एक जलचर सस्तन प्राणी. वॉलरसचा समावेश स्तनी वर्गाच्या अपरास्तनी या उपवर्गाच्या मांसाहारी गणात होतो. या गणातील ओडोबेनिडी कुलात वॉलरसचा समावेश केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव ओडोबेनस रोझमेरस आहे. ‘व्हॉलरॉस’ या स्वीडिश शब्दापासून वॉलरस हे नाव पडले आहे. त्यांना ‘मोर्स’ असेही म्हणतात. ओडोबेनिडी कुलाच्या ओडोबेनस या एकमेव प्रजातीत वॉलरस हा एकमेव प्राणी आहे. वॉलरसाला असलेले सुळे, मिशा आणि स्थूल शरीर यांमुळे तो सहज ओळखता येतो. वॉलरसच्या तीन उपजाती आहेत; अटलांटिक महासागरातील . रो. रोझमेरस, पॅसिफिक महासागरातील . रो. डायव्हर्जन्स आणि आर्क्टिक महासागराच्या लॅप्टेव समुद्रातील . रो. लॅप्टेव्ही.

वॉलरस (ओडोबेनस रोझमेरस)

वॉलरस हा सील या जलचर प्राण्याशी साम्य असलेला प्राणी आहे. त्याच्या शरीराची लांबी ३–४ मी. व वजन ६५०–९७५ किग्रॅ. असते. शरीर आखूड केसांनी आच्छादलेले असून काही जातींमध्ये अंगावर दाट केस किंवा लोकरीसारखी फर असते. वॉलरसचे डोके गोल असते, मान वेगळी व स्पष्ट दिसते, डोळे लहान असून त्यांना बाह्यकर्ण नसतात. मुस्कटावर दोन्ही बाजूंना राठ गालमिशा असतात. शेपटी लहान असते. त्याचे हात कोपरापासून शरीराबाहेर असून ते पसरट व चपटे असतात. त्यांना अरित्रे (फ्लिपर) म्हणतात.  हालचाल करताना ते मागची अरित्रे पुढे आणतात आणि चारही अरित्रांचा वापर करून हालचाल करतात.

लांब सुळे हे वॉलरसचे वैशिष्ट्य आहे. नर आणि मादी दोघांनाही सुळे असतात. सुळे सु. १ मी. लांब असून त्यांचे वजन ५ किग्रॅ.पर्यंत असू शकते. नरांमध्ये सुळे किंचित लांब व मजबूत असतात; समूहातील इतरांवर वर्चस्व दाखविणे, दुसऱ्या नरांवर हल्ला करणे किंवा शक्तिप्रदर्शन यांसाठी ते सुळ्यांचा वापर करतात. बर्फात खड्डे खोदताना आणि पाण्यातून बर्फाच्या पृष्ठभागावर येताना ते सुळ्यांचा वापर करतात.

वॉलरसच्या सुळ्यांभोवती जाडजूड मिशा असतात. मिशांमध्ये केसांची संख्या ४००–७०० असून केस सु. ३० सेंमी. लांब असतात. मिशा त्वचेबरोबर जुळलेल्या असून त्यांना रक्तवाहिन्या आणि चेता असतात. त्यामुळे मिशा अतिशय संवेदी असतात. त्वचा चुण्या पडलेली असून जाड असते. मान तसेच खांदे या भागातील त्वचा सु. १० सेंमी. जाड असते. त्वचेखाली सु. १५ सेंमी. जाड चरबीचा थर असतो, त्याला तिमिवसा (ब्लबर) म्हणतात. त्यामुळे त्यांचे शरीर उबदार राहते आणि त्यांना ऊर्जा मिळत राहते. प्रौढ नरांच्या मानेच्या आणि खांद्याच्या भागात त्वचेवर अनेक टेंगळे असतात.

लहान वॉलरस गडद तपकिरी रंगाचे असून वय वाढते तसा त्वचेचा रंग फिकट तपकिरी होतो. वयस्कर वॉलरसाचा रंग गुलाबी असतो. थंड पाण्यात रक्तवाहिन्या आकुंचित होत असल्याने पोहताना ते पांढऱ्या रंगाचे दिसतात. त्यांच्या गळ्याखाली हवेची पिशवी असते. ती एखाद्या तरंगणाऱ्या बुडबुड्यासारखी कार्य करीत असल्याने ते पाण्यात उभे तरंगू शकतात. श्वसनासाठी काही वेळ ते पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. ते खूप खोल पाण्यात जाऊ शकत नसल्याने उथळ पाण्यात सापडणारे जलचर प्राणी – जसे चिंगाटी, खेकडे, समुद्रकाकडी, मृदुकाय, चोलधारी (ट्युनिकेट) – खातात. ऑर्का व्हेल आणि ध्रुवीय अस्वले हे त्यांचे मुख्य शत्रू आहेत.

वॉलरस समाजप्रिय असून ते लहान कळप करून राहतात. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर ते आक्रमक होतात. स्वसंरक्षणासाठी ते सुळ्यांचा वापर करतात. पूर्ण कळप शत्रूशी लढा देतो. वर्षभरातील बराच कालावधी ते मोठ्या संख्येने खडकाळ किनाऱ्यावर घालवितात. उन्हाळा संपताना हजारोंच्या संख्येने ते पॅसिफिक महासागरातून बेरिंग सामुद्रधुनीमार्गे चुकची समुद्रात येतात. नर साधारणपणे सात वर्षांत प्रजननक्षम होतात, तरीही १५ वर्षांपर्यंत समागम करीत नाहीत. मादी ४–६ वर्षांत प्रजननक्षम होते. जानेवारी-एप्रिल या काळात ते माजावर येतात. या काळात त्यांचे मिलन होते. गर्भावधी १५–१६ महिन्यांचा असतो. एप्रिल–जून महिन्यात पिले जन्माला येतात. जन्मलेल्या पिलांचे वजन ४५–७५ किग्रॅ. असून ती पोहू शकतात. मादी साधारणपणे एक वर्षभर पिलांची काळजी घेते. ते दीर्घायुषी असतात आणि नैसर्गिक स्थितीत २०–३० वर्षे जगतात.

वॉलरसचे मांस हे एस्किमो व चुकची लोकांचे खाद्य आहे. त्यांच्या चरबीपासून काढलेले तेल दिव्यात जाळण्यासाठी वापरतात. त्यांच्या चामड्यापासून घराचे छत, होड्यांची आच्छादने व साज तयार करतात. हस्तिदंतासारख्या दिसणाऱ्या सुळ्यांवर नक्षीकाम करतात. वॉलरस हा उत्तर ध्रुवाकडील सागरी परिसंस्थेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. वॉलरसचे मांस, चरबी, सुळे व हाडे यांकरिता त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. त्यामुळे त्यांची संख्या घटली आहे.