द्विवेदी, रेवा प्रसाद : (जन्म – २२ ऑगस्ट १९३५). भारतातील संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक.संस्कृत कवी,नाटककार,कथाकार,समीक्षक आणि संशोधक म्हणून ख्यातीप्रिय. कालिदासाच्या साहित्याचे संपादन आणि संस्कृतमधील काव्यशास्त्रविषयक कार्यासाठी त्यांना वयाच्या पन्नाशीतच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “सनातनकवी” या नामाभिधानाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील शिहोर जिल्ह्यातील नादमेर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नर्मदा प्रसाद द्विवेदी आणि आईचे नाव लक्ष्मीदेवी होते.कुटुंबात संस्कृत अध्ययनाची समृद्ध परंपरा होती.वडिलांनी  त्यांना लहानपणी संस्कृत भाषा आणि साहित्याचे धडे दिले.मूळगावी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी वाराणसीला गेले. तेथे त्यांनी पारंपारिक आणि आधुनिक या दोन्ही शिक्षणपद्धतीत  संस्कृत भाषा आणि साहित्याचा अभ्यास केला.त्यांनी संस्कृत साहित्यामधून शास्त्री (१९५३),आचार्य (१९५६)आणि पदव्युत्तर पदवी (१९५९) ह्या पदव्या बनारस हिंदू विश्वविद्यालयातून प्राप्त केल्या. पुढे रायपूरच्या रविशंकर विद्यापीठातून त्यांनी संस्कृत साहित्यात पीएच.डी.पदवी प्राप्त केली (१९६५).

रेवाप्रसाद द्विवेदी मा.राष्ट्रपती यांचेकडून कबीर सन्मान स्वीकारताना.

मध्य प्रदेशात संस्कृत भाषा आणि साहित्य यामध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी आपल्या विद्याशाखीय सेवेचा प्रारंभ केला (१९५९-१९७६).त्यानंतर संस्कृतविद्या धर्मविज्ञान संकाय या बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या विभागात त्यांनी संस्कृत प्रपाठक म्हणून कार्य केले आहे (१९७७-१९९५). विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये त्यांनी अनेक प्रतिष्ठेच्या शैक्षणिक पदांवर काम केले आहे.संस्कृत अधिष्ठाता (डीन) व संस्कृत अभ्यासमंडळ तज्ञ म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. केंद्रीय संस्कृत बोर्ड, राष्ट्रीय संस्कृत संस्था, नवी दिल्ली, कालिदास समिती, मध्य प्रदेश आणि संस्कृत परिषद, उत्तर प्रदेश या संस्थांमध्येही यशस्वीपणे कार्य केले आहे. ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे सन्मान्य गुणश्री प्राध्यापक आणि येथीलच संस्कृत काव्याचे अध्ययन आणि संशोधन करणाऱ्या कालिदास संस्थान या संस्थेचे संस्थापक आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचेही ते सन्मान्य सदस्य होते (१९९०-१९९२).

संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे.त्यांच्या एकूण साहित्यामध्ये उत्तरसीताचरितम् (१९६८),स्वातंत्र्यसंभवम् (१९९०),कुमारविजयमहाकाव्यंम् (२००५) ही खंडकाव्ये; सत्पत्रम् (१९८७),प्रमाथह् (१९८८),श्रीरेवाभद्रपीठंम् (१९८८),संस्कृतहिरकम् (१९८९),इत्यादी काव्यसंग्रह; युथिका (१९७६) सप्तर्षीकांग्रेसम् (२०००) ही नाटके; काव्यालंकारकारिका (१९७७),नाट्यसासनम् (१९९६),साहित्यशारीरकम् (१९९८) संस्कृत काव्याशास्त्रका आलोचनात्मक इतिहास (हिंदी,२००७) हे समीक्षापर ग्रंथ आणि रघुवंशदर्पण (१९७३),कालिदास ग्रंथावली (१९७६ -१९८७) ही आणि संस्कृत नाटककारांवरील इतर संपादने यांचा समावेश होतो.

उत्तरसीताचरितम् हे काव्य रामायण या महाकाव्यावर आधारित असून त्यात सीतेच्या उत्तरायुष्याचा वेध घेतला आहे.असे असले तरीही या काव्यसंग्रहात समकालीन भारतीय राजकीय स्थितीगतीचे प्रतिबिंब उमटले आहे. स्वातंत्र्यसंभवम् या काव्यसंग्रहात भारतीय स्वातंत्र लढ्याचे वर्णन असून त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई ते इंदिरा गांधी इतका विस्तीर्ण पट मांडला आहे.समीक्षणात्मक कार्याद्वारा त्यांनी संस्कृत साहित्याशास्त्रात काही नव्या सिद्धांताची भर घातली आहे.अलंकार हा कवितेचा आत्मा आहे,ध्वनीला ऐतिहासिक आणि तर्कशास्त्रीय असा कुठलाही पाया नाही,संस्कृत काव्यशास्त्राचे नव्याने निर्धारण करावे आणि भाषा आणि साहित्य या दोन भिन्न संकल्पना आहेत अशा काही तत्त्वांचा त्यात समावेश आहे.त्यांच्या एकूण संस्कृत साहित्यसेवेत कालिदास ग्रंथावली या संपादनकार्याला अजोड महत्त्व आहे.या ग्रंथाद्वारा त्यांनी भारतीय आणि वैश्विक पातळीवर कालीदासासंदर्भात केलेल्या संशोधनाचा परामर्श घेवून कालिदासाचे समग्र साहित्य वाचकांसमोर आणले आहे.

ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत.भारताच्या राष्ट्रपतींकडून सन्मानपत्र (१९७८), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१), कल्पवल्ली पुरस्कार,भारतीय भाषा परिषद, कलकत्ता (१९९३) वाचस्पती पुरस्कार,के.के.बिर्ला फाउंडेशन,नवी दिल्ली (१९९७) श्रीवेणी पुरस्कार ,आरजे दालमिया श्रीवेणी ट्रस्ट, नवी दिल्ली (१९९९) व्यास पुरस्कार, संस्कृत अकादमी, भोपाळ, विशिष्ट (२००२),वाल्मिकी (२००४),व्यासभारती (२००५) हे संस्कृत संस्थान,उत्तरप्रदेशचे तीन पुरस्कार,नानासाहेब पेशवा धार्मिक आणि आध्यत्मिक पुरस्कार,देवेन्द्रेश्वर संस्थान,पुणे (२०१०),राष्ट्रीय संस्कृत वेदव्यास पुरस्कार,विद्यापीठ अनुदान आयोग,नवी दिल्ली (२०१०)कबीर सन्मान, मध्यप्रदेश शासन (२०१३) इत्यादी पुरस्कार त्यांना लाभले आहेत. याशिवाय महामहोध्यापक,महामहोपाध्याय,अभिनव कालिदास आणि कालिदास रत्नसदस्य  या उपाधी देवूनही त्यांना गौरान्वित करण्यात आले आहे. १९८१ मधील बनारस विद्यापीठात आयोजित केलेल्या पाचव्या जागतिक संस्कृत परिषदेचे ते संयोजक होते.वयाच्या ऐंशी वर्षांनंतरही त्यांचे संस्कृत भाषेसंदर्भातील मार्गदर्शन आणि संशोधन सुरु आहे.

संदर्भ :

प्रतिक्रिया व्यक्त करा