राम पाणिवाद : (१७०७-१७७५). संस्कृत व प्राकृत या भाषांमध्ये काव्य-नाटक रचियता केरळमधील प्रसिद्ध साहित्यिक. त्यांचा जन्म केरळमधील मलबार जिल्ह्यातील किल्लिक्कुरीच्ची (संस्कृत-मंगलग्राम) येथे झाला. त्यांचे वडील नंबूतिरी (ब्राह्मण) होते व किल्लिक्कुरीच्ची येथील शैव मंदिरात पुजारी होते असे मानले जाते. राम पाणिवाद यांनी प्रथम त्यांच्या वडिलांकडे व नंतर थिकाऱीमोण इल्लम येथील नारायणभट्टनामक विद्वानांकडे शिक्षण घेतले. नारायणभट्ट यांच्या शिकवण्यामुळे रामपाणिवाद यांच्या प्रगल्भ आणि व्यापक ज्ञानाची पायाभरणी झाली. स्वतःच्या ग्रंथांमध्ये रामपाणिवाद यांनी नारायणभट्ट यांना आदराने संबोधिले आहे.

राम पाणिवाद यांनी साहित्यदृष्ट्या आपली कारकीर्द घडविण्यासाठी घर सोडले.अनेक राजांच्या आश्रयाखाली ते राहिले. उत्तर मलबारमधील कोलतीरी राजाकडे ते गेले; पण हा राजा त्यावेळी युद्धामध्ये गुंतला होता, त्यामुळे त्यांना राजाश्रय प्राप्त झाला नाही.त्यानंतर ते काही काळ वेट्टतुनाडु येथील राजा वीरराय महाराज यांच्या आश्रयाने राहिले. राजाच्या विनंतीनुसार शिवरात्रीला तेथील शैवमंदिरात सादर करण्यासाठी चंद्रिका (वीथी) या नाटकाची रचना त्यांनी केली.त्यानंतर काही काळ ते कोचीन प्रांतातील मुकुंदपुरम् तालुक्यातील मुरियनट्टु नंबियार या स्थानिक सरदाराच्या आश्रयाने राहिले.तेथील वास्तव्यात त्यांनी  मुकुंदशतकम् आणि शिवशतकम्  ही दोन स्तोत्रे रचली.

राम पाणिवाद यांनी आपल्या साहित्यामध्ये मनकोट्टु अचन या आश्रयदात्याचा उल्लेख केला आहे. १७३५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर पलियातु अचन यांच्या आश्रयाने ते चेन्नमंगलम् या गावी काही काळ राहिले. या काळात राम पाणिवाद यांना अचन यांचे उत्तम पाठबळ मिळाले. येथेच त्यांनी विष्णुविलासम् या ग्रंथाची रचना केली. पुढे याच ग्रंथाचे विष्णुगीता या नावाने मलयाळम् भाषेत भाषांतर केले असावे.

थेक्केटथु भट्टगिरी यांच्या माध्यमाने रामपाणिवाद यांचा चेंपकश्शेरी येथील उदारमतवादी नंबुद्रिराजाशी परिचय झाला. अनेक कवी-साहित्यिकांना या राजाने आश्रय दिला होता.त्यानंतर राम पाणिवाद यांनी काही वर्षे राजा देवनारायण याच्या आश्रयाने व्यतीत केली. या राजाच्या आज्ञेवरून त्यांनी लीलावती (वीथी) व राघवीयम् (२० सर्ग, १,५७६ श्लोक) या महाकाव्याची स्वोपज्ञ (उदाहरणासह) टीकेसह रचना केली. त्यांच्या अनेक साहित्यकृतींपैकी राघवीयम् हा एक प्रमुख काव्यग्रंथ होय.रामपाणिवाद यांच्या साहित्यसंपदेमध्ये पंचपदी, मदनकेतुचरितम् साहित्य कृतींचाही समावेश होतो.

राम पाणिवाद यांनी संस्कृत, मलयाळम् या भाषांसोबत प्राकृत भाषेचे सुद्धा अध्ययन केले होते. या तीनही भाषांमधून त्यांनी रचना केल्या. संस्कृत नाटकांमध्ये नाटकातील पात्रे संस्कृत आणि प्राकृत भाषा बोलत असत. त्यामुळे केरळमध्ये प्राकृत भाषेचा अभ्यास सुरू राहिला. केरळमधील अनेक कवींनी प्राकृत भाषेत रचना केलेली दिसून येते. राम पाणिवाद यांनी त्यांच्या नाटकांमध्ये प्राकृत भाषेचा समावेश तर केलाच पण त्यासोबतच कंसवहो उसाणिरुद्ध (खंडकाव्य ४ सर्ग) आणि वररुचीच्या प्राकृतप्रकाश  या व्याकरणावरील ग्रंथावर प्राकृतवृत्ति: ही टीका अशा प्राकृत ग्रंथांची रचनाही  केली.

राम पाणिवाद यांनी अनेक राजांचा आश्रय घेतच आपली साहित्यसंपदा वाढवली. त्रावणकोरमधील बहुतांश मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या.चेंपकश्शेरी येथे ते स्थायिक झाले. राम पाणिवाद अविवाहित राहिले असावेत असे त्यांच्या चरित्रावरून दिसते.

प्रख्यात मलयाळम कवी कुंचन नंप्यार हेच राम पाणिवाद असावेत, असे काही अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे. शिवपुराणम्, विष्णुगीता, श्रीकृष्णचरितम्,पंचतंत्र,रुकमांगदचरित ह्या मलयाळम् ग्रंथांच्या पुष्पिकांत कधी राम पाणिवादाचा, तर कधी कुंचन नंप्यार यांचा ग्रंथकार म्हणून उल्लेख आढळतो.

संदर्भ :

  • उपाध्ये, ए. एन्.,संपा.,कंसवहो, हिंदी ग्रंथ रत्नाकर कार्यालय, हीराबाग, मुंबई.

समीक्षक – कमलकुमार जैन