युनायटेड किंग्डम या देशाची मध्यवर्ती बँक. इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम यांनी २७ जुलै १६९४ मध्ये खाजगी भागधारकांच्या साह्याने चार आठवड्यांत भांडवलाची उभारणी करून आणि भागधारकांना ८ टक्के लाभांश देण्याचे निश्चित करून या बँकेची स्थापना केली. सर जॉन हौब्लॉन हे बँक ऑफ इंग्लंडचे पहिले गर्व्हनर होते. इ. स. १६८९ मधील राज्यक्रांतीनंतर राजा तिसरा विल्यम यांना फ्रान्सविरुद्ध लढाई करण्यासाठी पैशांची गरज हेही बँक स्थापनेमागचे एक महत्त्वाचे कारण होते. स्थापने वेळी ही बँक खाजगी भागधारकांच्या मालकीची होती. या बँकेचे इ. स. १९४६ मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ही बँक स्थापनेपासूनच इंग्लंडमधील एक प्रतिष्ठित वित्तीय संस्था म्हणून ओळखली जाते. सरकारने बँकेला सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात नोटा निर्गमित करण्याचा अधिकार दिला आहे. ही बँक जरी सरकारची बँक म्हणून कार्यरत असली, तरी मौद्रिक धोरण निश्चितीत ती स्वायत्त आहे. बँक ऑफ स्वीडननंतर मध्यवर्ती बँक म्हणून स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असून बँक व्यवसायाच्या स्थापनेत या बँकेचा जगात आठवा क्रमांक लागतो.
मौद्रिक व वित्तीय स्थैर्यांद्वारे इंग्लंडमधील लोकांचे महत्तम कल्याण साध्य करणे हे बँकेच्या स्थापनेमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. सुरुवातीला या बँकेमार्फत सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात नोटा निर्गमित केल्या जात होत्या. ती प्रत्येक नोट हाताने लिहिली जात असून तिच्यावर रोखपालाची सही असे. सुरुवातीला सर्वांत कमी किमतीची नोट ही ५० पौंडाची होती, तर त्या काळात इंग्लंडचे वार्षिक सरासरी दरडोई उत्पन्न हे फक्त २० पौंड होते. नंतरच्या काळात अंशत: छापील नोटा चलनात आल्या. इ. स. १७४४ मध्ये पहिली पूर्णत: छापील नोट बाजारात आली. कालांतराने परिस्थिती निहाय व गरजेनुसार या नोटांत बदल होत गेला. त्याकाळी बँक ऑफ इंग्लंडबरोबर इतर काही व्यापारी बँकाही चलनी नोटा निर्गमित करत होत्या; मात्र हळूहळू इतर बँकांकडून नोटा निर्गमनाचे अधिकार काढण्यात येऊन बँक ऑफ इंग्लंडची मक्तेदारी झाली. सद्यस्थितीत इंग्लंडमध्ये ५ पौंडाची पॉलीमर नोट, तसेच ५ पौंड, १० पौंड, २० पौंड व ५० पौंड मूल्यांचे कागदी चलन व्यवहारात आहेत.
बँक ऑफ इंग्लडच्या स्थापने वेळी मुख्य कार्यालय हे लंडनमधील मर्सस हॉल येथे होते. त्यानंतर त्याच वर्षी ते प्रिन्सेस रस्त्यावरील गोसर्स हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. पुन्हा इ. स. १७३४ मध्ये त्याचे स्थलांतर करून लंडनच्या सीटी ऑफ लंडन या प्रभागात थ्रेडनीडल स्ट्रीट येथे स्थापन करण्यात आले. हा संपूर्ण परिसर ‘बँक’ म्हणूनच ओळखला जातो. या ठिकाणी बँक नावाचे एक मोठे ट्युब स्टेशन आहे. बँकेची इमारत एखाद्या गढीसारखी आहे. तिच्या चारही बाजूला ठराविक अंतरावर मोठमोठ्या रुंद खांबाची तटबंदी आहे. बँकेच्या इमारतीला रस्त्यावरून उघडणारी एकही खिडकी नाही. इमारतीच्या चारही बाजूंना किल्ल्याप्रमाणे बुलंद दरवाजे आहेत. त्यामुळे आत काय असेल, याची कसलीही कल्पना बाहेरून येत नाही. आत बँकेचे सात मजली कार्यालय आहे. ही बँक लंडनच्या सीटी ऑफ लंडनमध्ये सीटी या टोपन नावानेही ओळखली जाते. याचे क्षेत्रफळ १.२ चौ. मैल आहे. त्यामुळे याला स्क्वेअर माइल असेही संबोधतात. लंडनच्या आणि पर्यायाने जगाच्या आर्थिक उलाढालीचे हे केंद्र आहे. सर्व प्रमुख बँकांची कार्यालये, विमा कंपन्यांची मुख्यालये, तसेच विख्यात कंपन्यांची मुख्यालये या परिसरात केंद्रिकृत झाली आहेत. या परिसरात दररोज सुमारे ३ लाखांपेक्षा अधिक लोकांची वर्दळ असते; मात्र शनिवार व रविवार शांतता असते.
मौद्रिक धोरण समितीची कार्ये : मौद्रिक धोरण समिती ही भाववाढ लक्ष्य निश्चितसह व्याजदर निश्चितीचेही कार्य करीत असते. मौद्रिक धोरण समितीतील सदस्यांची वर्षातून एकूण आठ वेळा व्याजदर निश्चितीसाठी बैठक होत असते. व्याजदर निश्चित करण्याच्या बैठकीच्या आठ दिवस अगोदर मौद्रिक धोरण समितीतील सर्व सदस्य बँक ऑफ इंग्लडमधील कर्मचाऱ्यांशी चर्चा करतात. त्याचबरोबर समितीतील सर्व सदस्य अर्थव्यवस्थेतील चालू परिस्थितीविषयी माहिती मिळवत असतात. या सर्व परिस्थितीचा विचार करून मौद्रिक धोरण समिती व्याजदर (बँक दर) निश्चित करते.
मौद्रिक धोरण समिती स्वत: वेगवेगळी प्रकाशने प्रकाशित करते. या प्रकाशनात समितीच्या बैठकीमधील मुख्य मुद्द्यांबरोबर प्रत्येक तिमाहीला भाववाढीचा अहवालही प्रकाशित केला जातो. या भाववाढ अहवालात इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवर व्याजदर निश्चिती धोरणाचा काय परिणाम झाला, तो प्रसिद्ध केला जातो. त्याच बरोबर आगामी कालावधीत भाववाढीचा व उत्पादनवाढीचा दर काय राहील, याचे पुर्वानुमानही प्रकाशित केले जाते.
मौद्रिक धोरण समितीतील सदस्य संसदेमध्ये वेळोवळी आपल्या कार्यवाहीबाबतचे स्पष्टीकरणही करत असतात. त्याच बरोबर हे सदस्य मौद्रिक धोरण समितीच्या वेगवेगळ्या निर्णयाबाबत भाषणे, तसेच प्रसारमाध्यमांना मुलाखतीही देत असतात. ते इंग्लडमधील वेगवेगळ्या व्यक्ती, व्यावसायिक यांच्याशी स्वत: चर्चा करतात. यातून त्यांना लोकांच्या, तसेच व्यावसायिकांच्या अपेक्षा समजतात. अशा प्रकारे ही समिती मुख्यत: अर्थव्यवस्थेतील भाववाढ नियंत्रित करणे आणि देशाची आर्थिक वृद्धी व रोजगार निर्मितीत वाढ घडवून आणणे यांसाठी योग्य प्रकारे व्याजदर निश्चित करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असते.
मौद्रिक धोरण समितीची रचना : या समितीची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली. या समितीत एकूण ९ सदस्य असतात. त्यांमध्ये १ गर्व्हनर, ३ डेप्युटी गर्व्हनर (१. डेप्युटी गर्व्हनर – मौद्रिक धोरण, २. डेप्युटी गर्व्हनर – वित्तीय स्थैर्य आणि ३. डेप्युटी गर्व्हनर – बाजारपेठ व बँकींग), १ प्रमुख अर्थतज्ज्ञ – सदस्य आणि कुलपतींकडून इतर ४ बहिस्थ सदस्यांची नेमणूक केली जाते. मौद्रिक धोरण निश्चित करत असताना बहिस्थ तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ समितीला व्हावा, हा बहिस्थ सदस्य निवडण्यामागचा उद्देश असतो. समितीतील प्रत्येक सदस्य हा अर्थशास्त्र व मौद्रिक धोरण यांतील तज्ज्ञ असतो. या सदस्यांवर कोणाचेही निर्बंध नसतात. समितीतील प्रत्येक सदस्याचा कालावधी संपताच त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नेमणूक केली जाते किंवा अगोदरच्या सदस्यांची पुनरनियुक्ती केली जाते. समितीतील प्रत्येक सदस्याला एकच मत देण्याचा अधिकार असतो. एखाद्या मुद्यावर समान मते पडल्यास गर्व्हनरला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो.
बँकेचे व्यवस्थापन हे संचालक मंडळापर्यंत केले जाते. या संचालक मंडळास ‘कोर्ट ऑफ डायरेक्टर’ म्हणूनही ओळखले जाते. संचालकाची नियुक्ती सरकारद्वारे केली जाते. संचालक मंडळात एकूण १३ सदस्य असतात. यांपैकी १ चेअरमन, १ गर्व्हनर, ३ डेप्युटी गर्व्हनर, १ सचिव आणि इतर ७ बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असतात. गर्व्हरनरपदाचा कालावधी ८ वर्षांचा, डेप्युटी गर्व्हनर पदाचा ५ वर्षांचा आणि इतर ७ सदस्यांचा ४ वर्षांचा असतो. बँक ऑफ इंग्लंडच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकूण १२१ गर्व्हनर नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या अँड्र्यु बेली हे बँक ऑफ इंग्लंडचे १२१ वे गर्व्हनर असून त्यांची १६ मार्च २०२० मध्ये नियुक्त करण्यात आली आहे. तत्पूर्वी बँक ऑफ इंग्लंडच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मार्क कॅर्नी या बिगर ब्रिटिश व्यक्तिची नियुक्ती गर्व्हनर पदासाठी २०१३ मध्ये करण्यात आली होती.
बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर्स आणि त्यांचा कार्यकाळ
बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर्स आणि त्यांचा कार्यकाळ
अ.क्र. | गव्हर्नरचे नाव | कार्यकाळ | अ.क्र. | गव्हर्नरचे नाव | कार्यकाळ |
१ | सर जॉन हौब्लॉन | १६९४ – १९७ | ६२ | जॉर्ज डोरेन | १८१८ – १८२० |
२ | सर विल्यम स्क्रॅवेन | १६९७ – १६९९ | ६३ | सर चार्ल्स पोल | १८२० – १८२२ |
३ | नाथॅन्येल टेन्च | १६९९ – १७०१ | ६४ | जॉन बौडेन | १८२२ – १८२४ |
४ | जॉन वॉर्ड | १७०१ – १७०३ | ६५ | कॉर्नेलिअस ब्यूलर | १८२४ – १८२६ |
५ | अब्राहम हौब्लॉन | १७०३ – १७०५ | ६६ | जॉन बेकर रिचर्ड्स | १८२६ – १८२८ |
६ | सर जेम्स बेटमॅन | १७०५ – १७०७ | ६७ | सॅम्यूएल ड्र्यू | १८२८ – १८३० |
७ | फ्रान्सिस यिलेस | १७०७ – १७०९ | ६८ | जॉन हॉर्स्ली पाल्मर | १८३० – १८३३ |
८ | सर गिलबर्ट हिथकोट | १७०९ – १७११ | ६९ | रिचर्ड मी रेकिज | १८३३ – ३४ |
९ | नाथॅन्येल गौल्ड | १७११ – १७१३ | ७० | जेम्स पॅटीसन | १८३४ – १८३७ |
१० | जॉन रज | १७१३ – १७१५ | ७१ | टीमोथी अब्राहम कर्टीस | १८३७ – १८३९ |
११ | सर पीटर डेल्म | १७१५ – १७१७ | ७२ | सर जॉन रीड | १८३९ – १८४१ |
१२ | सर जेरार्ड कोन्येर्स | १७१७ – १७१९ | ७३ | सर जॉन पेली | १८४१ – ४२ |
१३ | जॉन हँगर | १७१९ – १७२१ | ७४ | विल्यम कॉटन | १८४२ – १८४५ |
१४ | सर थॉमस स्केव्हन | १७२१ – १७२३ | ७५ | जॉन बेंजामिन हीथ | १८४५ – १८४७ |
१५ | सर गिलबर्ट हिथकोट | १७२३ – १७२५ | ७६ | विल्यम रॉबिन्सन | एप्रिल ते ऑगस्ट १८४७ |
१६ | विल्यम थॉम्प्सन | १७२५ – १७२७ | ७७ | जेम्स मॉरिस | १८४७ – १८४९ |
१७ | हम्फ्री मॉरीस | १७२७ – १७२९ | ७८ | हेन्री जेम्स प्रिसकॉट | १८४९ – १८५१ |
१८ | सॅम्यूएल होल्डेन | १७२९ – १७३१ | ७९ | थॉमसन हँकी | १८५१ – १८५३ |
१९ | सर एडव्हर्ड बिल्यामी | १७३१ – १७३३ | ८० | जॉन हब्बर्ड | १८५३ – १८५५ |
२० | होरेटीओ टाऊनशेन्ड | १७३३ – १७३५ | ८१ | थॉमस मॅथिअस विगेलीन | १८५५ – १८५७ |
२१ | ब्रायन बेन्सन | १७३५ – १७३७ | ८२ | शेफिल्ड नीव | १८५७ – १८५९ |
२२ | थॉमस कुक | १७३७ – १७४० | ८३ | बोनामी दोब्री | १८५९ – १८६१ |
२३ | डेलीलर्स कॉर्बोनल | १७४० – ४१ | ८४ | अल्फ्रेड लॅथम | १८६१ – १८६३ |
२४ | स्टॅम्प ब्रूक्सबँक | १७४१ – १७४३ | ८५ | किर्कमन हॉगसन | १८६३ – १८६५ |
२५ | विल्यम फॉकनर | १७४३ – १७४५ | ८६ | हेन्री लान्सलॉट होलॅण्ड | १८६५ – १८६७ |
२६ | चार्ल्स सॅवेज | १७४५ – १७४७ | ८७ | थॉमस न्युमन हंट | १८६७ – १८६९ |
२७ | बेंजामिन लाँगेट | १७४७ – १७४९ | ८८ | रॉबर्ट विग्राम क्रॉफोर्ड | १८६९ – १८७१ |
२८ | विल्यम हंट | १७४९ – १७५२ | ८९ | जॉर्ज लिआल | १८७१ – १८७३ |
२९ | अलेक्झांडर शिफे | १७५२ – १७५४ | ९० | बेंजामिन बक ग्रीने | १८७३ – १८७५ |
३० | चार्ल्स पाल्मर | १७५४ – १७५६ | ९१ | हक्स गिब्स | १८७५ – १८७७ |
३१ | मॅथ्यूज बिचक्रॉफ्ट | १७५६ – १७५८ | ९२ | एडव्हर्ड हाव्ली पाल्मर | १८७७ – १८७९ |
३२ | मेरीक बरेल | १७५८ – १७६० | ९३ | जॉन विल्यम बर्च | १८७९ – १८८१ |
३३ | बार्थॉलोम्यू बर्टन | १७६० – १७६२ | ९४ | हेन्री ग्रेनफेल | १८८१ – १८८३ |
३४ | रॉबर्ट मार्श | १७६२ – १७६४ | ९५ | जॉन साउंडर्स जिलेट | १८८३ – १८८५ |
३५ | जॉन व्हेलॅण्ड | १७६४ – १७६६ | ९६ | जेम्स पॅटीसन करी | १८८५ – १८८७ |
३६ | मॅथ्यू क्लारमाँट | १७६६ – १७६९ | ९७ | मार्क कोलेट | १८८७ – १८८९ |
३७ | विल्यम कूपर | १७६९ – १७७१ | ९८ | विल्यम लायडरडेल | १८८९ – १८९२ |
३८ | एडव्हर्ड पेन | १७७१ – १७७३ | ९९ | डेव्हिड पॉवेल | १८९२ – १८९५ |
३९ | जेम्स स्पेर्लिंग | १७७३ – १७७५ | १०० | अल्बर्ट जॉर्ज सँडमन | १८९५ – १८९७ |
४० | सॅम्यूएल बिचक्रॉफ्ट | १७७५ – १७७७ | १०१ | हग कोलीन स्मिथ | १८९७ – १८९९ |
४१ | पीटर गॉस्सीन | १७७७ – १७७९ | १०२ | सॅम्यूएल स्ट्यूअर्ट ग्लॅडस्टोन | १८९९ – १९०१ |
४२ | डॅनिएल बूथ | १७७९ – १७८१ | १०३ | सर ऑगस्टस प्रिवोस्ट | १९०१ – १९०३ |
४३ | विल्यम इविर | १७८१ – १७८३ | १०४ | सॅम्यूएल मॉर्ली | १९०३ – १९०५ |
४४ | रिचर्ड नीव | १७८३ – १७८५ | १०५ | अलेक्झांडर फॉक्नर वॉलेस | १९०५ – १९०७ |
४५ | जॉर्ज पीटर्स | १७८५ – १७८७ | १०६ | विल्यम मिडलटन कँपबेल | १९०७ – १९०९ |
४६ | एडव्हर्ड डॅरेल | १७८७ – १७८९ | १०७ | रेजिनाल्ड एडन जॉन्सटन | १९०९ – १९११ |
४७ | मार्क व्हेलॅण्ड | १७८९ – १७९१ | १०८ | अल्फ्रेड क्लेटन कोल | १९११ – १९१३ |
४८ | सॅम्यूएल बोसनक्वेट | १७९१ – १७९३ | १०९ | लॉर्ड कन्लिफ | १९१३ – १९१८ |
४९ | गॉडफ्रे थॉर्नटन | १७९३ – १७८५ | ११० | सर ब्रीन कोकेन | १९१८ – १९२० |
५० | डॅनिएल गिल्स | १७९५ -१७९७ | १११ | सर मोन्टेग्यू नॉर्मन | १९२० – १९४४ |
५१ | थॉमस रेकिज | १७९७ – १७९९ | ११२ | लॉर्ड काट्टो | १९४४ – १९४९ |
५२ | सॅम्यूएल थॉर्नटन | १७९९ – १८०१ | ११३ | लॉर्ड कॉबोल्ड | १९४९ – १९६१ |
५३ | जॉब मॅथ्यू रेकिज | १८०१ – ०२ | ११४ | लॉर्ड क्रोमर | १९६१ – १९६६ |
५४ | जोसेफ नट | १८०२ – १८०४ | ११५ | सर लेस्ली ओब्रेन | १९६६ – १९७३ |
५५ | बेंजामिन विन्थ्रॉप | १८०४ – १८०६ | ११६ | गॉर्डन रिचर्डसन | १९७३ – १९८३ |
५६ | बीस्टन लाँग | १८०६ – १८०८ | ११७ | रॉबीन लेघ-पेम्बरटन | १९८३ – १९९३ |
५७ | जॉन व्हीटमोर | १८०८ – १८१० | ११८ | सर एडव्हर्ड जॉर्ज | १९९३ – २००३ |
५८ | जॉन पीअर्स | १८१० – १८१२ | ११९ | सर मेर्वीन किंग | २००३ – २०१३ |
५९ | विल्यम मॅनिंग | १८१२ – १८१४ | १२० | मार्क कॅर्नी | जुलै २०१३ – २०२० |
६० | विल्यम मेलीश | १८१४ – १८१६ | १२१ | अँड्र्यु बेली | १६ जुलै २०२० ते आजतागायत |
६१ | जेरेमिआह हर्मन | १८१६ – १८१८ |
बँक ऑफ इंग्लंड ही सरकारची बँक म्हणून इंग्लंडमधील सरकारला बँकिंग सुविधा पुरविते. कागदी चलन छपाई करणे आणि ते निर्गमित करणे हे कार्य इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंडकडून केले जाते. इंग्लंडमधील इतर बँकांना आर्थिक अडचणीच्या वेळी अंतिम ऋणदाता म्हणून बँक ऑफ इंग्लंडकडून आर्थिक मदतही केली जाते. इंग्लंडची मध्यवर्ती बँक म्हणून विदेशी चलनसाठा व सुवर्णमान यांचे नियमन आणि देशातील बँका व विमा संस्थांचे पर्यवेक्षण करण्याचे कार्यही बँक ऑफ इंग्लंडकडून केले जाते.
संदर्भ :
- कॅन्स्टन, डेविड, अ हिस्टरी ऑफ बँक ऑफ इंग्लंड, २०१७
- बँक ऑफ इंग्लंड ऍक्ट, १९४६, १९९८
- मॅकमिलन समिती अहवाल, १९३१
समीक्षक : ज. फा. पाटील