भाषाध्यापनाचेच उद्दिष्ट ठेवून प्रचलित भाषेचे विशिष्ट क्रमानुसार रचलेले व्याकरण. मराठीच्या व्याकरणांच्या इतिहासात एकूण पाच प्रवाह दिसून येतात. ऐतिहासिक व्याकरण, पारंपरिक व्याकरण, संरचनाप्रधान,वर्णनात्मक व्याकरण, जनकसूत्री रचनान्तरीय व्याकरण आणि शैक्षणिक व्याकरण हे ते प्रवाह होत. शैक्षणिक व्याकरण हे त्यातील महत्वाचे व्याकरण आहे. या व्याकरणाच्या प्रवाहाला जवळजवळ पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी लिहिलेल्या मराठीच्या व्याकरणापासून सुरु झाली.तिचा प्रवर्तक जेम्स स्टीव्हन्सन हा ख्रिस्ती धर्मोपदेशक.त्याने आपले द प्रिन्सिपल्स ऑफ मराठी ग्रामर हे व्याकरणावरील पुस्तक प्रसिद्ध केले (१८३३). तत्पूर्वी त्याने त्या काळी उपलब्ध असलेल्या इंग्रजी भाषेतून लिहिलेल्या रे.केरी, मकाबा; क्रमवंत-घगवे-फडके या पंडितांनी रचलेले व्याकरण इ. व्याकरणांचा अभ्यास केलेला होता.पण भाषाध्यापनासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही, हे पाहून स्टीव्हन्सन याने वरील व्याकरण लिहिले. ते करताना मराठी अध्यापनात उपयुक्त ठरणाऱ्या अनेक नव्या गोष्टी आपल्या व्याकरणात आणल्या. मराठीतील नामांची अंत्य वर्णानुसार आणि लिंगानुसार मांडणी करून त्यांचा एकवचनापासून अनेकवचने बनवताना,त्यांच्या सरळरूपांपासून सामान्यरूपे बनवताना कसा उपयोग होतो, हे प्रथम निदर्शनास आणले.त्याची ही मांडणी पुढील व्याकरणकारांनी उचलली, तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली. गंगाधरशास्त्री फडके यांनी शास्त्री मंडळींच्या सहकार्याने एक व्याकरण रचले (१८३६).त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनीही विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी बालव्याकरण म्हणून संवादरूप व्याकरण छापले होते. पुढे गंगाधरशास्त्री टिळक यांनी एक शालोपयोगी लघुव्याकरण तयार केले. ही दोन्ही पुस्तके १८५० च्या दशकातील होत. विद्यार्थ्यांचा व्याकरण मित्र म्हणजे व्याकरणविषयी निवडक सूचना (१८८३) या शिर्षकार्थाचे एक लहानसे पण मनोरंजक चोपडे आहे.व्याकरणविषयी स्वतंत्रपणे विचार करण्याची विद्यार्थ्यास सवय लागेल, अशाप्रकारे थोडक्यात व्याकरणातील निरनिराळ्या अंगांचा त्यात विचार केला आहे. त्यानंतरच्या सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांच्या काळात ई बर्जिस एडवर्ड, फेअरबँक, साउथवर्थ-कवडी, कालेलकर-विजया चिटणीस, सुहासिनी लट्टू, आशा मुंडले, रमेश धोंगडे, कल्याण काळे-अंजली सोमण, मक्झीम बर्न्त्सन-जाई निंबाळकर, नीती बडवे, माधुरी पुरंदरे, सुहास लिमये-जयवंत चुनेकर, सुमन बेलवलकर, इ.नी द्वितीय भाषा म्हणून मराठी शिकवण्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक व्याकरणे रचली. अशी ही परंपरा बरीच मोठी आहे.

सैद्धान्तिक व्याकरणापेक्षा शैक्षणिक व्याकरणांची परंपरा अर्थातच वेगळी आहे. केवळ भाषा शिक्षणावरच भर देऊन इतर तपशील त्यात टाळलेला असतो. भाषाध्ययनासाठी आवश्यक ते घटक निश्चित करून त्यांची एक सोयीस्कर शिक्षणोपयोगी मांडणी त्यात केलेली असते.अनेक वेळा पारंपरिक व्याकरणातील माहितीपेक्षा वेगळी माहिती त्यात दिलेली असते. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास पारंपरिक व्याकरणांनी बरीच वर्षे घोळत ठेवलेला विभक्तिविचार या व्याकरणात आढळत नाही. या व्याकरणात नामाची दोन रूपे मानतात. सरळ रूप आणि सामान्य रूप. नामाला कोणताही प्रत्यय अथवा शब्दयोगी अव्यय जोडायचा झाल्यास तो सामान्य रूपाला जोडायचा असा साधा प्रकार आहे. यात नामाची लिंगव्यवस्था यादृच्छिक आहे. म्हणजे लिंग ओळखण्यास दुसरा मार्ग नाही. या व्याकरणात मराठी भाषक कोणते दर्शक विशेषण वापरतो ते लक्षात घेऊन शब्दाची लिंगनिश्चिती करता येते, असा सोपा मार्ग सांगितलेला आहे. नामांची अनेकवचनी रूपे नामाच्या अंत्य वर्णावरून आणि लिंगावरून करता येतात. तसेच नामाची सामान्य रूपेही नामाचे लिंग आणि अंत्य वर्ण यावरून सांगता येतात.बदलणारी आणि न बदलणारी असे विशेषणांचे दोन प्रकार असून बदलणाऱ्या विशेषणांचीही सामान्यारुपे होतात आणि एका नामासाठी त्याच्या सामान्यरूपाबरोबर त्या मागच्या सर्व विशेषणांचीही सामान्यरूपे होतात. सर्व साधित विशेषणे बदलणाऱ्या गटातील असतात, इ. माहिती आढळते. नामांप्रमाणे सर्वनामांचीही सामान्यरूपे होतात. पुरुषवाचक सर्वनामांमध्ये मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, आपण ही सर्वनामे हिंदीसदृश असूनसुद्धा त्यांच्या अर्थकक्षा कशा बदलतात, हे आवर्जून सांगावे लागते. क्रियापदांच्या सकर्मक आणि अकर्मक यातला गोंधळ केवळ व्याख्या देऊन कमी होत नाही.त्यासाठी भूतकाळातील रचनांची मदत घेणे योग्य ठरते.त्याच प्रकारे कर्म आणि पूरक यांतील गोंधळ दूर करावा लागतो.भविष्यकाळाच्या ईल ईन इ.प्रत्ययांचा भविष्यकाळ आणि निर्धाराणपूर्वक प्रत्ययाने होणारा भविष्यकाळ यातील फरक उदाहरणांनीच स्पष्ट करावा लागतो. ‘तो चणे खात खात चालला होता’, आणि ‘तो चणे खाताना पडला’ यातील फरक, इ. सूक्ष्म गोष्टींकडेही हे व्याकरण लक्ष देते.अशा अनेक आव्हानकारक पण मनोरंजक गोष्टी या व्याकरणामुळे लक्षात येतात. मातृभाषा भाषकालाही त्या नवीन असतात

संदर्भ :

  • अर्जुनवाडकर, कृ. श्री., मराठी व्याकरणाचा इतिहास, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा