अभ्यास करणाऱ्या ब्यूह्लरला संस्कृतमध्ये अधिकाधिक रुची वाटू लागली व भारतात येण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.इ.स. १८६२ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण खात्यात जागा आहे असे समजताच ते मुंबईत दाखल झाले. मात्र त्यांना कबूल करण्यात आलेली जागा रिकामी नव्हती. सुदैवाने एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य सर अलेक्झांडर ग्रँट यांच्याशी परिचय होऊन ब्यूह्लर त्या कॉलेजचे संस्कृतचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले.ब्यूह्लर तेथे संस्कृत,लॅटिन,वाग्विद्या आणि प्राचीन इतिहास हे विषय शिकवत असत. भारतीयांना युरोपातील संशोधनपद्धतीची माहिती करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.त्याचबरोबर संस्कृताभ्यासाच्या प्रगतीसाठी पारंपरिकरीत्या शिक्षण घेतलेल्या पंडितांचे योगदानही महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत होते. युरोपातील आणि प्राचीन हिंदू शिक्षणपद्धतीतील चांगल्या गोष्टी एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
इ.स.१८६५-६६ मध्ये बॉम्बे संस्कृत सिरीज या प्रसिद्ध प्रकाशनमालेची योजना आखण्यात आली. चिकित्सक आणि विद्वात्तापूर्ण संपादनामुळे या मालिकेतील पुस्तके जगभरातल्या संस्कृताभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली. ब्यूह्लर आणि फ्रान्त्स कीलहॉर्न हे त्यातील पहिले संपादक होते. या मालिकेमध्ये ब्यूह्लरने पंचतंत्राची २ ते ५ ही तंत्रे आणि दंडीच्या दशकुमारचरिताचा पहिला भाग संपादित केला. इ.स. १८६८ मध्ये ब्यूह्लरने मुंबई इलाख्याच्या शिक्षणखात्यात उत्तर प्रभागात (आताचे गुजरात राज्य) शाळा तपासनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली.पुढील दहा वर्षे त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील जिल्ह्यांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्य केले.गुजरातमधील प्राथमिक शिक्षणाचा पाया घालण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या नियुक्तीचा उपयोग ब्यूह्लरने विविध ठिकाणची संस्कृत व प्राकृत हस्तलिखिते गोळा करण्यासाठी केला.पोथ्या मिळवण्याचे त्यांचे कौशल्य आणि उत्साह यातून प्रेरणा घेऊन मुंबई सरकारने १८६६ मध्येच त्यांना दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून पोथ्या गोळा करण्याकरिता नेमले होते. इ. स. १८६८ मध्ये भारत सरकारने संपूर्ण भारताकरिता अशा स्वरूपाचा प्रकल्प हाती घेतला.अर्थातच मुंबई इलाख्यात ह्या कामाचे नेतृत्व ब्यूह्लरकडे आले.देशातील इतर इलाख्यांपेक्षा मुंबई इलाख्यात हे काम अधिक प्रभावीपणे आणि अधिक काळ चालू होते. ब्यूह्लर भारतात असेपर्यंत म्हणजे इ. स. १८६८ ते १८८० या काळात सरकारसाठी २,३६३ दुर्मिळ पोथ्या मिळवण्यात आल्या.या कामात प्राध्यापक कीलहॉर्न यांचाही सहभाग होता.आता या पोथ्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या संग्रहात आहेत.एकाच ग्रंथाच्या एकाहून अधिक प्रती उपलब्ध होऊ लागल्यावर युरोपातील ग्रंथालये विनंती करतील त्याप्रमाणे सरकारच्या परवानगीने त्या युरोपात पाठविण्यात ब्यूह्लरचा हातभार होता.
ब्यूह्लरने शोधलेल्या अनेक ग्रंथांवर मौलिक संशोधन केले गेले.पंडितांशी संस्कृतमध्ये संवाद साधत,तर सर्वसामान्यांसाठी मराठी,गुजराती,किंवा हिंदी या भाषांचा आधार घेत,त्यांच्या परंपरेशी एकरूप होऊन,त्यांच्या धर्माचा, प्रथांचा,भावनांचा आदर राखत,भारताच्या प्राचीन इतिहासाचा,साहित्याचा मागोवा घेण्यासाठी ब्यूह्लरने या गावातून त्या गावात,प्रसंगी दुर्गम भागातून प्रवास करीत,जिद्दीने,धैर्याने आणि कौशल्याने केलेले काम अतुलनीय असेच म्हणावे लागेल.प्राच्यविद्येच्या दोन शाखा त्यांनी नष्ट होण्यापासून वाचवल्या – (१) काश्मिरी ग्रंथसंपदा ज्यामध्ये वैदिक ग्रंथ, काश्मिरी शैवतंत्राच्या पोथ्या, राजतरङ्गिणी सारखे ऐतिहासिक ग्रंथ,दारा शुकोहने फारसी भाषेत अनुवाद करवून घेतलेले भागवतपुराण यांचा अंतर्भाव होतो. (२) श्वेतांबर जैनांचे संस्कृत आणि प्राकृत ग्रंथ. त्यांच्याच आधारे पुढे वेबर, याकोबी, क्लाट, लॉयमान या संशोधकांनी आपले संशोधनग्रंथ सिद्ध केले.ब्यूह्लरने जमवलेल्या एकूण सुमारे ३००० पोथ्यांमुळे केवळ जैनच नव्हे तर इतर अनेक प्राच्यविद्याशाखांच्या संशोधनाला नवी दिशी मिळाली.काश्मीर,राजपुताना आणि मध्यभारतात १८७५-७६ मध्ये केलेल्या हस्तलिखित सर्वेक्षणाच्या अहवालामुळे त्यापूर्वी अज्ञात असलेल्या अनेक ग्रंथांची आणि ग्रंथकारांची ओळख जगाला झाली. उदाहरणार्थ,काश्मीरचा इतिहास लिहिणाऱ्या क्षेमेन्द्रचे साहित्य ब्यूह्लरच्या प्रयत्नांमुळेच उजेडात आले.
ब्यूह्लरचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे अनेक पुराभिलेखांचे वाचन आणि त्या आधारे प्राचीन इतिहासाविषयीचे लेखन.त्याचे या संदर्भातील १६० हून अधिक शोधनिबंध इंडियन अँटिक्वेरी, एपिग्राफिआ इंडिका सारख्या संशोधनविषयक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले.त्यांपैकी सुमारे ५३ निबंध हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांविषयी होते.भारतीय पुरातत्त्व विभागात नोकरीस असलेला फ्यूहरर नावाचा जर्मन अधिकारी यांच्याकडे शिलालेखांच्या प्रती पाठवित असे.त्यांपैकी काहींचा बनावटपणा ध्यानी न आल्याने असे लेख वाचून त्यांना एकप्रकारे मान्यता देण्याचे अपश्रेय ब्यूह्लरकडे जाते.मात्र फ्यूहररच्या या लबाडीमध्ये ते जाणीवपूर्वक सहभागी होते असे दिसत नाही.मॅक्सम्यूलर यांनी संस्कृत साहित्याच्या अभ्यासाच्या आधारे संस्कृत साहित्याच्या पुनरुज्जीवनाचा सिद्धांत माडला होता. त्याच्या मते संस्कृत साहित्याचा प्रवाह इसवीसनाच्या आधी काही काळ कुंठित झाला आणि इसवीसनाच्या चवथ्या शतकानंतर त्यात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले. पुराभिलेखांतील पुराव्यांच्या आधारे ब्यूह्लरने हा सिद्धांत खोडून काढला आणि संस्कृत साहित्याची निर्मिती कधीही थांबली नव्हती असे दाखवून दिले.
प्राचीन भारतीय लिपींच्या इतिहासासंबंधी त्यांनी On the Origin of the Indian Brāhma Alphabet हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी ब्राह्मी,खरोष्ठी या लिपी आणि ब्राह्मी अंक यांचा उदय व विकास याविषयी मूलभूत असे सिद्धांत मांडले आहेत.भारतीय पुरालिपिशास्त्राविषयीचा सर्वंकष अभ्यास मांडणारा त्यांचा ग्रंथ म्हणजे Indian Palaeography.ब्यूह्लरने जैन धर्माची स्वतंत्र ओळख पटवून देण्यापूर्वी जैनधर्म ही बौद्धधर्माची केवळ एक शाखा मानली जात होती.जैन धर्म हा बौद्धधर्माहून स्वतंत्र असा धर्म होता हे प्रतिपादन जैन धर्माच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले.प्रसिद्ध वैयाकरणी आणि कोशकार जैनमुनि हेमचन्द्रांचे चरित्रही त्यांनी लिहिले.प्राचीन भारताचा सविस्तर इतिहास लिहावा अशी त्यांची योजना होती पण अकाली ओढवलेल्या मृत्युमुळे ते काम त्यांच्या हातून होऊ शकले नाही.
इ.स. १८६७ मध्ये ब्यूह्लरने The Digest of Hindu Law हे पुस्तक लिहिले.त्यात त्यांनी संस्कृत धर्मशास्त्रीय ग्रंथांचा आढावा घेतला.अशा स्वरूपाचा तो पहिलाच प्रयत्न होता.त्यांनी आपस्तम्बधर्मसूत्राची चिकित्सित आवृत्ती काढली.आपस्तम्ब,गौतम,वसिष्ठ आणि बौधायन या धर्मसूत्रांचे तसेच मनुस्मृतीचे त्यांनी केलेले भाषांतर मॅक्सम्यूलरच्या Sacred Books of the East या मालिकेत प्रसिद्ध झाले.मनुस्मृतीचे इतर धर्मशास्त्रीय ग्रंथांबरोबरचे संबंध स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
महाभारतासाठीदेखील केवळ अंतर्गत पुराव्यांचाच आधार न घेता पुराभिलेखांचा आणि अन्य संस्कृतग्रंथांचा आधार ब्यूह्लरने घेतला.त्यांचे हे संशोधन Contributions to the History of the Mahabharata या लेखाद्वारे प्रसिद्ध झाले.त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना याविषयात आणखी संशोधनासाठी प्रोत्साहन दिले. त्यांपैकी मोरित्स विंटरनिट्त्स यांनी पुढे उल्लेखनीय कामगिरी केली.त्याकाळी पाश्चात्य विद्वानांना अपरिचित असलेले भारतीय पुराभिलेखतज्ज्ञ पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी गुजराती भाषेत लिहिलेल्या लेखांचे ब्यूह्लरने इंग्रजीत भाषांतर केले.भारताविषयी युरोपात लिहिले जाणारे साहित्य भारतीयांपर्यंत पोचले पाहिजे याकरिता असे साहित्य इतर युरोपीय भाषांऐवजी इंग्रजीतूनच प्रसिद्ध व्हावे असा त्यांचा आग्रह असे.ते स्वतः बऱ्याचदा जर्मनऐवजी इंग्रजीतूनच लिहित असत.भारतातील हवामानाचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे इ.स.१८८० मध्ये त्यांना युरोपात परत जावे लागले.ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील विद्यापीठात संस्कृत आणि भारतीयविद्या अध्यासनावर प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जर्मन विद्यार्थ्यांसाठी संस्कृतचे पाठ्यपुस्तक त्यांनी लिहिले. दोनच वर्षांत अमेरिकेत त्याचे इंग्रजी भाषांतर करण्यात आले.व्हिएन्ना विद्यापीठात ब्यूह्लरने एका प्राच्यविद्या संस्थेची स्थापना केली. Vienna Oriental Journal नावाचे एक नियतकालिकदेखील सुरू करण्यात आले.ब्यूह्लरच्या पुढाकाराने प्राच्यविदांच्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये भारतातील पुरातत्त्व आणि पुराभिलेखांच्या संशोधनासंबंधी भारत सरकारला विनंती करणारे ठराव वेळोवेळी संमत केले गेले.
आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या Encyclopedia of Indo-Aryan Research (आर्य-भारतीय संशोधनाचा ज्ञानकोश) या प्रकल्पाच्या कामात ते मग्न होते.जगभरातल्या विविध देशांतील संशोधकांचा सहभाग असलेला,भारतविद्येच्या सर्व अंगांना कवेत घेणारा असा प्रकल्प प्राच्यविद्येच्या क्षेत्रात त्यापूर्वी झाला नव्हता आणि त्यानंतर कधी झाला नाही.ब्यूह्लरने यातील तब्बल २८ ग्रंथांचे संपादन केले.तलावात एकटेच नौकाविहार करत असताना दुर्दैवाने ते बुडून मरण पावले.ना त्यांचा मृतदेह मिळाला ना मृत्यूचे नेमके कारण कळू शकले. प्राचीन भारताच्या गूढ अज्ञाताचा मागोवा घेणाऱ्या या संशोधकाच्या मृत्यूचे कारण अज्ञात आणि गूढच राहिले.
संदर्भ :
- Stache-Rosen Valentina, German Indologists, New Delhi, 1981.
- Winternitz, M. Georg ,Bühler In Memoriam, Indian Antiquary 27 (1898), 337-349.
समीक्षक – ग. उ. थिटे