ताबुल फळे : कोकणच्या लोकजीवनातील खेळावयाचा बैठा खेळ. ताबुल किंवा ताब्ल म्हणजे लाकडी पट्टया. त्यांची लांबी सुमारे २० सें.मी. रुंदी २ सें.मी.आणि जाडी पाऊण सें.मी. असते. या पट्टयांच्या दोन्ही बाजू सहज ओळखू याव्यात म्हणून दोन रंगांनी रंगविलेल्या असतात. त्यांच्या एका टोकावर एक फुली तर दुसऱ्या टोकावर दोन फुल्या रंगविलेल्या असतात. त्यांचा उपयोग खेळ खेळताना गुण मोजण्यासाठी होतो. ताबुल फळे म्हणजे एक नक्षीकामाने रंगविलेला फळा. या लाकडी फळीची लांबी अंदाजे ३० ते २५ सें.मी. आणि रूदी १५ ते २० सें.मी. असते. त्यावर समान आकाराच्या बारा-बारा घरांचे म्हणजे खणांचे चार भाग दाखविलेले असतात.

शिवाय हा खेळ दोन रंगांच्या लाकडी त्रिकोणी सोंगटया असतात. दोन खेळाडूंच्या मध्ये ताबुल फळे ठेवून समोरासमोर बसतात. एका मुठीत चारही ताबले घेऊन जमिनीवर आपटून हवेत उडविली जातात. ती जमिनीवर पडल्यावर त्यांच्या पडण्याच्या स्थितीवरून गुण मोजण्याची परंपरा आहे. ताबले पडणे आवश्यक आहे. एकदा का तशी चाल मिळाली की दोन्ही खेळाडूंचा खेळ सुरू होतो व ताबलांच्या स्थितीनुसार सोंगटयांची चाल ठरविली जाते. आपल्या बाजूच्या बारा घरांतून पुढची चाल करण्याकडे खेळाडूचा कल असतो. दुप्रतिस्पर्ध्याच्या घरांत रिघण्यासाठी खेळाडूंची धडपड असते. कारण प्रतिस्पर्ध्याच्या घरात पोचल्यावर त्याच्या सोंगटया बाद करता येऊन सहतपणे विजय संपादन करता येतो. त्यासाठी पटावर आपल्या जास्तीत जास्त सोंगटया असणे आवश्यक असते.
जुन्या काळात लहान वयातच मुलांची लग्ने लावली जात. त्यांना बैठे खेळ सहजपणे खेळता यावेत यासाठी मुलीला सासरी जाताना ताबुल फळे भेट दिले जाई. नपेक्षा सणासुदीच्या निमित्ताने पाठविण्यात येणाऱ्या गोड-धोड मेव्यासोबत ताबुल फळे भेटवस्तूच्या रूपात दिले जाई. या लाकडी पटावर ताबलांच्या खेळाशिवाय वाघ, कांग असे अन्य ग्रामीण पारंपरिक बैठे खेळ खेळण्याची तरतूद म्हणून विविध रंगांव्दारा आखणी केलेली असते. अलिकडे देशी खेळांकडे नव्या पिढीचे दुर्लक्ष होत असल्याने असले खेळांचे प्रकार नामशेष होत चालले आहेत.

संदर्भ : खेडेकर, विनायक विष्णू , लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.