धामणी हा माल्व्हेसी कुलातील एक वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव ग्रेविया टिलीफोलिया आहे. ताग, कापूस व कोको या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. या मोठ्या आकारमानाच्या वृक्षाचा प्रसार भारत, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांत झाला आहे. भारतात हा पानझडी आणि निमसदाहरित वनांमध्ये दिसून येतो.

धामणी (ग्रेविया टिलीफोलिया): पानाफुलांसह फांदी

धामणी वृक्ष साधारणपणे १०–२० मी. उंच वाढतो. खोड उंच व सरळ असून साल फिकट तपकिरी रंगाची असते. कोवळ्या फांद्या व पाने तसेच कळ्यांवरही दाट लव असते. साध्या भिंगातून पाहिल्यास पानांवर तारकाकृती केस दिसतात. पाने साधी, मोठी व एकाआड एक असतात. मार्चमध्ये प्रारंभी पाने गळतात आणि एप्रिल महिन्यात नवीन पालवी येते.

मे ते सप्टेंबर महिन्यांच्या कालावधीत या वृक्षाला बहर येतो. फुले लहान, १–२ सेंमी., पिवळीधमक किंवा नारिंगी रंगाची असतात. ती पानांच्या बगलेत दोन ते चार फुलांच्या गुच्छात येतात. फळे हिरवी व आकाराने वाटाण्याएवढी असून पिकल्यावर निळसर काळी दिसतात. ती आंबटगोड असून खाद्य आहेत.

धामणी वृक्षाचे लाकूड कठीण व टिकाऊ असते. या लाकडाला पॉलिश चांगले होते. याच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे, दारे, खिडक्यांच्या चौकटी, हत्यारांचे दांडे, बैलगाड्या, होड्या तयार करण्यासाठी होतो. खोडाच्या आंतर्सालीपासून धागा मिळतो. त्यापासून दोर तयार करतात. कोवळ्या पान-फांद्यांचा उपयोग गुरांना चारा म्हणून करतात. लाकडाचा कोळसाही तयार करतात.