मल्लिनाथ : (सु. १४-१५ वे शतक) प्रख्यात संस्कृत टीकाकार. पेड्डभट्ट या नावानेही ते तेलंगणात ओळखले जात. तेलंगण राज्यातील मेडक जिल्ह्याच्या कोलाचलम् गावाचे ते निवासी होत. म्हणून ते कोलाचल मल्लीनाथ या नावानेही परिचित होते. त्यांच्या पित्याचे नाव कपर्दी. काही विद्वानांच्या मते पेड्डभट्ट हा मल्लिनाथांचा जेष्ठ पुत्र होय. त्यांचा कनिष्ठ पुत्र महोपाध्याय कुमारस्वामी याने ‘प्रतापरुद्र-यशोभूषण’ ह्या काव्यशास्त्रपर ग्रंथावर लिहिलेल्या ‘रत्नप्रभा’ टीकेच्या शेवटी ‘पेड्डभट्ट’ याच्या विद्वत्तेची फार प्रशंसा केली आहे.

मल्लिनाथ हा काव्य, अलंकार, व्याकरण, ज्योतिष, स्मृती व षड्दर्शन यात ते पारंगत असून त्यांना महामहोपाध्याय आणि व्याख्यान चक्रवर्ती या उपाधी दिल्या  होत्या. ‘नामूलं लिख्यते किञ्चित्’ नानपेक्षित मूच्यते  निराधार किंवा अनावश्यक  आधाराशिवाय लिहिणार नाही. अशा प्रतिज्ञेने मल्लिनाथाने आपल्या टीका लिहिल्या आहेत. त्याने रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव (पहिले आठ सर्ग), शिशुपालवध, किरातार्जुनीय, नैषधीयचरित, अमरकोश इत्यादी ग्रंथांवर टीका लिहिल्या. व्याकरण, व्युत्पत्ती आणि अर्थविवेचन यादृष्टीने त्याच्या टीका प्रशंसनीय असून प्रमाणभूत मानल्या जातात. चतुरस्त्र अध्ययनाबरोबर काव्यज्ञाची रसिकताही त्याच्यापाशी होती. रघुवंशावरील संजीवनीसमाख्या नामक  टीकेत त्यांनी शंभरहून  अधिक ग्रंथ आणि ग्रंथकारांचा उल्लेख करून त्यातील अवतरणे दिली आहेत. त्यांत अमर-वैजयंती यांसारखे कोश, अलंकारशास्त्र, दंडनीती, राजनीती, कायदा, संगीतशास्त्र, कामशास्त्र, पुराणे, दर्शने इ. विविध विषयांवरील ग्रंथांचा उल्लेख आहे. प्रत्येक टीकेत त्याचे सर्वंकष पांडित्य दिसते.

उस्मानिया विश्वविद्यालय (हैद्राबाद) येथे मल्लिनाथाची साहित्यसंपदा या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते (१९७९).  त्यातील शोधनिबंधाचे ग्रंथ रूपात मष्टिनाथ-मनीषा या शीर्षकार्थाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. २२ विद्वानांनी शोधनिबंध सादर केले.त्या शोध-निबंधांचा संग्रह विश्वविद्यालयाचे तत्कालीन संस्कृत विभाध्यक्ष डॉ. प्र. ग. लाळे यांनी ग्रंथ स्वरुपात ‘मल्लिनाथ-मनीषा’ या नावाने प्रसिद्ध केला. त्यातील ९ निबंध संस्कृत भाषेत असून इतर तेलुगू आणि इंग्रजी भाषेत आहेत . मल्लिनाथाचा ‘वैश्यवंशसुधारक’ नावाचा तेलुगू  भाषेतील एक ग्रंथ अलीकडे उपलब्ध झाला आहे.

मल्लिनाथ हा टीकाकार म्हणून इतका प्रसिद्ध होता की ‘मल्लिनाथी’ हा शब्द टीका याअर्थी मराठीत रूढ झाला आहे.

संदर्भ :

  • वर्णेकर, श्रीधर भास्कर, संस्कृतवाङ्मय कोश,खंड २,  कलकत्ता,  १९८८.
  • चित्राव,  सिद्धेश्वरशास्त्री, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश, खंड २,  पुणे, १९६८.

 

This Post Has 2 Comments

  1. चंद्रकला जोशी

    मल्लिनाथान विषयी अतिशय उपयुक्तती माहिती उपलब्ध करून दिलेली आहे .अनिता जोशी यांनी. रसिक वाचकांना याविषयी अतिशय अल्प असे ज्ञान होतं.तसेच त्यांच्या साहित्य संपत्ती बद्दल सुद्धा काहीही माहिती रसिक वाचकांना जवळ नव्हती ..अतिशय मोलाचे कार्य अनिता जोशी यांनी केले आहे. मनपूर्वक त्यांचे आभार!!

  2. सौ नीलम नंदन देशपांडे

    खूप चांगली माहिती मिळाली!! धन्यवाद अनिता जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा