गपी मासा ऑस्ट्रेइक्थीज वर्गातील सायप्रिनोडॉटिफॉर्मिस गणातील पीसिलायइडी कुलात समाविष्ट आहे. याचे शास्त्रीय नाव पोईझिला रेटिक्युलाटा आहे. १८६६ साली त्रिनिदाद बेटावर आर्. जे. एल्. गपी यांनी या माशाचा शोध लावला म्हणून त्याला गपी मासा हे नाव दिले गेले. गपीचे मूलस्थान दक्षिण अमेरिका व कॅरिबियन बेटे या भागात आहे.

गपी मासे गोड्या किंवा मचूळ पाण्यात, तळ्यांमध्ये व संथ नद्यांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आढळतात. गपी नराची लांबी २-३ सेंमी., तर मादीची ४-६ सेंमी. असते. नराचे पक्ष आकाराने मोठे असून त्यावर काळे, निळे, हिरवे, पिवळे अथवा विविध रंगांचे ठिपके असतात. नर त्याच्या खास गुदपक्षाचा वापर मादीच्या शरीरात शुक्राणू ठेवण्यासाठी करतो. प्रियाराधनात नर पुढाकार घेतो व सहचारिणीची निवड करतो. अंडांचे फलन मादीच्या शरीरात होते. सु. चार आठवड्याच्या गर्भावधीनंतर मादी एका वेळेस ३०-५० पिलांना जन्म देते. या माशांचे प्रजनन वैशिष्ट्यपू्र्ण आहे. मादीच्या शरीरात शुक्राणू अनेक महिने सक्षम राहू शकतात, त्यामुळे पुन्हा समागम न करता तिची अनेकदा वीण होते. पिले जन्मानंतर तीन महिन्यांनी प्रौढ होतात.
गपी मासा मुख्यतः कीटकभक्षी असून तो डास व कायरोनोमासच्या अळ्या, ट्युबीफेक्स जातीचे वलयांकित प्राणी व डॅफ्नीया-कवचधारी संधिपाद प्राणी यांवर उपजिविका करतो. प्रौढ गपी मासे कधीकधी नवजात गपींचे भक्षण करतात. डासांच्या अळ्या खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल, असे एक मत आहे. मात्र काही राष्ट्रांमध्ये हे मासे ज्या ठिकाणी सोडले गेले तेथील परिसंस्थांतील अन्य माशांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत.
छोटे आकारमान, आकर्षक रंग, बहुप्रसवता आणि कणखरपणा या गुणधर्मांमुळे गपी माशाला घरगुती जलजीवालयात महत्त्वाचे स्थान आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.