एक प्रकारची पालेभाजी. ही वर्षायू वनस्पती ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव चिनोपोडियम आल्बम आहे. जगभर सर्वत्र या ओषधीची लागवड केली जाते. भारतात ती सस.पासून ४,२०० मी. उंचीपर्यंत सर्वत्र लागवडीखाली आहे. तसेच वनात तण म्हणून ती वाढते. १७५३ साली कार्ल लिनीअस याने प्रथम या वनस्पतीचा उल्लेख केलेला आढळल्यामुळे तिचे मूलस्थान यूरोपात असावे, असे मानतात. ज्या जमिनीत नायट्रोजनाचे प्रमाण अधिक असते त्या जमिनीत ही चांगली वाढते.
चाकवत (चिनोपोडियम आल्बम)

चाकवत वनस्पती १-२ मी. उंच वाढते. सुरुवातीला ती सरळ उभ्या दिशेत वाढते आणि फुलांनी बहरल्यावर ती कलते. खोड पिंगट व रेखित असते. पाने साधी व एकाआड एक असून त्यांच्या आकारात विविधता आढळते. तळाकडील पाने मोठी, दंतुर आणि चौकटच्या आकाराची असतात. शेंड्याकडील पाने लहान, निमुळती व भाल्याच्या आकाराची असतात. फुले लहान व हिरवट असून कणिशावर येतात. बिया चपट्या व चकचकीत असतात.

चाकवत ही वनस्पती पाचक, रेचक व कृमिनाशक आहे. तिचा पालेभाजी म्हणूनही उपयोग करतात. मात्र, पानांमध्ये ऑक्झॅलिक आम्ल अधिक प्रमाणात असल्याने ही भाजी कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. पानांमध्ये प्रथिने, ब-समूह जीवनसत्त्वे व क जीवनसत्त्व, लोह, तंतुमय पदार्थ व अन्य खनिजे असतात. बिया पौष्टिक असून त्यांत अ जीवनसत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम व प्रथिने अधिक प्रमाणात असतात. त्यांचा धान्य म्हणून वापर करतात. पाने व बिया कोंबड्यांना चारा म्हणून देतात. ही वनस्पती जशी जुनी होत जाते तसे तिचे खोड कठीण होत जाते. चीनमध्ये याचा चालण्याची काठी म्हणून उपयोग करतात.