जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी (ग्रॅमिनी) कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिव्हम आहे. आशिया मायनर (आताचा तुर्कस्तान हा देश) गव्हाचे उगमस्थान मानला जातो. तेथे १०,००० ते १५,००० वर्षांपासून गहू पेरला जात असावा असा अंदाज आहे. गहू समशीतोष्ण प्रदेशात पिकतो. जगभरातील निम्म्या लोकांच्या आहारात गव्हाला मुख्य स्थान आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, चीन, भारत, फ्रान्स, रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश गहू उत्पादनात आघाडीवर आहेत.

गव्हाच्या ओंब्या
गव्हाच्या ओंब्या

गहू हे झुबकेदार वर्षायू गवत आहे. कोवळेपणी ही वनस्पती हिरवीगार असते आणि गवतासारखी दिसते. पूर्ण वाढ झालेल्या गव्हाच्या रोपांची उंची ६०-१५० सेंमी. असते. पिकल्यावर ती सोनेरी पिवळीधमक दिसू लागते. मूळ, खोड, पाने आणि स्तबक (कणिश) हे पिकलेल्या वनस्पतीचे मुख्य भाग असतात. तिच्यामध्ये दोन प्रकारची मुळे दिसून येतात; प्राथमिक आणि द्वितीयक. गव्हाच्या बियांपासून ३-५ सेंमी. लांबीची मुळे येतात आणि ती जमिनीखाली असतात. ही मुळे ६-८ आठवडे टिकतात. जमिनीवर जसजशी खोडाची वाढ होते तसतशी खोडाला जमिनीवर द्वितीयक मुळे फुटतात. ही मुळे जाड आणि मजबूत असून त्यांच्यामुळे गव्हाच्या रोपाला भक्कम आधार मिळतो. जमीन जर भुसभुशीत असेल तर ती सु. २०० सेंमी. लांब वाढू शकतात. गव्हाच्या खोडावर ५-६ पेरे असतात. पेरे भरीव असतात. मात्र त्यांमधील कांडे पोकळ असतात. तसेच खोड पानाच्या आवरकांमुळे झाकलेले असते. पाने लांब व अरुंद असून त्यांचे दोन भाग असतात; आवरक आणि पाते. आवरक हा भाग पेर्‍यापासून सुरू होतो व खोडाभोवती वेढलेला असतो. पाते लांब व अरुंद असून त्यावर समांतर शिरा असतात. पाते आणि आवरक जेथे जुळतात तेथे पापुद्र्यासारखा पुढे आलेला भाग असतो त्याला जिव्हिका म्हणतात. पाने खोडावर समोरासमोर असतात. फुलोरा कणिश किंवा ओंबी प्रकारचा असतो. फुलोरा आल्यापासून बी तयार होण्यासाठी ३०-४० दिवस लागतात. दाणे भरीव व आकाराने लंबगोल असून त्यावर एका बाजूला उभी खाच असते. दाणे दोन्ही टोकांना बोथट असतात.

गहू खाण्यासाठी वापरतात. त्याचे पीठ म्हणजे कणीक चवीला गोड लागते. आयुर्वेदाच्या दृष्टीने गहू प्रशीतक, वेदनाहारक, विरेचक, पौष्टिक, शोथशामक आणि कामोत्तेजक आहे. सर्वसाधारण अशक्तपणात गव्हाचे पदार्थ खाण्यासाठी देतात.

गव्हामध्ये ग्लायडीन आणि ग्लुटेनीन ही प्रथिने असतात. पिठात पाणी मिसळल्यानंतर या प्रथिनांपासून ग्लुटेन हे द्रव्य तयार होते. या घटकामुळे कणकेला चिकटपणा येतो.

भारतीय उपखंडातील गव्हापासून पोळ्या, पराठे व खाकरे यांसारखे पदार्थ बनवितात. यूरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पिकणार्‍या गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते. हा गहू पाव बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतो.

गव्हाच्या जाती व प्रकार 

गव्हाच्या जातीत सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन होत असते. १९६५ च्या सुमारास मेक्सिको येथे तयार झालेल्या जाती भारतात लागवडीसाठी आणल्या गेल्या. त्यांच्यापासून सुधारित वाणे तयार केली गेली आहेत. लर्मा रोजो 64A, सोनोरा-64, कल्याण सोना, सोनालिका, निफाड जाती, एच वाय 65 व सरबती सोनोरा अशा गव्हाच्या सुधारित जाती हरित क्रांती होण्यासाठी उपयुक्त ठरल्या.

निसर्गात पोएसी कुलातील दोन भिन्न प्रजातींमध्ये किंवा जातींमध्ये संकर होऊन किंवा संकरित जातीमध्ये उत्परिवर्तन होऊन हल्ली लागवडीत असलेल्या जाती उत्पन्न झाल्या असाव्यात, असे मानतात. ट्रिटिकम प्रजातीतील निरनिराळ्या जातींची द्विगुणित गुणसूत्रांच्या संख्येवर आधारित अशा तीन समूहांत खालीलप्रमाणे विभागणी केली जाते.

(१) १४ गुणसूत्रांचा समूह : ट्रि. बिओटिकम (रानटी लहान स्मेल्ट) आणि ट्रि. मोनोकॉकम (आइनकॉर्न अथवा लहान स्मेल्ट).

(२) २८ गुणसूत्रांचा समूह : ट्रि. डायकॉकॉइड  ट्रि. तिमोफिवी (रानटी), ट्रि. ड्युरम (बक्षी/बन्सी प्रकारचा गहू), ट्रि. टर्जिडम(पाऊलर्ड/रिव्हेट गहू), ट्रि. पोलोनिकम (पोलिश गहू), ट्रि. कार्थलिकम (पर्शियन गहू), ट्रि. डायकॉकम (खपली गहू) आणि ट्रि. ओरिएंटेल (खोरसान गहू).

(३) ४२ गुणसूत्रांचा समूह : ट्रि. स्पेल्टा, ट्रि. माचा, ट्रि. व्हॅव्हिलोव्ही, ट्रि. एस्टिव्हम (सरबती गहू), ट्रि. काँपॅक्टम (क्लब गहू) आणि ट्रि. स्फिरोकॉकम (बुटका गहू).