वैदयकीय परीक्षणाचा एक प्रकार. जिवंत किंवा मृत शरीरातून घेतलेल्या ऊतीचे सूक्ष्मदर्शीच्या मदतीने रोगनिदानासाठी केलेल्या परीक्षणाला जीवोतक परीक्षा म्हणतात. वेगवेगळ्या रोगांमुळे शरीरात जे बदल होतात, त्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते. उदा., अर्बुदांच्या (कर्करोगाच्या) निदानासाठी ही परीक्षा अपरिहार्य असते. त्यासाठी रुग्णाच्या अर्बुदापासून ऊतीचा एक लहान तुकडा काढला जातो. हा तुकडा गोठवितात आणि त्याचे अत्यंत पातळ छेद करतात. जेव्हा हा छेद सूक्ष्मदर्शीखाली पाहतात तेव्हा अर्बुद सौम्य आहे की मारक आहे, हे समजते. शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्बुदासंबंधी योग्य माहिती असणे डॉक्टरांसाठी आवश्यक असते. मुखगुहा, स्तने, गर्भाशय, योनिमुख, यकृत, मूत्राशय इ. इंद्रियांचे कर्करोग आणि अस्थिकाठिण्य, अस्थिसुषिरता, स्नायू अपपोषण, गजकर्ण आणि खरूज असे त्वचेचे रोग अशा वेगवेगळ्या रोगांच्या निदानासाठी जीवोतक परीक्षा करतात. गर्भजल चिकित्सा ही सुद्धा जीवोतक परीक्षा आहे.

काही विशिष्ट रोगांचे निदान करण्यासाठी जीवोतक परीक्षण उपयुक्त ठरते. या रोगांमध्ये शरीराच्या ठराविक विशिष्ट भागात पेशींचे विशिष्ट प्रकार दिसून येतात. उदा., काही रोगांमध्ये लसीका ग्रंथीतील पेशींच्या दृश्य स्वरूपात बदल दिसून येतात. लसीका ग्रंथीचे परीक्षण सहज करता येते, कारण त्यापैकी काही ग्रंथी बाह्यत्वचेखाली व त्वचेला लागून असतात. या स्तरातील ऊतींच्या पेशी तपासणीसाठी खरवडून मिळविता येतात किंवा शरीरभाग धुऊन घेऊन घेतलेल्या द्रवात मिळतात. यकृत किंवा वृक्क ही इंद्रिये शरीरात खोलवर असतात. अशा इंद्रियांच्या ऊती मिळविण्यासाठी पोकळ सुयांचा (सिल्व्हरमॅन सूचिका) वापर करतात. अस्थिमज्जेतील पेशी (हाडांच्या मध्यभागी असलेला मऊ व स्पंजासारखा पदार्थ) सूचिकेमधून चोषणादवारे मिळवितात. अस्थिमज्जेतील पेशींची संख्या प्रमाणाबाहेर वाढलेली दिसून आल्यास रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान होते. वृक्क विकार व यकृत विकार, त्वचा रोग आणि लसीका संस्थेचे विकार यांच्या तपासणीसाठी जीवोतक परीक्षा मोलाची असते.

जीवोतक परीक्षा केवळ रोगनिदानासाठी उपयुक्त ठरते, असे नाही. योग्य उपचार करण्यासाठीही जीवोतक परीक्षा उपयुक्त ठरते. उदा., स्तनांतील मारक अर्बुदावर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाल्यावर शस्त्रक्रियेचे विस्तार क्षेत्र ठरविणे, क्ष-किरण उपचार चालू असताना रोगाची प्रगती व उपचारांचा प्रभाव पाहणे यांसाठी जीवोतक परीक्षेचा वापर करतात.