स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणाच्या मुस्टिलिडी कुलातील एक प्राणी. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सागराने वेढलेले देश वगळता पाणमांजर जगात सर्वत्र आढळते. त्यांच्या एकूण १३ जाती असून भारतात त्यांपैकी पुढील तीन जाती आढळतात: (‍१) यूरेशियन पाणमांजर ‍किंवा कॉमन ऑटर. याचे शास्त्रीय नाव लुट्रा लुट्रा आहे,  (२) गुळगुळीत कातडीचे पाणमांजर किंवा स्मूथ कोटेड ऑटर. याचे शास्त्रीय नाव लुट्रा पर्स्पिसिलेटा आहे आणि (३) लहान नखीचे पाणमांजर ‍किंवा स्मॉल क्लॉड ऑटर. याचे शास्त्रीय नाव एऑनिक्स सायनेरिअस आहे. भारतात सामान्यपणे गुळगुळीत कातडीचे पाणमांजर आढळते.‍

पाणमांजर (लुट्रा पर्स्पिसिलेटा) : मासा पकडून खात असताना

गुळगुळीत कातडीचे पाणमांजर सर्वांत मोठे असून त्याचे वजन ७ –११ किग्रॅ. आणि लांबी १-१·३ मी. असते. शेपूट सु. ४५ सेंमी. लांब असते. पाठीवरील केस तोकडे व मऊ असतात. रंग पिवळट तपकिरी असून पोटाकडे तो फिकट करडा असतो. त्याच्या मुस्कटावर केस नसतात. शरीर लांब व निमुळते असते. पायांचे पंजे बळकट असतात आणि बोटांना नख्या असतात. बोटे अपुऱ्या पडद्यांनी जोडलेली असून त्यांचा उपयोग सफाईदारपणे पोहण्यासाठी होतो. विशिष्ट स्नायूंच्या साहाय्याने नाक आणि कान बंद करून ते पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधते. पाण्यात बुडी मारल्यानंतर ते ३-४ मिनिटे पाण्याखाली राहू शकते. त्याला शिट्टी मारल्यासारखा आवाज काढता येतो. भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असणारी सरोवरे, तलाव, नद्या, कालवे, दलदलीच्या जागा, खारफुटीची वने आणि दगडांच्या राशी असलेले नदीकिनारे या ठिकाणी पाणमांजरांच्या वसाहती असतात. नर, मादी व पिले एकत्र वावरतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या अधिवासाच्या टापूची मालकी प्रस्थापित करतात.

मासे हे पाणमांजराचे मुख्य अन्न आहे. याखेरीज उंदीर, पाणसाप, बेडूक तसेच छोटे पक्षीही ते खाते. पाणमांजरे बऱ्याचदा गटाने माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात. त्यांच्या विणीचा हंगाम सप्टेंबर–फेब्रुवारी महिन्यांत असतो. या हंगामात ते एका जागी स्थिरावतात व तात्पुरती घरे करतात. गर्भावधी ६१–६५ दिवसांचा असतो. मादी एका वेळी २–५ पिलांना जन्म देते. नर आयुष्यभर मादीशी एकनिष्ठ असतो. पिले दोन महिन्यानंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात. एका वर्षानंतर ती स्वतंत्रपणे राहू लागतात. पाणमांजराचे आयु:काल सु. ४–१० वर्षे असते. मगर हा पाणमांजराचा नैसर्गिक शत्रू आहे.

भारतात यूरेशियन पाणमांजरे आणि लहान नखी पाणमांजरेही आढळतात. यूरेशियन पाणमांजर पाठीकडे तपकिरी असून पोटाकडे, विशेषत: मानेकडे व छातीकडे, करड्या रंगाचे असते. शरीरावरील केस लांब व दाट असतात. रुंद तोंड, आखूड मान व ढालीच्या आकाराचे केसविरहित नाक यावरून यूरेशियन पाणमांजर ओळखता येते. शरीर ५७–९५ सेंमी. लांब असून त्यात शेपूट ३५–४५ सेंमी. लांब असते. वजन ७–११ किग्रॅ. असते.

लहान नखीचे पाणमांजर भारतात उत्तरेकडे तसेच हिमालयात आढळते. त्याच्या शरीराची एकूण लांबी ७५–१०० सेंमी. असून त्यात शेपूट सु. ३० सेंमी. लांब असते. वजन १–५ किग्रॅ. असते. डोके चपटे आणि मान आखूड व जाड असते. रंग तपकिरी-करडा असतो. पंज्याची नखे बोटांच्या जाड आवरणापलीकडे पोहोचत नाहीत. बोटांमधील पडदे पुढील पेरांपर्यंत मर्यादित असतात. नाकावर केस नसतात. ते वेगवेगळे १२ प्रकारांचे आवाज काढून ते इशारे देते.

पाणमांजराच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि उपासमारीमुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे. आययूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले प्राणी या यादीत केला आहे. भारतात १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे. बंदिस्त अधिवासात पाणमांजरांची पैदास करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. पाकिस्तान व बांगला देश येथे माशांच्या थव्याला जाळ्याकडे हाकलण्याचे प्रशिक्षण पाणमांजरांना दिले जाते.

This Post Has One Comment

  1. वन्यजीव रक्षक अनिकेत जाधव

    खुप छान माहिती मिळाली

प्रतिक्रिया व्यक्त करा