फुलेव कळ्यांसह अळशी वनस्पती

फुलझाडांपैकी अळशी हे झुडूप लायनेसी कुलातील एक वनस्पती आहे. वर्षभर जगणार्‍या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लायनम असिटॅटीसिमम असे आहे. भूमध्यसामुद्रिक भागात आढळणार्‍या तिच्या प्रजातीतील एका जातीचा (लायनम बाएने) व तिचा जवळचा संबंध असावा किंवा तिचे मुलस्थान इराणचे आखात, कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र यांच्यामधील भागात असावे किंवा ती मूळची भारतीय असावी, अशी वेगवेगळी मते आहेत. प्राचीन इजिप्‍तमध्ये अळशीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती. ४,००० वर्षांपूर्वीच्या ईजिप्शियन ममी (मृत व्यक्तीचे जतन केलेले शारीरिक सांगाडे) अळशीच्या कापडात गुंडाळलेल्या आढळल्या आहेत. भारतात सर्वत्र सस. पासून १,८00 मी. उंचीपर्यंतच्या सखल प्रदेशात अळशीची लागवड करतात. तसेच ती वनातही वाढलेली आढळते.

अळशीची उंची ६०-१२० सेंमी. पर्यंत असते. फांद्या टोकाकडे वाढताना दिसतात. पाने ४ सेंमी. लांब, निमुळती व भालाकृती असतात. फुले (२.५ सेंमी. व्यासाची) लहान, निळी किंवा पांढरी असून पाच पाकळ्यांची असतात. फळे गोलाकार व पाच कप्प्यांची असून प्रत्येकात सफरचंदाच्या बियांप्रमाणे दोन बिया असतात. त्या पिवळसर किंवा काळसर भुर्‍या, लहान, चपट्या, गोलसर व चकचकीत असतात. त्यांच्यापासून सु. ४० टक्के तेल मिळते.

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ नावाचे मेदाम्ल आणि लिग्नॅन नावाचे प्रतिऑक्सिडीकारक असते. हृदयविकार आणि कर्करोग रोखण्यात तिच्या बियांचे सेवन उपयुक्त ठरते. तिचे बी दाह कमी करणारे, कफ सुटा करणारे, लघवी साफ करणारे व रेचक असते. बियांचा काढा पडसे, खोकला, श्वासनलिकाविकार, मूत्रवाहिनीविकार, अतिसार इत्यादींवर देतात. बियांचे पोटीस जखमा, दाह, फोड, सूज इत्यांदीवर देतात. पशुवैद्यकशास्त्रात अळशीचे तेल घोड्यांसाठी आणि गुरांसाठी रेचक म्हणून वापरतात.

अळशीची लागवड बियांसाठी तसेच धाग्यांसाठी केली जाते. तिच्या खोडापासून धागे (फ्लॅक्स) तयार करतात. हे धागे मऊ, चमकदार, लवचिक आणि कापसाच्या धाग्यापेक्षा मजबूत असतात. या धाग्यांपासून तयार केलेल्या कापडाला ‘लिनन’ म्हणतात. धागे, रंग, उच्च प्रतीचा नोटांसाठी वापरला जाणारा कागद, औषधे, मासे धरण्याची जाळी आणि साबण तयार करण्यासाठी अळशीच्या विविध भागांचा उपयोग होतो. काही ठिकाणी बागांमध्ये या वनस्पतीची लागवड शोभेसाठी करतात.

अळशीच्या उत्पादनात भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. भारतातील एकूण उत्पादनापैकी २/३ उत्पादन उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात होते. बाकीचे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व बिहार या राज्यांमध्ये होते. उत्तर प्रदेशात व पंजाबात अळशीच्या बियांपासून ‘पिनी’ नावाची मिठाई करतात. मध्य प्रदेशात व महाराष्ट्रात अळशीची चटणी तयार करतात.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा