निसर्गात सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे विषाणू आढळतात -प्राणी पेशीवर वाढणारे, वनस्पतीपेशीवर वाढणारे आणि जीवाणूवर (Bacteria) वाढणारे विषाणू. जिवंत पेशीमध्ये विषाणू वाढतात. जीवाणूमध्ये वाढणारे विषाणू मोजण्यासाठी प्लाक पद्धती वापरली जाते.

टी-२ कोलिफेज : विविध तीव्रतेचे द्रावण

कृती : एश्चेरिकिया कोलाय बी (ई. कोलाय) या जीवाणूच्या पेशीत टी-२ कोलिफेज (T-2  Coliphage) हा विषाणू वाढतो. टी-२ कोलिफेजचे प्रमाण सांडपाण्यात भरपूर असते. सांडपाण्यातील विषाणूच्या संख्येचे मोजमाप करण्यासाठी प्रयोगशाळेत पहिल्या नलिकेत ९ मिलि. ट्रिप्टोन (Tryptone) आणि १ मिलि. सांडपाणी घेऊन १:१० प्रमाणात त्याची तीव्रता सौम्य करतात. अशा पद्धतीने पुढील नलिकांत १:१००, १:१०००, १:१०००० अशा क्रमाने टी-२ कोलिफेजची तीव्रता सौम्य केली जाते.

मृदु ट्रिप्टोन अगार (Tryptone agar) हे जीवाणू आणि विषाणू यांसाठी पोषक खाद्य म्हणून वापरले जाते. या खाद्याच्या तीन नलिकांमध्ये प्रयोगशाळेत शुद्धावस्थेत मिळवलेल्या ई. कोलाय बी  जीवाणू असलेल्या द्रावणाचे २ थेंब घेतात आणि त्यातच नलिकांतील टी-२ कोलिफेजचे १:१००, १:१०००, १:१०००० असे अतिसौम्य केलेल्या प्रत्येक द्रावणाचे ०.१ मिलि. द्रव टाकतात. याप्रमाणे जीवाणू आणि विषाणू यांच्या मिश्रणाच्या तीन नलिका तयार होतात. हे मिश्रण ३७से. तापमानाला २४ तास उबवण पेटीत ठेवतात.

प्लाक निर्मिती एकक (PFU)

निरीक्षण : घट्ट ट्रिप्टोन अगार ओतून ठेवलेल्या ३ पेट्री बश्यांमध्ये (Petridish) जीवाणू आणि विषाणू एकत्र केलेला आणि उबवलेला मृदु ट्रिप्टोन अगार ओतल्यानंतर टी-२ कोलिफेज विषाणू ई. कोलाय बी जीवाणूच्या पेशीमध्ये शिरून प्रजननास सुरुवात करतो.

तीनही पेट्री बशी ३७ से. तापमानाला २४ तास उबवल्यानंतर घट्ट ट्रिप्टोन अगार बशीवर ई. कोलाय बी  या जीवाणूंची वाढ झालेली दिसते. बशीमध्ये अधूनमधून पारदर्शक गोलाकार विभाग दिसतात. ज्या ई. कोलाय बी पेशींमध्ये टी-२ कोलिफेजचे प्रजनन होते त्या ई कोलाय ‘बी’ पेशी मारतात आणि त्यामुळे हे पारदर्शक गोलाकार विभाग दिसतात. यांनाच प्लाक असे म्हणतात.

निष्कर्ष : एक प्लाक म्हणजे एक विषाणू असे मोजले जाते. यांना प्लाक निर्मिती एकक (Plaque Forming Unit, PFU) असे म्हणतात.

५० ते ३०० इतकी प्लाकची संख्या असलेली बशी मोजमापनासाठी वापरली जाते. जर प्लाकची संख्या, वापरलेली सौम्यता आणि सौम्य केलेल्या सांडपाण्याचे प्रमाण माहिती असेल तर एक मिलिलिटर सांडपाण्यातील विषाणूंचे मोजमाप करता येते. याला विषाणूचा अनुमानांक (Titer) असे म्हणतात.

समीकरण

असे समजा की, १:१०,००० सौम्यतेच्या बशीवरती ५० प्लाक दिसत आहेत आणि वापरलेली सांडपाण्याची सौम्यता १:१० इतकी आहे; तर १ मिलि. सांडपाण्यात विषाणूंची संख्या सोबतच्या समीकरणाने काढता येईल.

उपयुक्तता : एखाद्या रोगावरील लस तयार करताना विषाणूंचा विशिष्ट अनुमानांक असलेलेच द्रावण घ्यावे लागते. लस बनवण्यासाठी प्लाक पद्धती उपयुक्त ठरते.

पहा : एश्चेरिकिया कोलाय, विषाणू.

संदर्भ : 

समीक्षक : गजानन माळी