प्रस्तावना : वायू आणि अवकाश यांतील अतिसूक्ष्म सीमारेषा पाहता हवाई सामर्थ्यांतर्गत अवकाशाचाही समावेश केला जातो. देशाची विमानचालनातील (Aerial Navigation) आणि अंतराळातील रणनीतीतील कार्यक्षमता आणि डावपेच यांचे एकत्रित रसायन म्हणजे हवाई सामर्थ्य, असे म्हणायला हरकत नाही. युद्धामध्ये हवाई दलाच्या मदतीशिवाय थलसेनेच्या आणि नौदलाच्या कारवायांना यश संपादन करणे अवघड असते. त्यामुळे देशाच्या सक्षमतेचा अवकाशीय सामर्थ्य हा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणता येईल. येथे अवकाशीय सामर्थ्याला सुद्धा ‘हवाई सामर्थ्य’ असे ढोबळ स्वरूपात संबोधण्यात आले आहे.

व्याख्या : हवाई माध्यमातून जगासमोर आपली खंबीर भूमिका प्रदर्शित करण्याची देशाची सामर्थ्यशील क्षमता म्हणजे देशाचे हवाई सामर्थ्य, अशी हवाई सामर्थ्याची व्याख्या होऊ शकते. यामध्ये सद्य आणि संभाव्य नागरी आणि लष्करी विमानचलनाचा समावेश होतो. आधुनिक दृष्ट्या पाहता हवाई सामर्थ्याचे अवकाशीय विकासीकरण हे एक प्रकारे अवकाशातून (हवाईमार्गे) सामरिक नीती आणि डावपेच यशस्वी रीत्या अवलंबिण्याच्या क्षमतेचे फळ आहे, असे म्हणता येईल.

देशाच्या हवाई सामर्थ्यामध्ये खालील प्रमुख घटक समाविष्ट असतात :

 • हवाई दल : ज्यामध्ये थलसेना, नौदल, सागरी किंवा इतर काही नेहमीच्या दलातील समाविष्ट हवाई दल यांचाही समावेश होतो.
 • राखीव आणि स्वयंसेवी हवाई दल.
 • नागरिक वाहतूक क्षमता, ज्यात विमानांची देखभाल आणि वैमानिक यांचा समावेश होतो.
 • विमानांचे  उत्पादन  आणि त्या संदर्भातील देखभाल, प्रशिक्षण आणि पुरवठ्याबाबतची मदत.
 • गुप्तचर यंत्रणा, हवाई आणि अवकाशीय हेरगिरी यंत्रणा, दळणवळण (Communication) प्रणाली, संकटांची आगाऊ चेतावणी, शस्त्रवितरण, लक्ष्य-शोध/लक्ष्य-ओळख/लक्ष्य-वाटप आणि नियंत्रण-मार्गदर्शन प्रणाली यांसारख्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून घेण्याची क्षमता.
 • विमाने आणि त्या अनुषंगाने लागणारी पूरक व्यवस्था यांसाठी सुरक्षित विमानतळाची उपलब्धता.
 • लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (Missile) उपलब्धता आणि नियंत्रण प्रणाली क्षमता.
 • शत्रूच्या हवाई हल्याचा बिमोड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांचा आणि नियंत्रण यंत्रणांचा समावेशसुद्धा यात होतो.

अर्थात, वरील घटकांची एकूण सक्षमता ही राष्ट्रीय धोरण, राजकीय इच्छाशक्ती आणि संपूर्ण राष्ट्राची युद्धजन्य परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता यांवर अवलंबून असते.

वैशिष्ट्ये आणि मर्यादा : देशाच्या परिस्थितिजन्य गरजांमध्ये कोणत्याही ठिकाणी केंद्रित होण्याच्या क्षमतेसाठी हवाई सुरक्षा ही एकाधिकाराखाली असणे, हा हवाई सामर्थ्याचा महत्त्वाचा पैलू मानला जातो.

वैशिष्ट्ये :

 • परिवर्तनशीलता आणि अष्टपैलूत्व : कार्यरत स्थान आणि कार्यरत भूमिका या दोन्ही दृष्टिकोनांतून पाहता हवाई सामर्थ्याला अष्टपैलूच म्हणावे लागेल; कारण आक्रमक हल्ले, हवाई संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स युद्ध, रसद किंवा कुमक पुरवठा अशा कोणत्याही परिस्थतीच्या गरजेनुसार लढाऊ विमाने त्वरित मदत पोहचवू  शकतात.
 • गतिशीलता : भूभागावरील सैन्यदलाच्या तुलनेत हवाई आणि अवकाश यानांमध्ये मोठ्या प्रमाणातील अंतर अल्प वेळात साध्य करण्याची क्षमता असते. अर्थात, हे काही प्रमाणात कार्यस्थळावर (Operation Range) अवलंबून असते.
 • प्रतिसादात्मकता : हवाई सुरक्षा दल एखाद्या विशिष्ट परिस्थितीच्या गरजेनुसार काही तासांच्या अवधीतच प्रतिसाद देऊ शकते.
 • हादरवणारी गतिविधी : वर नमूद केल्याप्रमाणे हवाई सामर्थ्याच्या गतिशील गुणधर्मामुळे शत्रुपक्षावर केलेला आकस्मिक आणि अनपेक्षित हल्ला त्याला हादरवून सोडू शकतो आणि त्यामुळे शत्रुपक्षात अनागोंदी माजू शकते.
 • केंद्रीकरण : हवाई सामर्थ्य हे एका विशिष्ट ठिकाणावर  अगदी कमी वेळात आणि मोठ्या प्रमाणात केंद्रित करता येते.
 • आक्रमक कार्यविधी : देशाच्या सीमेपलीकडे जाऊन आक्रमण करण्याच्या हवाई ताकदीच्या क्षमतेमुळे शत्रुपक्षाच्या लढाऊ क्षमतेचे खच्चीकरण होऊ शकते.

मर्यादा :

 • टिकाव धरण्याची क्षमता : हवाई सामर्थ्य हे फार मोठ्या प्रमाणावर तांत्रिक पाठबळावर अवलंबून असते. त्यामुळे यासाठी मोठ्या प्रमाणात संसाधनांची गरज लागते आणि त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वेळ घ्यावा लागतो. देशाच्या सीमेपलीकडील लष्करी गतिविधी किंवा दीर्घ काळ चालणारे युद्ध यांत कधीकधी दीर्घकाळ टिकाव धरणे अवघड असते.
 • मुख्य तळांवरील अवलंबन आणि असुरक्षितता : हवाई सामर्थ्याची क्षमता ही कायमस्वरूपी विमानतळांवरून कार्यरत असताना जास्तीत जास्त परिणामकारक असते. परंतु जर तात्पुरत्या स्थलांतराची वेळ आली, तर याच्या क्षमतेवर नक्कीच परिणाम होतो. पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याच्या गुणधर्मांमुळे बहुतेक वेळेस हवाई दल हे सर्वश्रुत हवाई तळांवर केंद्रित करावे लागते, ज्यात हवाई किंवा भूमार्गे हल्ल्यांचा धोका असतो.
 • तंत्रज्ञानाबाबत संवेदनशीलता : अवकाशीय सामर्थ्य हे एकप्रकारे तंत्रज्ञानाचे अपत्यच म्हणावे लागेल. त्यामुळे हे तंत्रज्ञानातील छोट्यांत छोट्या बदलाबाबत अतिशय संवेदनशील असते.
 • अस्थायीपणा :  युद्धात हवाई दलाला भूभागावरील लढाईसाठी नेहमी भूदलाची मदत लागते; कारण हवाई दलाला जमिनीवरून युद्ध लढण्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे युद्ध जिंकण्यास हवाई ताकद असमर्थ ठरते.
 • राजकीय मर्यादा : काही अनपेक्षित परिस्थितीमध्ये जेव्हा हवाई सामर्थ्याची गरज लागते, तेव्हा त्याची मर्यादित उपयुक्तता ही त्यांच्या क्षमतेवर नाही, तर बऱ्याच वेळा राजकीय धोरणांवर अवलंबून असते.
 • हवामान : आता आधुनिक काळात विकसित तंत्रज्ञानामुळे लष्कराला अविरत युद्ध लढता येऊ शकत असले, तरी भूसेना आणि नौसेना यांच्या तुलनेत हवाई दलाच्या कार्यक्षमतेवर मात्र हवामानाचा परिणाम अजूनही होतो.

अवकाशस्थित युद्ध दल : उपग्रह आणि अवकाशयान यांचा क्षेत्रीय आवाका फार मोठा असतो. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा, दळणवळण मार्गनिर्देशन (Communication Navigation) यांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणा अखंडित राबवता येतात. जगभरातील तैनात सैन्यासाठी हवाई दल हा सामरिक नीती आणि डावपेचाचा एक अपरिहार्य घटक झाला आहे. अर्थातच, सर्व प्रकारच्या रणनीतीचा हा एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि प्रत्येक (बलशाली) राष्ट्र या क्षमतेचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असते. अवकाशस्थित/हवाई क्षमतेच्या विकासीकरणासाठी लागणारा वेळ आणि पैसा जरी जास्त असला, तरी शत्रूवर मात करण्यासाठी त्याचे फार मोठे फायदे आहेत, हे नक्की.

संदर्भ :

 • Chun, Clayton K. S. Aerospace Power in the Twenty First Century, US Airforce Academy, 2001.
 • Goyal, S. N. Air Power in Modern Warfare, Bombay, 1960.
 • Singh, Jasjit, Air Power in Modern Warfare,New Delhi, 1985.

                                                                                                                                                         भाषांतरकार – वसुधा माझगावकर

                                                                                                                                                                     समीक्षक – शशिकांत पित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा