मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस  या जीवाणूमुळे मानवास क्षयरोग होतो. सामान्य भाषेत याला क्षयरोग जीवाणू असे म्हणतात. क्षयरोग हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. संस्कृतमध्ये ‘क्षय’ वा ‘राजयक्ष्मा’ असा त्याचा उल्लेख आढळतो. फुप्फुसाचा क्षयरोग अशा अर्थाने त्याला लॅटिनमध्ये थायसिस (phthisis) असा उल्लेख आहे. एक असा असाध्य आजार ज्यामध्ये हळूहळू शरीराची झीज होते, अशा अर्थाने इंग्रजीत त्याला कन्झम्प्शन (consumption) किंवा वेस्टिंग डिसीझ (wasting disease) म्हणून संबोधले जाते. ट्युबरक्युलॉसिस या शब्दाचा अर्थ ‘छोट्या गाठी’ असा होतो.

सूक्ष्मदर्शकातून दिसणारे क्षयरोग जंतूंचे झुपके

रॉबर्ट कॉख यांनी ३७° से. तापमानास साखळलेल्या रक्तापासून वेगळे केलेल्या रक्तरसात (सीरम) क्षयरोगाचे जीवाणू उबवण यंत्रात ठेवून वाढवले. क्षयरोगाच्या जीवाणूवरील हे पहिले वृद्धी मिश्रण होते. प्रयोगशाळेतील सशांना हे जीवाणू टोचले असता त्यांना क्षय होऊन ते मरण पावले. या जीवाणूंना ‘ट्युबरक्युलॉसिस जीवाणू’ असे नाव दिले. २४ मार्च १८८२ रोजी रॉबर्ट कॉख यांनी बर्लिनमधील शरीरक्रियाशास्त्रज्ञांच्या परिषदेत मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस  हे क्षयरोगाचे जीवाणू प्रत्यक्षात दाखवले. तेव्हापासून दरवर्षी २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून गणला जातो. २० एप्रिल १८८२ रोजी त्यांनी एका शोधनिबंधात प्रात्यक्षिकाद्वारा असे मत मांडले की, मायकोबॅक्टिरियम  हे जीवाणू क्षयरोगाचे एकमेव कारण आहे.

मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस  हे जीवाणू दंडगोलाकार असून ते २–४ मायक्रॉन लांब आणि ०.५ मायक्रॉन रुंद असतात. ते स्वत: स्थलांतर करत नाहीत. जिवंत राहण्यासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज असते. त्यांचे  विभाजन (पुनरुत्पादन काल)  सु. २० तास एवढ्या दीर्घ काळाने होते. हे जीवाणू मुख्यत: आश्रयीच्या पांढर्‍या पेशीत किंवा अन्य ऊतीमध्ये राहतात. त्यांची पेशीभित्तिका मेणचट व मेदयुक्त असते. पेशीपटलाबाहेरील  पेप्टिडोग्लायकान (Peptidoglycan) रेणूंच्या  जाळीदार थरामुळे त्यावर  प्रतिजैविकांचा परिणाम सहसा होत नाही. त्यामुळे  आश्रयीच्या प्रतिक्षमता यंत्रणेस (Immunity) क्षयाचा जीवाणू नष्ट करणे कठीण बनते .

सामान्यपणे क्षयरोगाचे जीवाणू फुफ्फुस पेशीमध्ये आश्रय घेतात. परंतु, फुफ्फुसाशिवाय इतर ऊतींमध्ये त्याचा आढळ असल्यास अशा क्षयरोगास फुफ्फुसबाह्य क्षयरोग असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीची प्रतिक्षमता क्षीण झालेली आहे, अशा व्यक्तीमध्ये फुफ्फुसावरण (Pleura), मध्यवर्ती चेतासंस्था आवरण (Meninges), लसीका संस्था – मानेतील लसीका ग्रंथी, मणके, सांधे, गर्भाशय यांमध्ये क्षयरोगाचे जीवाणू वाढतात. एड्स झालेल्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसबाह्य क्षयरोगाचे प्रमाण अधिक आहे.

सूक्ष्मदर्शकातून दिसणारे क्षयाचे जीवाणू (मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस)

क्षयरोग जीवाणूच्या पेशीभित्तिकेतील मेदपदार्थांत ट्रेहालोज डायमायकॉलेट (Trehalose dimycolate) हा तंतुजघटक आढळतो. यामुळे  क्षयरोग जीवाणूचे नागमोडी माळेसारखे झुबके बनतात. तंतुज घटक असलेले क्षयरोग जीवाणू अधिक संसर्गजन्य असतात.

स्वतंत्रपणे जगण्यासाठी जीवाणूस अनेक प्रकारची प्रथिने लागतात. ती निर्माण करण्यासाठी विकरे आणि त्यांच्या नियंत्रणासाठी मोठ्या संख्येने जनुके लागतात. परजीवी अधिवासामुळे जीवनावश्यक अनेक गोष्टी त्याला आश्रयी पेशीतून  मिळतात. परजीवी जीवाणूंच्या जीनोमचा संकोच झाला असून त्यानुसार मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस  जीनोममध्ये फक्त ३,९५६ जनुके शिल्लक राहिलेली आहेत. त्यातील ४०% जनुके त्याचे प्रथिन व मेद आवरण निर्मितीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे ट्यूबरक्युलॉसिसवरील उपचार दीर्घकाळ करावे लागतात.

गाय, शेळी, मेंढी, कुत्रा इत्यादी पाळीव प्राणी तसेच हरीण, कोल्हा, हत्ती, गेंडा, सिंह  यांसारखे वन्य प्राणी यांमध्ये मायकोबॅक्टिरियम बोव्हिस (Mycobacterium bovis) या  जीवाणूमुळे  क्षयरोग (Bovine Tuberculosis) होतो. पाळीव प्राण्यांकरिता काम करणाऱ्या व्यक्ती, कत्तलखान्यात मांस उत्पादने हाताळणाऱ्या व्यक्ती इत्यादींना मायकोबॅक्टिरियम बोव्हिस जीवाणूमुळे क्षयरोग होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यावरील उपचार मानवी क्षयरोगाप्रमाणेच आहेत. बोव्हाईन क्षयरोगाची लागण झालेल्या पाळीव प्राण्यांचे दूध कच्चे प्याल्यावर क्षयरोगाची बाधा होऊ शकते. दूध उच्च तापमानास निर्जंतुक (पाश्चरायझेशन) केल्यावर बोव्हाईन क्षयरोग होत नाही. दूध पूर्ण उकळून थंड झाल्यावर वापरावे. क्षयरोग जीवाणू संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी लहान मुलांमध्ये बीसीजी लस (BCG, Bacillus Calmette–Guérin vaccine) दिली जाते.

पहा : क्षयरोग

संदर्भ :

         समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा