कॅमरेअरियस, रूडोल्फ याकोप : (१२ फेब्रुवारी १६६५ – ११ सप्टेंबर १७२१).

जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांनी सर्वप्रथम वनस्पतींमध्ये नर आणि मादी अशी लैंगिक ‍भिन्नता ओळखण्यास विशेष योगदान दिले.

कॅमरेअरियस यांचा जन्म ट्यूबिंगेन येथे झाला. त्यांनी ट्यूबिंगेन विद्यापीठातून वैद्यकीय शाखेतील पदवी मिळवली (१६७९). पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी दोन वर्षे जर्मनी, हॉलंड, इंग्लंड, फ्रांस आणि इटलीमध्ये प्रवास केला. या प्रवासातून परत आल्यावर त्यांनी ट्यूबिंगेन विद्यापीठातून डॉक्टरेट केली (१६८७) आणि तेथेच त्यांनी १६८७ पासून वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि वनस्पती उद्यानाचे संचालक म्हणूनही काम पाहिले.

कॅमरेअरियस यांनी वनस्पतींच्या लैंगिक प्रजननावर केलेले काम पायाभूत मानले जाते. त्यावेळचे शास्त्रज्ञ थिओफ्रॅस्टस (Theophrastus), सिसाल्पिनो (Cesalpino), मालपीगी (Malpighi) आणि ग्रू (Grew) यांच्यामध्ये वनस्पतीतील लैंगिक अवयवाबद्दल एकमत नव्हते. गीसेन (Giessen) येथील वैद्यकशास्त्राच्या आपल्या एका मित्राला त्यांनी पत्र लिहून कळविले की, फुलांमध्ये नर आणि मादी अवयव असतात. नर अवयव म्हणजे, परागकण (pollen grain; anther) आणि मादी अवयव म्हणजे जायांग (pistil). त्यांचे हे लांबलचक पत्र नंतर शोध निबंध म्हणून प्रसिद्ध झाले. त्या शोधनिबंधाची नावे : ऑन द सेक्स ऑफ प्लांटस (On the sex of plants; De sexu plantarum -1694) आणि बॉटनिकल वर्क्स (Botanical Works; Opuscula botanica-1697).

कॅमरेअरियस यांना एकलिंगी वनस्पती तुतीच्या फुलांच्या अभ्यासामध्ये असे आढळले की, जी मादी फुले नर फुलांच्या जवळ नसतात, त्यांच्या फळांमध्ये बिया नसतात. एरंडेल आणि मक्यामधील नर फुले काढून टाकल्यावर नंतर या वनस्पतीमध्ये बिया तयार झाल्या नाहीत. त्यांनी आपले निरीक्षण पत्राद्वारे इतर शास्त्रज्ञांना कळवले व मग अभ्यासकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. मग या शास्त्रज्ञांनीही एकलिंगी व द्विलिंगी वनस्पतींमध्ये असेच प्रयोग केले व ते कॅमरेअरियस यांच्या निष्कर्षाशी जुळले.

कॅमरेअरियस यांचे क्षयरोगाने ट्यूबिंगेन येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक – मोहन मद्वाण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा